सुश्री प्रज्ञा मिरासदार
विविधा
☆ — शुद्धलेखन व शुद्ध बोलणे… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆
मागच्या आठवड्यात व्हाट्सअप वर एका लेखिकेची पोस्ट वाचली. तिने बोलीभाषा, प्रमाणभाषा, शुद्ध भाषा याविषयी विचार मांडले होते. त्याविषयी लिहिताना लेखिका म्हणते की,एका साहित्य संमेलनात अनेक जण बोलताना अशुद्ध उच्चार करत होते.( मी ग्रामीण अशुद्ध भाषेविषयी सांगत नाही).
तर ही मराठी साहित्य संमेलनातील भाषा आहे. ती शुद्ध मराठी असावी अशी साहजिकच अपेक्षा असते. पण तिथे न आणि ण यातील उच्चारांची गल्लत केली जात होती. उदा.- अनुभव न म्हणता अणुभव म्हणणे,मन ला मण म्हणणे वगैरे . मराठी साहित्य संमेलना सारख्या ठिकाणी या चुका अक्षम्य मानल्या जायला पाहिजेत.
दर 20 कोसांवर भाषेची बोलण्याची लकब, ढब, लहेजा बदलला जातो ही खरी गोष्ट आहे. पण ण आणि न ही मुळाक्षरे असून त्यांच्या उच्चारात बदल होता कामा नये. ज्यांनी साहित्याचा, भाषेचा अभ्यास केला आहे, त्यांनाच साहित्य संमेलनात भाषण करण्याचा मान मिळतो. किमान त्यांच्याकडून तरी शुद्ध बोलण्याची न ला ण किंवा ण ला न म्हणण्याची अपेक्षा असणारच. न ण बदल केल्यामुळे काही वेळा अर्थही बदलतो.
जर साहित्य संमेलनात भाषण करणारी व्यक्ती अशुद्ध बोलत असेल तर त्याचे कारण ती व्यक्ती लहानपणापासूनच तसे बोलत असणार. तेच वळण त्यांच्या जिभेला लागलेले असणार. पण साहित्याचा अभ्यास करताना प्रयत्नपूर्वक ते वळण बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नसावा.
मी सुद्धा एका शहरात पाच वर्षे राहिले तिथे भाषेचे उच्चार बऱ्याच प्रमाणात अशुद्ध असत. उदा. – “ती यायला लागली होती”. या ऐवजी “ती यायली होती” असे म्हटले जाते. शिकले सवरलेले लोक, कॉलेजमध्ये शिकवणारे प्राध्यापकही असेच बोलत. (अजूनही असेच बोलतात). तेव्हा खरंच आश्चर्य वाटते. माझा धाकटा मुलगा तिथे असताना खूप लहान होता. तिथेच बोलायला शिकला. आजूबाजूच्या भाषेचा त्याच्या बोलण्यावर खूपच प्रभाव होता. नंतर आम्ही आमच्या मूळ गावी आलो तेव्हा काही वर्षांनी त्याच्या बोलण्याची ढब बदलली.
हे झाले बोलण्याविषयी ! पण लिहिणे सुद्धा किती अशुद्ध असावे याला काही सुमारच नसतो. वेलांटी, उकार यांच्या चुका लिखाणात खूप सापडतात. त्यानेही अर्थ फारच बदलतो. उदा.- तिने हा शब्द तीने, तीन, तीनं असा लिहिलेला अनेक वेळा वाचनात आलेला आहे. तो फार तर तिनं असा बरोबर आहे. पण या अनुस्वारांचीही चूक होतेच. नको तिथे तो दिला जातो. पाहिजे तिथे दिला जात नाही. “मी जाणारच नाही” या ऐवजी “मी जाणारंच नाही” किंवा “मी जाणारचं नाही” असं लिहिलं जातं. गंमत म्हणजे या “असं लिहिलं जातं” या वाक्या ऐवजी “अस लिहिल जात” असे वाक्य ही वाचण्यात येते. तिथे कुठेच अनुस्वार दिला जात नाही. पण तो देणे आवश्यक असते.
बोलीभाषा बदलते म्हणून लिहिताना भाषा बदलायला नको. आपल्या भाषेचा आपल्याला अभिमानच असायला हवा. पण चुकीचे उच्चार करून, चुकीचे लिहून आपणच आपल्या भाषेचा अपमान करतो आणि हे बोलणाऱ्याच्या, लिहिणाऱ्याच्या लक्षातच येत नाही- ते यायला हवे.
मी एक पोस्ट वाचली त्यात एका रांगोळी प्रदर्शनाला येण्याचे आवाहन केले होते. त्या पोस्टमध्ये इतके चुकीचे शब्द लिहिले गेले होते की मला वाटले त्या बाईला वैयक्तिकरित्या मेसेज करावा आणि तिच्या चुका दाखवून द्याव्यात. “औचित्य” हा शब्द तिने “आवचित्त” असा लिहिला होता. “संपूर्ण” न लिहिता “संपुर्ण” , “पहायला” ऐवजी “पाहायला”, “रांगोळी रुपात” लिहिताना तिने “रांगोळी रुपातंर” असे लिहिले होते. “एकत्रित” ऐवजी “एकत्रीक”, “पाहण्याची” ऐवजी पाहन्याची, “प्रोत्साहन” न लिहिता “प्रोच्छाहन”, “ठिकाण” ऐवजी “ठिकान”, आणि आर्टिस्ट ऐवजी “आर्टिष्ट” असे चुकीचे शब्द लिहिलेले होते.
हे सर्व वाचून मला कसेसेच झाले. आपला समाज भाषेच्या उच्चाराबाबत, लिखाणाबाबत इतका मागास असावा, यावर विश्वास बसत नाही.
हल्ली इंग्रजी बोलता येणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. बोला ना! इंग्रजी मध्ये बोलणे, इंग्रजी येणे, तेही आवश्यक आहे. पण आपल्या भाषेबाबत ही सजगता का नाही दाखवली जात?
विचार करण्याजोगी ही गोष्ट आहे, हे नक्कीच ! यात काही जादू तर घडणार नाही, की जेणेकरून भाषेचे उच्चार व लिखाण सुधारेल. तरीही असे वाटते की शुद्ध मराठी भाषेचे पुनरुत्थान आवश्यकच आहे. ती शुद्धच लिहिली गेली पाहिजे. बोलताना प्रमाण भाषेचे भान ठेवून बोलली गेली पाहिजे. निदान भाषण करताना तरी याचे भान असावे, ही किमान अपेक्षा आहे.
© सुश्री प्रज्ञा मिरासदार
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈