सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “०९|०२… एक विशेष  दिवस” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

नऊ फेब्रुवारी. ही  तारीख बाबा आमटे ह्यांचा स्मृतीदिन. बाबांचे आनंदवन उभे करण्याचे, कृष्ठरोग्यांचे काळजी घेऊन त्यांना समाजिक पत मिळवून कामास लावणे हे बाबांचे कार्य माहिती नसलेली व्यक्ती विरळीच. याच तारखेला माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकापैकी एका पुस्तकाच्या लेखनाची सुरवात त्या लेखकाने केली होती. ते पुस्तक म्हणजे “श्यामची आई” आणि ते लेखक म्हणजे आपल्या सगळ्यांना आदर्शवत असलेले साने गुरुजी. साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना ‘श्यामची आई’ या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल.

हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे. खूप सारं शिकवणारं, शहाणपणा म्हणजे काय, किंचित कठोर माया म्हणजे काय हे ह्या पुस्तकाने शिकवलयं. हे पुस्तक वाचतांना डोळ्यातील पाणी, मनातील भावना उचंबळून येतात.

व्यक्तीपरत्वे, वयापरत्वे आवडीनिवडी ह्या बदलत जातात वा निरनिराळ्या असतात. परंतु काही गोष्टी ह्या कुठल्याही व्यक्तींना, कुठल्याही वयात आवडतातच. त्यांच दर्शन झाल्याबरोबर मन वा जीभ त्याला नकार हा देतच नाही, दिसल्याबरोबर कुठल्याही वयात ह्या गोष्टी साठी कायम हात पुढेच येतो. ती गोष्ट म्हणजे चाँकलेट.

आज व्हँलेंटाईन वीक मधील तिसरा दिवस, चाँकलेट डे. चाँकलेट म्हंटलं की मला आधी आठवते ती माधुरी, लाखो दिलोंकी धडकन, तीची ती हम आपके है कौन मधील चाँकलेट खाणारी “निशा”बघीतली की दिल खल्लास. माधुरी आणि चाँकलेट दोन्हीही माझे प्रचंड आवडते. चाँकलेट त्यातल्या त्यात डेअरी मिल्क कँटबरीज ची आवड ही माझ्यात आणि माधुरीत काँमन.

आज व्हँलेंटाईन उत्सवातील चाँकलेट डे. त्यावरून दरवर्षी प्रमाणे उद्या रस्त्यांवर चाँकलेट कँडबरीज चे रँपर्स अस्ताव्यस्त पडलेले दिसतील ह्या विचाराने खरचं विषण्ण वाटतं.  असे सार्वजनिक ठिकाणी चाँकलेट, कँडबरीज चे रँपर्स बेजबाबदारपणे फेकलेले बघून सुजाण नागरिकत्व नावाची काही चीज असते ह्या वरचा विश्वासच उडतो.

मुळात हा असा वेगळा म्हणून काही चाँकलेट डे असतो हे आता आता खर तर समजायला लागलं आहे. कारण बोलता यायला लागल्यापासून आमचा चाँकलेट डे म्हणजे आईने सगळ्यांना एकाचवेळी वरच्या फळीवरच्या डब्यातून सगळ्यांना समसमान मोजूनमापून हातावर टिकवलेलं चाँकलेट म्हणजे आमचा चाँकलेट डे. दुकानात जावून स्वतः सर्रास चाँकलेट्स मनाने, न विचारता विकत घेऊन येण्याची प्राज्ञाच नसायची तेव्हा. आमच्या लहानपणी तर चाँकलेट्स म्हणजे कँटबरीज ही संकल्पना ही कळली नव्हती.

आमचे तेव्हाचे चाँकलेट्स म्हणजे आँरेंज पेपरमींटच्या गोळ्या, रावळगाव चाँकलेट पारले चाँकलेट्स. काही काळाने ती संकल्पना राजमलाई ह्या चाँकलेट पर्यंत येऊन थांबली. माहेरच्या आडनावाचे राजमलाई अजूनही खूप प्रिय आहे. तेव्हा बाबा पगार झाल्यावर एकदा रानडेंच्या दुकानातून स्ट्रॉबेरी चे रंग रुप आकार असलेले, साखरेचे चाँकलेट घेऊन द्यायचे त्याच खूप अप्रुप वाटायचं, त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे आणि आनंद मनात तसाच तेवतोयं. मला वाटतं तेव्हा मिळणारी अल्प प्रमाणातील गोष्ट कदाचित जास्त आनंद देऊन जायची. वाट पाहून नंतर मिळणारी गोष्ट वेळेची किंमत समजवायची.

चाँकलेट्स अनेक फायद्यापैकी एक प्रमुख फायदा मध्यंतरी वाचनात आला. कँडबरी बाईट्स ह्या डिप्रेशन म्हणजेच मानसिक तणाव ब-याच प्रमाणात कमी करतात म्हणे. म्हणून मी तणाव यायच्या आधीच कँटबरीज खाल्याने तो तणाव आसपासही फिरकतं नाही. अशी मी मनाची समजूत घालून मस्त कँडबरीज चा आस्वाद घेत असते.

चला परत एकदा ह्या निमीत्ताने कँडबरीज ला न्याय देणार. लहानपणी आपण पुढे काय करिअर काय करायचं तर मनात सर्वात आधी यायचं आपण नक्की कँडबरीची फँक्टरी टाकायची. लहानपणची स्वप्नं पण खूप अफलातून असतात, नाही का?

परत एकदा मनापासून चाँकलेट डे च्या शुभेच्छा देऊन मनापासून आपल्या दातांची आणि असल्यास शुगरची काळजी घेऊन कँडबरीचा आस्वाद घेऊन बघा कसं मस्त तणावरहीत वाटतं ते, मग घरच्या लहानग्यांनी आश्चर्याने बघितलं तरीही.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments