श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “आमचं ठरलं आहे…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
काही गोष्टींचे वेध लागले असं आपण म्हणतो. ग्रहणाचे, निवडणूकांचे वेध लागतात, तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही ठरवण्याचे वेध लागतात. आणि काही काळ ते असतात.
आपण काही तरी ठरवू या ना……
हे मागच्या वर्षांपासून म्हणजे काल पासून आमच्या घरात सुरू होतं……. काय दिवस पटापट जातात नं………. फक्त ठरवताना आकड्यांमुळे नवीन वर्ष सुरू झालं…… आणि करेपर्यंत कदाचित संपेल सुध्दा……
काहीतरी काय ठरवायचं?……. काही चांगल ठरवू या ना…….. त्यावेळी सुध्दा माझा विनोद करायचा प्रयत्न…….
पण विनोदाला दाद मिळालीच नाही. हसतांना दिसणाऱ्या दातांऐवजी मोठ्ठे झालेले डोळेच दिसले. मग माझ्या लक्षात आलं, की हे वातावरण विनोद करायचं नाही……. आणि माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नये. असं खोटं सांगत मी खरं लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
बरं.. कशाबद्दल आणि काय ठरवायचं?….. मी शक्य तितक्या गंभीरपणे विचारलं…
… नवीन वर्षात प्रत्येक जण काही तरी ठरवत असतात…… आपणही काही तरी ठरवू या…
ठरवूया की…… पण काय? कसं? आणि कशाबद्दल ठरवायचं?…… माझे प्रश्न……
तू आपल्या अनुभवाने, विचाराने चांगल तेच ठरवते आणि माझ्या कडून करून घेतेस. तेव्हा तुझा अनुभव, संयम, दूरदृष्टी, निश्चय, नेतृत्व कौशल्य, नियोजन असे सगळे गुण लक्षात येतात….. तुझा निर्णय ठाम असतो….. मग आपण काय ठरवायचं…… तू ठरवायचंस आणि माझ्या कडून करून घ्यायच हा साधा, सोपा, आणि धोपट मार्ग आहे की……. मी शक्य तितके चांगले शब्द आठवून आठवून एका दमात वापरले.
खाण्यापिण्याच्या बाबतीत तुच ठरवतेस. कपडे आणि दागिने यांच्या बद्दल तू ठरवलेलं मला मान्य करावं लागतं. घरातल्या वस्तूंच्या खरेदीसाठी तू सांगते ते गरजेचं नसलं तरीही गरजेच आहे हे तू मला पटवून देतेस.
फिरायला जायचं का?…. आणि कुठे?….. हा प्रश्न पडल्यावर कुठे? कधी? कसं? कोणासोबत? यावर आपण विचार करुन तू घेतलेल्या निर्णयाला मी हो म्हणतो….. मुलं मोठी झाली आहेत. त्यांच तेच ठरवतात. आणि ठरलेलं आपल्याला सांगतात. आता अजून काय ठरवायचं…….
सकाळी लवकर उठणं, फिरायला जाणं, जमेल तसा, जमेल तिथे, आणि जमेल तेवढाच व्यायाम करणं हे आपण बऱ्याचदा ठरवलं आहे. आणि हे ठरवलेलं आपल्या चांगलं लक्षात आहे. पण ते जमतंच असं नाही……. त्याला आपण काय करणार…… पण आपण ठरवतो हे सुध्दा काही कमी नाही…… तसं आपण कमीच ठरवतो असंही नाही….. आणि आपलं वजन अजून सुध्दा दोन आकड्यांच्या पुढे सरकत नाही….. त्यामुळे ते कमी करायचं हे ठरवण्याची सध्या गरज नाही……
जाऊ देत….. तुमच्याशी बोलण्यात अर्थ नाही…… नाराजीचा सूर…….
मीच काही ठरवते. आणि तुम्हाला सांगते. बघा पटतंय का? नाही आवडलं तर आपण परत दुसरं काही ठरवू…… चालेल…
मी पण चालेल असं म्हणत विषय संपवला. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही या वाक्यात सध्यातरी अर्थाचा म्हणजे पैशांचा संबंध नाही हा अर्थ माझ्या लक्षात आला…
यांच ठरवणं आणि हाॅटेल मधील मेनू कार्ड यात काही साम्य असतं. म्हणजे हाॅटेल मध्ये ते काय देणार हे त्यांनी ठरवलेलं असतं. आणि तेच त्यांनी लिहिलेलं असतं. त्यातूनच आपण काय घ्यायचं ते ठरवायचं असतं. घरातही तस्संच असत. त्यांनी जे काही ठरवलेलं असत त्यातूनच आपल्याला निवडायचं असतं.
हाॅटेल मध्ये खाण्याचे पदार्थ किंमतीसह लिहिलेल्या असतात. यांच्या ठरवण्यात बऱ्याचदा किमती वस्तूच असतात.
आता घरात जे ठरवलं जाईल ते नवीन वर्षात करायचा प्रयत्न करायचा हे आमचं ठरलं आहे……..
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈