सुश्री नीता कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ “चातुर्मास माझ्या आवडीचा… खाद्यसंकृतीचा…” भाग-२ ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

(पिठोरीची पूजा होऊन  श्रावण संपायचा.) — इथून पुढे — 

तोपर्यंत गौरी गणपतीची चाहूल लागलेली असायची.

पार्वतीला जसा शंकर मिळाला तसा चांगला नवरा मिळावा म्हणून हरतालिकेचा उपवास मुलींना करायला त्यांच्या आया सांगायच्या. मुलींच्या उपवासाचे घरात कौतुक असायचं. खजूर, केळी, सफरचंद आणले जायचे. खास बदामाची खीर केली जायची.

गणपतीची  तयारी तर जोरदार असायची. गणपतीची आरास करायचं काम मुलांचं असायच. पुठ्ठे रंगवून, चित्रं काढून… दरवर्षी नविन काहीतरी करायचे.

गणपतीच्या नेवैध्याला उकडीचे मोदक असायचे. वडिलांना आवडतात म्हणून गुळाच्या सारणाचे तळलेले मोदक केले जायचे.

रोज संध्याकाळी आरतीला वेगवेगळा प्रसाद असायचा.

ऋषिपंचमीला बैलाच्या कष्टाचे काही खायचे नाही असा संकेत असायचा. गंमत म्हणजे ती स्पेशल भाजी त्या दिवशी विकायला यायची. महाग असली तरी ती आणली जायची. ऋषीपंचमीचं म्हणून असं खास काळं मीठ मिळायचं. ते आई, आजीसाठी आणलं जायचं.

गणपतीच्या मागोमाग  गौरी यायच्या. यायच्या दिवशी तिला मेथीची भाजी आणि भाकरी असा नेवैध असायचा. दुसऱ्या दिवशी गौरीचा थाट काय विचारता? पंचपक्वांन्न, सोळा भाज्या, पाच कोशिंबिरी, कढी, पंचामृत असा साग्रसंगीत बेत  असायचा.  डाळिंबाच्या दाण्यांची कोशिंबीर पाच फळं घालून   वर्षातून एकदा त्या दिवशी होत असे.

शिवाय गौरीपुढे ठेवायला करंजी, अनारसे, बेसनाचे लाडू केले जायचे. गौरी विर्सजनाला मुरडीचा कानवला आणि दहीभात  असायचा.

अनंत चतुर्दशीला कोरडी वाटली डाळं आणि दही पोहे केले जायचे. गणपती बरोबर शिदोरी म्हणून दही पोहे दिले जायचे. तेही पातेलेभर केले जायचे. त्या दिवशी रात्री जेवायची भूक नसायची.

गणपती झाल्यावर थोडे दिवस सुनेसुने जायचे. की नंतर नवरात्रीचा सण यायचा. नवरात्रात काही बायकांचे नऊ दिवस उपास असायचे. तिला “उपवासाची सवाष्ण ” म्हणून खास आमंत्रण देऊन बोलावले जायचे. तिच्यासाठी स्पेशल पदार्थ केले जायचे.

 भगरीचे धिरडे, शिंगाड्याच्या पुऱ्या, श्रीखंड असा बेत करायचा. बटाट्याची गोड, तिखट कचोरी व्हायची. एकीपेक्षा दुसरी काहीतरी वेगळं करायची. आईने एकदा उपवासाचे दहीवडे केले होते त्याचे खूप कौतुक झाले होते.

तेव्हा नवरात्रात  घरोघरी भोंडला व्हायचा. पाटावर  रांगोळीने हत्ती काढायचा. ऐलोमा पैलोमा  गणेश देवा, अक्कण माती चिक्कण माती, अतुल्यामतुल्या, कृष्णाचं अंगड बाई कृष्णाचं टोपडं, एक लिंबू झेलुबाई…. अशी गाणी म्हणत फेर धरायचा.

खिरापतीला काय केले? हे ओळखायला लागायचं. त्यासाठी आया वेगवेगळे पदार्थ करायच्या. बीट गाजराच्या वड्या, चुरम्याचे लाडू, तिखट दाणे, नायलॉनच्या साबुदाण्याचा चिवडा असे आईचे  पदार्थ आजही आठवतात.

आपली खिरापत मुलींना ओळखता आली नाही की आयांना आनंद व्हायचा.

दसऱ्याला श्रीखंडासाठी आधी एक दिवस दूध घेऊन त्याचे दही लावले जायचे. पंचात बांधून ते टांगून ठेवायचे. सकाळी छान घट्ट चक्का तयार व्हायचा. वेलदोडे घालून चांगले पातेले भर श्रीखंड केले जायचे. वडील श्रीखंड नको म्हणाले तर बासुंदी केली जायची.

पण  खरा दुधाचा मान  कोजागिरी पौर्णिमेला असायचा. गच्चीवरच्या गार हवेत चारोळी घातलेलं गरम दूध प्यायला घरातले जमायचे. ते दूध गच्चीत उघड्यावर ठेवायचं. त्यात चंद्राचा प्रतिबिंब पडलं की त्याची चव बदलते अशी समजूत होती.

काही दिवस गेले की दिवाळीच्या तयारीला लागलं पाहिजे अस आई घोकायची… कारण तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पदार्थ लागायचे. चकली, कडबोळीची भाजणी भाजायची, अनारश्याच पीठ दळायचं, करंजीचं सारण करायचं, लाडूसाठी साखर दळून आणायची… एक ना दोन किती तरी कामं तिला दिसत असायची.

फराळाच्या जिन्नसांनी डबे  भरून झाले की मग तिला हुश्श वाटायचं. दिवाळीच्या पहिल्या दिवशी वडील सकाळी सायकल वरून निघायचे. आत्या, मावशी, काकू कडे डबे द्यायचे. त्यांच्याकडून येताना डबे भरून यायचे. प्रत्येकाची चव निराळी असायची. आवडीने, चवीने ते पदार्थ खाल्ले जायचे.

ते दिवस कसे रमणीय  होते. साध्या साध्या गोष्टीतही आनंद होता.

त्या आठवणीत विचारांच्या तंद्रीत  मी हरवून गेले…..

यांच्या एका प्रश्नाने मनाने थोडी मागे जाऊन भटकून आले.

आज हे सगळं करणं  शक्य होत नाही. तितकं खायला घरात माणसंही नाहीत. निवांत वेळ नाही. आयुष्य कसं बिझी बिझी, फास्ट होऊन गेले  आहे.

नवीन पदार्थ बाजारात आले आहेत. खायच्या सवयी पण वेगळ्या आहेत.

पण मध्येच कधीतरी घारगे, शिंगोळे, गुळपापडीचे लाडू करावेसे वाटतात. सोडायचं म्हटलं तरी जुनं सोडवत नाही. नव्याशी अजून आमचा तितकासा मेळ बसत नाही.

कधीतरी वाटतं ह्या प्रथा बंद होतील का ? हे पदार्थ  विस्मरणात जातील का?

 पण एक मन सांगत असं होणार नाही. चातुर्मास आम्ही पाळत नाही पण इतर जमेल तसं आम्ही अजूनही करतो.

कितीही आधुनिक पुढारलेले झालो असलो तरी आमच्या रक्तातून वाहणारा तो स्त्रोत बदललेला नाही. आमची नाळ त्याच्याशी जोडलेली आहे.

… कारण हे नुसते खाण्याचे पदार्थ नाहीत तर त्यांच्या मागे आमची संस्कृती आहे परंपरा आहे. त्या त्या पदार्थाची आठवण त्याच्याशी  निगडित अनेक   नाती पण  आहेत. ती आयुष्यभर तशीच राहणार आहेत…

– समाप्त –

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments