श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “आमचं…आणि यांच…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
अर्थातच हे सगळ्या घरांच्या बाबतीत आहे. घरात माझं आणि तुझं असं नसलं तरी आमचं आणि यांचं यातला फरक बऱ्याचदा बोलण्यात जाणवतो……
आमचं आणि यांचं सारखंच असलं तरी सुद्धा बोलतांना यांचं असतं ते विशेष, खास, त्यात विविधता, नाजूकपणा, कलाकुसर, रंग, डिझाईन, कलात्मक असं सगळं असतं. आणि आमचं मात्र असंच असतं…….. साधं……. सरळ…… सहज…
कपडे आणि दागिने या बाबतीत हे फार जाणवतं. म्हणजे आमचे ते कपडे. यातही शर्ट पॅन्ट, झब्बा लेंगा, फारफार तर सुट. पण यांच्या कपड्यांच्या बाबतीत बोलतांना सुध्दा कोणतीही सुट नसते……
यांची नुसती साडी नसते. तर त्यात शालू, पैठणी, कलकत्ता, सिल्क, महेश्वरी, कांजीवरम असं आणि बरंच काही असतं. परत यात सहावारी आणि नऊवारी असतंच. आणि ते तसंच म्हणावं लागतं. ऊतप्याला मसाला डोसा म्हटल्यावर, किंवा पुलाव ला खिचडी म्हटल्यावर जशा प्रतिक्रिया येतील, तशाच प्रतिक्रिया नऊवारी ला नुसती साडी म्हटल्यावर येऊ शकतात. घरात रोज नेसतो ती आणि तीच साडी. अर्थात रोज नेसली तर. आमचं मात्र घरात काय आणि बाहेर काय? शर्ट पॅन्ट च असतं.
मग आमच कापड अगदी रेमंड, विमल, सियाराम, किंवा कोणतही चांगल्या ब्रॅंडच असलं तरीही शर्ट आणि पँट….. किंवा झब्बा आणि लेंगा…….
यांच्या दागिन्यांचं तसंच…. आमची ती फक्त चेन. पण यांच कोल्हापूरी साज, मोहनमाळ, चपलाहार, नुसत्या मोत्यांची असली तरी ती माळ नाही. तर सर….. आणि परत याची सर काही औरच असते….
आम्ही आमच्या गळ्यातल्या चेन कडे चेन म्हणूनच पाहतो. पण यांच गळ्यातलं मंगळसूत्र पाहण्याचं सूत्र काही और असत. ते सुत्र काय? हे एक औरतच सांगू शकेल.
कानाला अडकवणारे आमच्यात कमीच असतात. पण आमची ती फक्त भिकबाळी. कसं वाटतं नं हे. पण यांचे कानातले खड्यांचे, झुंबर, किंवा रिंग.
आम्ही पीटर इंग्लंड, काॅटनकिंग या सारखा चांगलं नांव असलेला शर्ट घातला तरी तो फक्त शर्टच. पण यांनी खड्यांच काही घातलं की ते मात्र अमेरिकन डायमंड. या दागिन्याला खड्यांचं असं म्हटलं तर काही वेळा खडे बोल ऐकावे लागतात.
आमच्या मनगटावर फक्त घड्याळ किंवा ब्रेसलेट. पण यांच्या मनगटावर काही चढवलं तर ते बांगड्या, पाटल्या, तोडे, कंगन असं वैशिष्ठ्य पूर्ण. परत हे मनगटावर चढवण्याचा यांचा क्रम सुध्दा यांनी ठरवलेला असाच……. यात मागे, मधे, पुढे असंच असतं. शाळेत कशी रांग आणि रांगेची शिस्त असते तसंच…….
आमच्या पोटावर पॅन्ट रहावी म्हणून आम्ही घालतो तो पट्टा. चामड्याचा किंवा कापडाचा. त्याकडे निरखून पाहिलं जाईलच असं नाही. बऱ्याचदा पुढे आलेल्या पोटामुळे तो झाकला जातो. पण यांच्या कमरेचा मात्र कंबरपट्टा तोही चांदी किंवा सोन्याचा. आमच्या पॅंटला अडकवलेलं कि चेन. पण यांचा मात्र छल्ला. मग त्यात किल्ली नसली तरी चालतं.
फुल, गजरा, आणि वेणी यात फरक असतो हे पण माझ्या लक्षात आलं आहे. आणि गजरा की वेणी यापैकी काय घ्यावं याचापण विचार होतो.
बरं हे फक्त कपडे आणि दागिने यांच्याच बाबतीत नाही. खास कार्यक्रमाआधी आमचे केस वाढले तर, कटिंग करा जरा. हेच वाक्य असत. वाक्य कितीवेळा म्हटलं यावर सुर वेगळा असू शकतो. पण यांचे केस नुसते व्यवस्थित करायचे तरी यांना पार्लर आणि त्यासाठी वेळ घ्यावा लागतो. किंवा ती बाई घरी येणार. आम्ही मात्र कटिंगच्या दुकानाबाहेर टाकलेल्या लाकडी बाकावर हातात मिळेल तो पेपर वाचायचा.
असं आमचं आणि यांचं………
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈