सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “प्रभातफेरी” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
नुकतीच नववर्षाची सुरवात झाली. नवीन वर्ष तसं काळजीत,संकटाच्या भितीखाली, निराशेचं, गेलं.नवीन वर्ष आले तसे सगळेजणं मनावरील मळभं झटकून नवी आव्हाने स्विकारायला सज्ज झालेत. नवीन योजलेल्या संकल्पांना सुरवात केल्या गेली. मोठ्या हुरुपाने योजलेले संकल्प निदान काही दिवस तरी सुरळीत बिनबोभाट पार पडावेत ही मनोमन ईच्छा बाळगून त्या नुसार आपल्या ईच्छित कार्यक्रमाची रूपरेषा प्रत्येक जण आखायला लागले.
माझा ह्या वर्षीचा संकल्प म्हणजे पहाटेची भटकंती .प्रभातफेरी मारायचा अगदी ठाम निश्चय झाला होता.पहाटे फिरण्याचे फायदे डाँक्टरांनी तसेच नियमीत फिरायला जाणा-यांनी वेगवेगळ्या पध्दतीने समजावून सांगितले होते.त्यामुळे रात्रीच व्यवस्थित दोनदोनदा गजर लावलेला तपासून घेतला.पुलंनी रोजनिशीत लिहील्या प्रमाणे झोपेतच गजर बंद करुन परत झोपणे,उशिरा जागे झाल्यावर लौकर जाग आली नाही ह्या सबबीखाली परत झोपणे असे काहीही करायचे नाही,असे मनाला वारंवार झोपतांना बजावले.रात्रीच फिरायला जायचे शूज,स्वेटर,शाल स्कार्फ काढून ठेवले .
गजर गजरात वाजला आणि आजपासून रात्र खूपच लहान झाली की काय असा प्रश्न पडला.झोप नीट मनासारखी न झाल्याचं फील आलं.तरीही मनाचा हिय्या करुन उठले.भराभर आपलं आवरून फिरायला जायला बाहेर पडले.
नियमीत फिरायला येणा-या बायका तेरड्याचा रंग तीन दिवस ह्या नजरेने बघताहेत असं उगाचच वाटून गेलं.फिरायला येणाऱ्या मंडळींची बरीच गर्दी रस्त्याने होती.तेव्हा नियमित फिरायला येणाऱ्या काकूंनी ,ही गर्दी पंधरा जानेवारी नंतर आपोआप कमी होईल ही दाव्याने खात्री दिली.ज्या रस्त्याने फिरायला जायचे त्या रस्त्याने रागात,लाडात येणारी कुत्री नाहीत नं ह्याची आधीच खातरजमा करुन घेतली होती.
पहाटेपहाटे मस्त फिरतांना फुललेली फुले,हवेने डोलणारी झाडे,निवांत रवंथ करणारे प्राणी, मंजुळ कलरव करणारे पक्षी बघत बघत सैर करण्यात खूप जम्मत असते हे फक्त ऐकून होते. ऐकलेल्या सगळ्याच गोष्टी ख-या नसतात ह्याची परत एकदा खात्री पटली.माणसांइतकीच कुत्र्यांनाही माणसांच्या संगतीत प्रभातफेरीची गरज असते हे नव्यानेच उमगले.
फिरुन आल्यावर खूप उत्साह वाटतो हे त्रिकालाबाधित सत्य असल्यासारखे ठोकून सांगितलेला ऐकीव दाव्याचा अनुभव तसा आला नाही हे पण नक्की. मग हळूहळू सवय झाल्यानंतर ते फील येत हे नव्याने कळलं.
फिरायला गेल्यानंतर वेगवेगळ्या हिरव्या रंगाची द्रव्ये बाटल्यांमध्ये भरलेली दिसली.उगीचच कडक चहाची आठवण आली आणि त्या रसांकडे बघून ढवळायला लागलं.
अशात-हेने वेगळे अनुभव घेत का होईना प्रभातफेरी सुरू तर केली.काही कालांतराने आवडायला लागेल ह्या अनुभवी महिलांच्या सांगण्यावर विश्वास असल्याने सध्यातरी साखरझोप आठवत आठवतं प्रभातफेरी सुरू ठेवलीय. पण जोक अपार्ट साखरझोेतप कितीही चांगली वाटतं असली तरी पहाटे फिरणं हेच तंदुरुस्त तब्येतीसाठी अत्यावश्यक बिनखर्चिक औषधं आहे हेच खरे.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈