श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “उपोषण…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
उपोषण हे हत्यार आहे याची खात्री पटली. त्यातही आपला पोषणकर्ता उपोषण करत असेल तर आपल कुपोषण होण्याची भिती असते.
सध्या वातावरणात गारवा येत असतानाच आमच्या घरातल वातावरण मात्र तापत होत. कारण एकच होत. ऑफिसच्या धावपळीतून येणाऱ्या दिवाळीसाठी तयारी करायला त्यांना वेळ मिळत नव्हता.
तापलेल्या वातावरणाची धग मधे मधे भांड्यांच्या वाढणाऱ्या आवाजाने आणि तोंडाने होणाऱ्या भडिमाराने जाणवत होती.
काय मेली मदत ती काडीची नाही. घर, ऑफिस सांभाळून सगळी मरमर करायची ती आपणच. आणि त्यात यांना कौतुक त्या वर्ल्डकप च. तो मिळायचा त्याला मिळेल. त्यांच काय?…. जाहिरातवाले सगळ त्यांच्या घरी वेळेअगोदर पाठवतील. यांच काय…… यांचे चहाचे कप मात्र वाढत चालले आहेत.
काही नाही….. हे चालणार नाही…. मी तुम्हाला काही वेगवेगळ्या दिवसांची मुदत देते. या दिवशी सांगितलेली सगळी कामं झाली तर ठिक…… नाहीतर उपोषण हे नक्की…..
हे अल्टिमेटमचे सगळे दिवस वेचून वेचून भारताची मॅच असणारेच होते.……
मी पण आपल मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नात…… जरा दिवस तरी बदलता येतील का? सगळ्या दिवशी भारताचीच नाहीतर एक चांगली मॅच आहे……
म्हणूनच….. म्हणूनच हे दिवस…. कारण सगळेच तुमच्या सारखे टाळ्या वाजवत, नाहीतर कसं खेळायला पाहिजे होतं याची बडबड करत टी.व्ही. समोर बसतील. बाजारात गर्दी कमी असेल. तुमचा पार्किंग चा प्रश्न पण निकालात निघेल. आणि मॅच चांगली होईल का सांगता येत नाही, पण खरेदी चांगली होईल…… तिने थर्ड अंपायर ने निर्णय द्यावा तसा ठोस निर्णय सांगितला.
झाल…… अशा उपोषणाची चर्चा फोनवर मैत्रिणींशी झाली सुध्दा…… संध्याकाळी मैत्रीणी (वेळात वेळ काढून) बराचवेळ हजर. नुसत्या नाही. कोणी वेफर्स ची पाकिट, कोणी थंडपेयाची लहान खोकी, किंवा बाटल्या आणल्या. अगं उपोषण म्हटल्यावर कोणीतरी तुला पाहायला येतीलच. तु पाणी पिशील. पण त्यांना नको का काही…
दुसरी…. पाण्यावरून आठवल. तुला पण पाणी लागेलच. मी दहा बारा बाटल्या पाठवते. राहू दे. कामाला येतील. सारख तुला कोणाकडे पाणी मागायला नको. आणि परत येणाऱ्यांशी थोड बोलण होइलच. घशाला कोरड पडते. (दोन बायकांमध्ये ऐकण थोडच आणि बोलण जास्त असत हे यांना सांगावस वाटत होत. पण बोललो नाही….. नाहीतर उपोषण लगेच सुरू झाल असत. आणि उपोषण करणाऱ्यांची संख्या पण वाढली असती.)
अगं खरंच. माझ्याकडे पण ग्लुकोज पावडरचे डबे आहेत. कुठला ऑरेंज फ्लेवर पाठवू का?……. आणखीन एक आवाज.
आणि हो, आत्ता बोलायला नको, पण लागला तर सलाइन लावायचा स्टॅण्ड पण आहे माझ्या कडे…… सासूबाई आजारी असतांना त्यांनीच आणायला लावला होता. येवढा लगोलग आणला पण मोजून दोनदाच लागला त्यांना. आता घरात येताजाता तो पायालाच लागतो. सध्या हातरुमालच वाळत असतात त्यावर…….. एक आवाज…..
आणि हे काय?……बसणार कुठे?…. तु आपली हाॅलमधेच बैस. रिमोट मात्र तुझ्या हाताशी ठेव. प्राईम व्हिडिओ, नाहीतर ते यु ट्यूब वरचे कार्यक्रम चांगssssssले पहात बैस. यात चांगले कार्यक्रम बराचवेळ असे दोन्ही भाव होते. परत एक आवाज…..
एक्स्टेन्शन बाॅक्स आहे का? नाहीतर तो पण आणते. फोन चार्ज करायला उठायला नको. आपल जवळ असलेला बरा. आणि मऊ उशा, शाल, आणि तक्या मात्र राहू दे जवळ. त्या शिवाय उपोषणाचा फिल येणार नाही.
आणि तु उपोषणाला बसलीस की कळव. म्हणजे येताना ती नवीन लागलेली आहे ना… तिला घेऊन येईन. अगं मोबाईल मधे काय मस्त शुटिंग करते ती. आणि बॅकग्राऊंडला समर्पक गाणीपण भरायला जमत तिला. यंग जनरेशन……. उपोषणावर गाणी आहेत का?….. नाहीतर सॅड म्युझिक टाकू.
यंग जनरेशन म्हणतांना त्यात कौतुक होत की आपल्याला जमत नाही याची खंत याचा सुगावा काही लागला नाही. पण शुटिंगची व्यवस्था होणार होती.
जमेल तसं आम्ही लंच ब्रेक मध्ये येऊच. नाहीतरी नंतर अर्धा तास गप्पांमध्येच जातो. त्या काय इथे सुध्दा होतील. आणि पाठिंबा सुद्धा मिळेल.
अशी उपोषणाच्या अगोदरची तयारी झाली.
सगळे गेल्यानंतर मी म्हटलं. मी दोन दिवस सुट्टी घेतो. काय हव ते सगळ आणू. आणि यावेळी तुला साडी ऐवजी पैठणी. आणि एक दागिना. चालेल…….. आणि या आश्वासनानंतर उपोषण स्थगित.
आता काय?…….. आज सुटीच्या दिवशी मी दिवाणावर….. मऊ तक्यासोबत. समोर ती आधीच कोणीतरी आणलेली थंडपेयाची बाटली……. आणि वेफर्सच पाकीट.
आणि हाॅलमधेच खाली बायको चिवड्यासाठी खोबऱ्याचे काप करतेय. आणि आम्ही दोघंही मॅच बघणार आहोत.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈