सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸 

☆ “जरा याद उन्हे भी करलो” ☆ सुश्री शीला पतकी 

गोष्ट स्वातंत्र्यपूर्व काळातील……  

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक तरुणांनी या यज्ञात उडी घेतली ..सगळी तरुणाई देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे याच भावनेने काम करीत होती. आपले घरदार सोडले.. नातेवाईक सोडले ..खाणे पिणे कशाची पर्वा केली नाही….. 

त्यातलाच एक मुलगा होता चांदोरकर ! मूळचा अलिबागचा पण त्या ठिकाणी केलेल्या कारवायामुळे त्याच्यावर पकड वॉरंट होतं. तेथून तो अनेक ठिकाणी जागा बदलत बदलत सोलापुरात आला. सोलापुरात अशा भूमिगतांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे आमराई.  इथे ही स्वातंत्र्यवेडी मंडळी गावोगावी फिरून येत असत. तेथून संदेशाचे वहन व्हायचे.. निरोप जायचे.. योजना समजायच्या ! सोलापुरात हे ठिकाण अमराई मध्ये होते आणि आमराई ही रेल्वे स्टेशनला लागून होती. अर्थात सोलापूरच्या स्टेशनपासून बरीचशी लांब म्हणजे तीन चार किलोमीटर पुढे असलेलं बाळे स्टेशन जे आहे ते बाळे स्टेशन आणि सोलापूर स्टेशन याच्यामध्ये गाडीतून उडी मारून उतरून आमराईत घुसावे आणि माणूस कुठे गेला पत्ता लागू नये अशी ती घनदाट आमराई होती. या स्वातंत्र्य वीर क्रांतिकारकांना ही जागा म्हणजे मोठी पर्वणीच होती. अनेक क्रांतिकारक त्या ठिकाणी लपून राहत असत, तसाच हा चांदोरकर तेथे लपून राहिला. 

एके दिवशी त्याच्या एका मित्राने अलिबागवरून संदेश आणला की त्याच्या आईला उंदीर चावला असून ती त्या विषाने अत्यवस्थ आहे आणि अगदी शेवटचे क्षण मोजत आहे. पण आपला हा 20-22 वर्षाचा मुलगा भेटावा ही तिची शेवटची तीव्र इच्छा होती. हा निरोप ऐकल्यावर मात्र मातृभूमीची सेवा करायला निघालेला चांदोरकर माझ्या वडिलांच्या खांद्यावर मान ठेवून ढसाढसा रडला… माझे वडील तरी किती 25/ 26 वर्षाचे त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे.. त्याच्या थोरल्या भावाच्या वयाचे.  त्यांनी त्याची समजूत काढली. तो म्हणाला,” पत्की काही झाले तरी मला आईला भेटलेच पाहिजे रे.. मी आईला न भेटता राहिलो तर जन्मभर हे शल्य मला रुतून राहील “..वडील ही भावूक झाले.  ते म्हणाले मित्रा काळजी करू नकोस.  तुझ्यावर पकड वॉरंट आहे, तुला उघड प्रवास करता येणार नाही की. मग आता तू माझ्या घरात आलायस तेथून सुद्धा तुला बाहेर पडणे अवघड आहे, कारण पांजरपोळ चौकात पोलिसांच्या चौक्या बसलेल्या, त्याच्या आधी अलिकडे आमच्या घरापुढे असलेल्या चौकात ही चौक्या..  त्यामुळे तेथून बाहेर पडणे खरोखर अवघड होते ….पण वडील निरनिराळे वेशांतर करून काम करीत असत.  त्यामुळे त्यांनी लगेचच दोघांचे वेशांतर केले. 

स्वतःचे वेशांतर म्हाताऱ्या कानडी माणसात आणि तसेच मुलाचे वेशांतर कानडी मुलात केले म्हणजे लिंगायत मुलांमध्ये, आणि त्याला सांगितले की तू मुका आहेस हे लक्षात ठेव .कारण त्याला कानडी येत नव्हतं त्यामुळे तो मुका आहे हे सांगितले.  वडिलांना खूप छान कानडी येत होते .गळ्यामध्ये लिंग, डोक्याला मुंडासं असून झुपकेदार मिशा आणि किंचित  मेकअप करून ते दोघे संध्याकाळी आमच्या वाड्यातून बाहेर पडले.  संध्याकाळी थोडासा अंधार तो बराच गडद वाटत होता कारण त्या काळात लाईट नव्हते.  तेथून त्यांनी चौकी पार केली तरी पांजरपोळ चौकीत त्यांना एकाने विचारले की कुठे चालला आहात तर त्यांनी सांगितलं पोराला एसटीला बसवतो. त्याला बोलता येत नाही आणि मग त्यांनी खातरजमा करून त्यांना सोडून दिले.  

पुढे त्याच रस्त्याने ते दोघे चालत चालत 14 कमानी पर्यंत आले.  पूर्वी बाळ्याला एक ओढा होता आणि त्याला 14 कमानी होत्या. तिथे गुरांना चरण्याची शेती होती म्हणजे गुरांचा चारा त्या ठिकाणी पिकवला जात असे त्याच्यासाठी लागणारे पाणी आसपास असणाऱ्या मिलमधून सोडण्यात येत असे. पावसाळ्यात त्या 14 कमानीत पाणी आले की बाळ्याचा ओढा दुथडी भरून वाहत असे आणि मग वाहतूक बंद व्हायची.  परंतु तशी फारशी परिस्थिती नव्हती त्यामुळे त्या ओढ्यातून दोघांनाही चालत जाता आले. पुढे शेतातून रस्ता काढत काढत बाळे स्टेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. रात्रीची दहाची पॅसेंजर ती सोलापूरहून निघाली की पहिलं स्टेशन बाळे..  तिथे एक मिनिटभर थांबत असे तेवढ्यात एका वेशांतरीत पोराला चढवणे गरजेचे होते.  पण लक्षात आले की या मुलाने काही खाल्लेच नव्हते दिवसभर आणि पुढे अलिबागपर्यंतचा प्रवास कसा होईल ते सांगता येत नव्हते तो कुठल्या स्टेशनवर उतरणार हे ठरलेलं नव्हते.  पण मग त्याला काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था करावी या दृष्टिकोनातून विचार करता तिथे शेतामध्ये काही बकऱ्या खतासाठी बसवलेल्या होत्या.  त्या गुराख्याला आठ आणे देऊन वडिलांनी एक चरवी दूध विकत घेतले आणि त्याला म्हणाले ,”चांदोरकर एवढे दूध तू पी आणि यानंतर तुला घरी पोहोचेपर्यंत खायला प्यायला मिळणार नाही “..चांदोरकरांनी ती चरवी तोंडाला लावली आणि इतक्यात गाडीची शिट्टी ऐकू आली. 

शिट्टी ऐकल्याबरोबर चांदोरकरचे हात थरथरायला लागले त्याच्या हातून चरवी खाली पडली.  दूध शेतात सांडले.  तो म्हणाला “ पतकी ही गाडी गेली आता. आता मी माझ्या आईला भेटू शकणार नाही..” 

वडील म्हणाले “ धीर सोडू नको आपण जाऊ” .. आणि दोघेही पळत पळत बाळे स्टेशनच्या दिशेने गेले. स्टेशनच्या आसपास असतानाच त्यांच्यासमोरून धाड धाड धाड करीत एक गाडी निघून गेली पण सुदैवाने ती मालगाडी होती.  दोघांचाही जीव भांड्यात पडला.  सुमारे दहा मिनिटांनी पॅसेंजर गाडी बाळ्याला आली.  बाळे स्टेशनवर फारशी गर्दी नव्हती.  अगदी तुरळ एखादा पॅसेंजर असे. वडिलांनी त्याचे पुण्यापर्यंतचे तिकीट काढले.  मुख्य म्हणजे याच्या नावाचे पोस्टर अनेक ठिकाणी लावल्यामुळे त्याचा चेहराही झाकूनच त्याला जावे लागले. चांदोरकर आपल्या आईला भेटण्यासाठी मार्गस्थ झाला….! 

वडिलांना ते समाधान वाटले.  त्यांनी वेशांतर सगळे पुसून आमराईत नेऊन टाकले आणि तेथून साधे कपडे घालून ते सोलापुरात परत आले. आमराईत कपडे बदलणे पेशांतर करण्याच्या सगळ्या सोयी आधीच करून ठेवलेल्या होत्या कारण अनेकांना  ते प्रयोग करावे लागत असत. वडील घरी पोहोचले त्यानंतर दोन दिवसाने अलिबागवरून संदेश आला …  चांदोरकर घरी पोहोचला.  तो मध्येच कुठल्यातरी स्टेशनवर उतरला आणि रातोरात ट्रकमध्ये बसून अलिबागला पोहोचला होता.  पहाटे घरी गेला .. आईला बघून त्याने हंबरडाच फोडला.  आईला मांडीवर घेतले ..  तिच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून तो हात फिरवत होता आणि आई त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत होती.  वीस बावीस वर्षाचा तो पोरगा ढसाढसा रडत होता आणि अर्ध्या तासात त्याच्या आईने प्राण सोडला……! वीस बावीस वर्षाचे ते पोर आईची सेवा करता आली नाही या दुःखाने निराश झाले होते, पण त्याने आईला वचनच दिले… की ‘ माते तुझी सेवा करता आली नाही तरी या मातृभूमीची सेवा मी मनापासून करेन.’  

नंतर चांदोरकरला अटक झाली तुरुंगवासही झाला. अशा वीस बावीस वर्षाच्या अनेक चांदोरकरांनी … अनेक तरुणांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या आयुष्यातल्या कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी गमावल्या होत्या पण त्यांना वेड होते की हा देश स्वतंत्र झाला पाहिजे.  त्यासाठी खूप हाल अपेष्टा सोसल्या, मारपिट सहन केली, निकृष्ट प्रतीचे तुरुंगातील अन्न खाल्ले, चाबकांचे फटके सोसले, तुरुंगात दोन दोन पायलीचे दळण दळले…. या सगळ्या यातना त्यांनी भोगल्या….  स्वातंत्र्याचा किती आस्वाद त्यांनी घेतला?… ठाऊक नाही.  पण एवढ्या कष्टाने मिळवलेल्या या स्वातंत्र्याची वाटचाल स्वराज्याकडून सुराज्याकडे होईल असे वाटले होते.  आज तसे होताना दिसत नाही ! टिळक आगरकरांचा महाराष्ट्र …  त्याऐवजी जाती-जातीत तेढ निर्माण करण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ही घोषणा दिली होती.  

टिळक आगरकर शाहू फुले आंबेडकर या सर्वांचेच कार्य महान आहे .. ते आपल्या सर्वांना अनेक पिढ्या मार्गदर्शन करणारे आहे .. सारेच वंदनीय.  पण हे जाती जातीत तेढ निर्माण करणारे राहील असे कधीच वाटले नव्हते.  राजकारण्याने मात्र त्याचा बरोबर फायदा घेतला.  राजकारणात सध्याचा चाललेला विचका पाहून .. या तरुणांनी का आपले प्राणार्पण केले..? का कष्ट भोगले …?असे प्रश्न निर्माण होतात.  पण तरुणाईचे ते वेड भारतातल्या रक्तारक्तात भिनले होते म्हणून ही भारतमाता आज सर्व शृंखला तोडून स्वतंत्र झाली आहे.  मला वाटतं तिलाही दुःख होत असेल .. ‘ मी स्वतंत्र झाले …पण हा देश मात्र पांगळा झालाय या विचाराने.. जातीयवादाने .. माणसा माणसातील दुराव्याने..’  

हा देश विखुरला जातोय की काय भीती वाटायला लागली.. विविध रंगाच्या फुलांचा जणू गुच्छ असावा तसा आपला देश आहे.  विविध संस्कृती- विविध भाषा- विविध चालीरीती- विविध प्रांत – तरीही ‘आम्ही सगळे भारतीय आहोत’ हा ध्यास मधल्या पिढीला होता..  तो आता लुप्त होताना दिसत आहे याचे वाईट वाटते.  गेल्या  15 ऑगस्टला मी वडिलांच्या फोटोसमोर हार घालताना म्हणाले होते, “ दादा तुम्ही पाहिलेले स्वप्न आमची पिढी सत्यात उतरू शकली नाही म्हणून माझ्या हातातला हा हार आहे की आमची हार आहे हेच मला कळत नाही “…. 

पण वडिलांच्या फोटोतून नकळत मला एक आवाज येत होता की ‘ बाळा हा देश इतका दुबळा नाही की कुणा दोन-चार राजकारण्यांच्या कुरापतीने ढासळून जावा.  लक्षात ठेव रात्रीनंतर रोज एक पहाट उगवत असते आणि ती सुराज्याची असेल अशी आशा आणि कामना कर देव तथास्तु म्हणत असतो ….! ‘ वडिलांच्या या वाक्यावर मी स्वतःलाच विचारले की का नकारात्मक विचार करावा आपण ? माझ्या देशात चांगले काही खूप आहे ते सकारात्मकतेने घेऊयात ना..  मग त्यात काय बिघडलं आणि ती सकारात्मकतेची ऊर्जा नक्कीच आपल्याला प्रगतीपथावर नेईल.  आता त्याची सुरुवात ही झालेली आहे नाही का?…..!

!! वंदे मातरम् !! .. !! जय हिंद !! 🇮🇳

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments