श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “नियम व अटी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
हा प्रसंग महाभारताच्या युध्दासारखा होता असं नाही. पण आपल्याच माणसांविरुध्द युद्ध करायचं हे अर्जुनाला पटत नव्हतं. आणि माझंही तसंच झालं होतं. विजय मिळणार याची खात्री अर्जुनाला होती. तरीही तो खूष नव्हता. आणि आपल्याला विजय मिळवणार नाही याची खात्री मला होती. म्हणूनही कदाचित मी नाखूष असेन. कारण… कारण समोर लढायला बायकोच होती. आणि तिच मला तु जिंकशील फक्त लढायला तयार हो असा सल्ला देत होती. शत्रु दिलदार असावा, हे बायकोकडे बघितल्यावर समजतं. खरंच ती दिलदार (शत्रु) असते.
लढायचं होतं ते बायकोने घातलेल्या नियम आणि अटिंविरुध्द. आता मी अटी मान्य केल्याशिवाय ती नियम सांगणार नव्हती. आणि नियम सांगितलेच तर ते पाळायची अट होती. इकडे आड आणि तिकडे विहीर…… या पध्दतीने मी इकडे नियम आणि तिकडे अटी या मध्ये अडकलो होतो. अटीतटीची परिस्थिती होती.
मी युद्ध न करता हार मानली तरीही काही नियम व अटी मान्य करण्याचा तह मला करावा लागणार होता. आणि हा तह कदाचित तहहयात सुरू राहिला असता.
माझा आळस झटकण्यासाठी, व वाढलेले पोट आटोक्यात आणण्यासाठी आहेत असा मुलामा त्या नियम व अटींना लावण्यात आला होता.
नियम पहिला… रोज सकाळी न चुकता सहा वाजता उठायचच. अट अशी होती की मी उठल्यावर सुध्दा बायकोला मात्र उठवायचं नाही.
नियम दुसरा… सकाळी उठल्यावर जिना उतरून खाली जायचं आणि दुध आणायचं. (कशाला हौसेने आठव्या मजल्यावर फ्लॅट घेतला असं वाटलं) लिफ्ट ने जायचं नाही. येतांना लिफ्ट वापरली तर चालेल. (कदाचित माझ्या व्यवस्थित पणामुळे दुधाची पिशवी पडून फुटेल का? असा विचार असावा) अट आपलं दुध आपणच आणायचं. पाचव्या मजल्यापर्यंत जाऊन अरे येतांना माझंही घेऊन ये असं मित्राला सांगायचं नाही. त्यांच्याकडे सुध्दा असेच नियम व अटी आहेत, त्यामुळे ते भेटू शकतात.
नियम तिसरा… कोणीही पहिल्यांदा उठलं तरी (नियमानुसार मीच पहिल्यांदा उठणं अपेक्षित होतं) चहा मात्र मीच करायचा. अट अशी की बायको उठल्याशिवाय चहा करायचा नाही. कारण तिला ताजा, आणि गरम चहा लागतो. नंतर गरम केलेल्या चहाला ताज्या चहाची चव नसते. आणि तो प्यायल्याचं समाधान पण नसतं. असं तिचं म्हणणं.
आता चहा मी करणार याचंच काय ते तिला समाधान. बाकी पदरी पडलं पवित्र झालं हिच भावना. कारण चहाची चव. असो.
स्वयंपाक घरातली अगणित आणि न संपणारी कामं तिला असतात म्हणून चहा माझ्याकडे. (तो प्यायल्यावर काम करायला उत्साह वाटला पाहिजे हि अट (कळ) होतीच.)
जीना उतरायचं, चालत जाऊन भाजी आणायचं समजू शकतो. पण मी चहा करण्याचा आणि पोट कमी होण्याचा काय संबंध? माझा (हळू आवाजात) प्रश्न.
चहा साखरेच्या डब्यांची आणि भांड्यांची जागा बदलली आहे. खाली वाकल्याशिवाय डबे आणि टाचा व हात उंच केल्याशिवाय भांड हाताला लागणार नाही. कपबशांच्या जागेचा विचार सुरू आहे. थोडक्यात समर्पक उत्तर.
सगळा गनिमी कावा ठरल्यामुळे भांडणात काही अर्थ नव्हता.
नियम चौथा… आठवड्याची भाजी आणून ठेवायची नाही. रोज एक आणि ताजी भाजी कोपऱ्यापर्यंत चालत जाऊन आणायची. अट फक्त भाजी आणायची मधे सुटे पैसे घेण्याच्या कारणाने पानाच्या दुकानात थांबायची गरज नाही. भाजीवाले देखील सुटे पैसे ठेवतात.
नियम पाचवा… स्वयंपाक घरात विनाकारण लुडबुड करायची नाही. तुम्ही आणलेली भाजीच घरात होते. काय केलं आहेस हे विचारायच नाही हा नियम. आणि अट अशी की घरातली भाजी आनंदाने खायची.
चेहरा वाकडा करुन काही बदलत नसतं हे लक्षात ठेवा. माझा अनुभव आहे. नाहीतर कधीच आणि बरंच काही बदललं असतं. पण आता ते कधीच बदलणार नाही. (हे सत्य परिस्थितीवर केलेलं दमदार भाष्य ऐकून माझा चेहरा पाहण्यासारखा झाला असावा.) पुढे मी मुद्दाम वाकड्यात शिरलो नाही.
नियम सहावा… बाहेर जाण्यासाठी कपाटातून कारण नसतांना दोन चार ड्रेस बाहेर काढायचे नाहीत. आणि अट बाहेर काढलेल्या ड्रेस पैकीच एक बऱ्यापैकी असणारा (मॅचिंग पाहून. उगाच खाली पॅंट आणि वर शर्ट असं घातलं की झालं हि वृत्ती नको) घालावा. नाहीतर कपाटातून दोन चार ड्रेस काढायचे, पण घालायचा मात्र दारामागे लटकवलेला. हे चालणार नाही. नंतर आवराआवरी करायला तुम्ही येत नाही. आणि आता माझ्याकडून ही जास्तीची कामं होणार नाही.
नियम सातवा… भाजी, दुध आणतांना गुडघेदुखी ची तक्रार वारंवार बोलून दाखवायची नाही. अट जर तक्रार करायचीच असेल तर गुडघ्याबरोबरच आम्हाला डोकंपण दिलं आहे हे लक्षात ठेवा. ते दोन्ही दुखतात. तुमचा सुर कायम तुमच्या गुडघेदुखी बद्दल असतो. (यावेळी डोक्याचा उल्लेख जाणिवपूर्वक टाळला होता.) त्यामुळे भान ठेऊन आमच्या पण तक्रारी तक्रार न करता ऐकाव्या लागतील. आम्हाला काही सोळावं लागलेलं नाही. (कितवं लागलं आहे आहे?…… हे विचारण्याच्या मोह मी आवरला…….)
लग्नात सप्तपदी वेळी काही वचनं असतात. त्यावेळी कदाचित विधीचा एक भाग म्हणून ती दिली असतील. पण आता या सप्तपदी सारख्याच सात नियम व अटी होत्या. आणि पावला पावलावर त्या वचनाप्रमाणे वदवून घेतल्या जात होत्या. यालाच विधिलिखित म्हणावं का……
अजूनही आहेत. पण नंतरचा नियम असा आहे, की बातम्यांसारखे नियम सांगत बसायचे नाहीत. ते गोपनीय आहेत. आणि गोपनीयतेची अट पाळायची आहे.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
छान ,