श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
विविधा
☆ पिठोरी अमावस्या अर्थात वैश्विक ‘मातृत्व’ दिन… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
आज श्रावण अमावस्या !! बैलपोळा, पिठोरी अमावस्या आणि मातृदिन असा त्रिवेणी संगम असलेला पावन दिवस !!!
अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती द्यूत खेळत होते. पंच (परीक्षक) म्हणून नंदी महाराज होते. खेळात माता पार्वती जिंकल्या होत्या. पण पंचाने म्हणजे नंदीने भगवान शंकर जिंकले असे जाहीर केले. याचा पार्वतीमातेला राग आला व तिने नंदीला शाप दिला की तुझ्या मानेवर लोकं जोखड ठेवतील आणि तुझा उपयोग शेतीच्या कामासाठी व इतर कामासाठी केला जाईल. नंतर नंदीने क्षमा मागितली तेव्हा पार्वतीमातेने त्याला वरदान दिले की श्रावण अमावस्येच्या दिवशी तुला काहीही काम सांगणार नाहीत, तुझी पूजा केली जाईल, तुला गोडधोड खाऊ घातले जाईल, तुझे कौतुक केले जाईल आणि तेव्हापासून आपल्याकडे ‘बैलपोळा’ हा सण साजरा करण्यात येतो. आपल्या संस्कृतीप्रमाणे घरात अगदी नवीन संगणक आणला तरी त्याची पूजा केल्याशिवाय आपण तो सुरु करत नाही, अशा निर्जीव वस्तूंचीही पूजा होते, तिथे जन्म देणाऱ्या मातेला ही संस्कृती कशी विसरेल? माता, जननी, मातृभूमी आणि जमिनीतून धान्य पिकायला सहाय्यकारी ठरणाऱ्या बैलाचीही आपल्याकडे पूजा होणे क्रमप्राप्त नव्हे काय?
या दिवशी बैलांना विश्रांती द्यायची. त्यांना ऊन पाण्याने आंघोळ घालायची, पुरणावरणाचा स्वयंपाक करून आधी त्याचे तोंड गोड करायचं. खूप ठिकाणी ‘ “शिंगे रंगविली, बाशिंगे बांधिली, चढविल्या झुली ऐनेदार ‘ असाही बैलपोळ्याचा थाट उडवून देतात. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक गावात बैलपोळा सामूहिकरीत्या साजरा केला जातो.
श्रावण अमावास्येला ‘पिठोरी अमावास्या’ असेही म्हणतात. ज्यांची मुले जगत नाहीत, अशा स्त्रिया पिठोरीचे व्रत करतात. हे व्रत पूजाप्रधान असून, चौसष्ट योगिनी या त्याच्या देवता आहेत. या व्रताचे विधान असे – श्रावण अमावास्येच्या दिवशी दिवसभर उपोषण करावे. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर आठ कलश स्थापावे. त्यावर पूर्णपात्रे ठेवून त्यांत ब्राह्मी, माहेश्वरी, इ. शक्तींच्या मूर्ती स्थापाव्या. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपार्या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे. त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन ‘कोणी अतिथी आहे काय? असा प्रश्न विचारावा. मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.
पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत. अलिकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे नाव पडले असावे. पूर्वी घराघरात ‘पिठोरी’ची पूजा होत असे. पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृ दिन. या दिवशी महिला उपवास करतात. सायंकाळी स्नान करून घरातल्या मुलाला किंवा मुलीला खीरपुरीचे जेवण देतात. या दिवशी ६४ योगिनींच्या चित्राची महिला पूजा करतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ‘अतीत कोण?’ असा प्रश्न विचारायचा असतो. त्याचे उत्तर म्हणून आपल्या मुलाचे नाव घ्यायचे. म्हणजे पुत्र किंवा कन्या दीर्घायुषी होतात, अशी श्रद्धा आहे. घरातली कर्ती स्त्री डोक्यावर ‘पिठोरी’चं वाण घेऊन ‘माझ्यामागे कोण आहे?, चा घोष करत असे. घरातील मुलं तिला ‘मीच, मीच’ म्हणत प्रतिसाद दिला जात असत. बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य.
मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याची प्रथा आहे. या सणामागची पौराणिक कथा अशी आहे की विदेहा नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावास्येला मुले होत व ती लगेच मृत्युमुखी पडत. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन चौसष्ट देवतांनी तिला दर्शन दिले. पुढे ती पुन्हा घरी आली. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुषी असे आठ पुत्र झाले. अशा प्रकारे संतति रक्षणासाठी चौसष्ट देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वत:च्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठोरी अमावास्या करून देते. म्हणून ही अमावास्या महत्वाची आहे. आजच्या पावन दिनी दिवशी वंशवृद्धीकरिताही पूजा केली जाते. म्हणून यास ‘मातृदिन’ असेही म्हणतात. पण आज याला आणखी एक संदर्भ जोडला तर आणखी सयुक्तिक होईल असे वाटते. आपण आजच्या दिवसाला ‘मातृत्वदिन’ म्हणू शकतो. ‘माता’ होणे हे जन्म देण्याशी निगडित आहे तर मातृत्वभाव हा फक्त जन्म देण्याशी निगडीत नाही. हा तर वैश्विक भाव आहे. आजची सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर समाजाला आज ‘मातृत्वभावा’ची विशेषत्वाने गरज आहे असे जाणवते.
‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’, ‘आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’; ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई’ अशा विविधप्रकारे प्रतिभावंत कवींनी/मुलांनी आपल्या आईचे गुणवर्णन केले आहे. जरी असे वर्णन जरी केले असले तरी ते वर्णन पूर्ण आहे असे कोणताच कवी ठामपणे म्हणू शकत नाही. ज्या प्रमाणे भगवंताचे वर्णन करता करता वेद हि ‘नेति नेति’ असे म्हणाले, (वर्णन करणे शक्य नाही), अगदी तसेच आईच्या बाबतीत प्रत्येक मुलाचे / प्रतिभावान कवीचे होत असावे असे वाटते आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीत पहिला नमस्कार आईला करण्याचा प्रघात रुजवला गेला असावा.
आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीकडे ‘मातृत्वभावाने पाहण्याचे संस्कार आपल्यावर बालपणीच केले जात असतात, त्यामुळे आपल्याकडे पूर्वीपासून ‘भूमाता’, ‘गोमाता’, ‘भारतमाता’ अशा विविध भावपूर्ण संज्ञा आपल्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. ही पद्धत अकृत्रिम पद्धतीने आचरली जात होती, त्यामुळे ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिकवावी लागत नव्हती की त्याची जाहिरात करावी लागत नव्हती. मनी रुजवलेल्या मातृत्वाभावामुळे कितीतरी चांगल्या गोष्टी नकळत घडत होत्या आणि त्याचा फायदा सर्व समाजाला, पर्यायाने देशाला होत होता. आज पुन्हा एकदा आईचे ‘आईपण’ (प्रत्येक गोष्टीतील मातृत्वभाव) जागृत करण्याची गरज जाणवत आहे. “छत्रपती शिवाजी शेजारणीच्या पोटी जन्माला यावा’ ही मानसीकता सोडून ‘मीच माझ्या बाळाची ‘जिजामाता’ होईन” हा विचार मातृशक्तीत रुजविण्याची गरज आहे असे जाणवते. भले मला माझ्या मुलास ‘शिवाजी’ बनवता आले नाही तर त्याला शिवरायांचा ‘मावळा’ बनवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन करेन असा पण प्रत्येक आईने करायला हवा. हा प्रयत्न थोड्या प्रमाणात जरी यशस्वी झाला तरी देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रणाम मोठ्या प्रमाणात कमी होतील.
आज ‘आंतरराष्ट्रीय मातृत्वदिन’ आहे. आपल्या आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मला असा जाणवलं की नुसती कृतज्ञता व्यक्त करून आपले कर्तव्य संपेल ? नक्कीच नाही. तर एक मुलगा म्हणून माझं काही कर्तव्य नक्कीच आहे. मी माझ्या जन्मदात्रीचा मुलगा आहेच, भारतमातेचे पुत्र आहे, समाजपुरुषाचा पुत्र आहे. प्रत्येकासाठी माझी वेगवेगळी कर्तव्ये आहेत, ती योग्य रीतीने पार पाडता यावीत म्हणून मी माझ्या जीवनात प्राधान्यक्रम कशाला देणार हे ठरवावयास हवे. माझ्या अंगातील कौशल्ये अधिकाधिक समाजाभिमुख कशी होतील याचा विचार करावयास हवा. ‘मी आणि माझे’ यातून बाहेर पडून संपूर्ण समाज ‘माझा’ आहे ही भावना बळकट व्हावयास हवी. आज त्याचीच नितांत गरज आपल्या मातृभूमीस आहे, असे वाटते.
जसे भक्तामुळे देवास ‘देवपण’, अगदी तसेच लेकरांमुळे आईला ‘आईपण’ प्राप्त होते. भक्तच आपल्या भक्तीतून देवाचे देवपण सिद्ध करतो, तसेच प्रत्येकाने यथाशक्ती चांगले वागून, चांगली कर्म करून आपल्या आईच्या आईपणास गौरव प्राप्त करून दिला पाहिजे. मग ती आई असो, गोमाता असो कि भारतमाता !!. दैनंदिन व्यवहार करताना आपल्या अंगी ‘मातृभाव किंवा पुत्रभाव’ ठेवता आला तर देशातील भ्रष्टाचार, सामाजिक भेदभाव आणि इतर सर्व अनैतिक गोष्टी तात्काळ बंद होतील, यात बिल्कुल संदेह नाही.
आज आईचे स्मरण करताना बऱ्याच गोष्टी चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून सरकत गेल्या. माझी आई ही एखादवेळेस जिजामाता नसेल, ‘श्यामची आई’ नसेल पण ती ‘आई’ होती हेच माझ्यासाठी पुरेसे होते. आज या नश्वरजगात आई नाही, पण तिने जे काही शिकविले ते ‘श्यामच्या आई’च्या शिकवणीपेक्षा कणभरही कमी म्हणता येणार नाही. ‘देवाला सर्व ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली’* याची अनुभूती आपण सर्वच जण नेहमीच घेत असतो. सर्व संत मातृभक्त होते. सर्व क्रांतिकारक मातृभक्त होते आणि म्हणूनच अनंत हालअपेष्टा सोसूनही क्रांतीकारकांनी स्वराज्य प्राप्तीसाठी अथक प्रयत्न केले. आपणही आपल्या आईसाठी यथामती काहीतरी करीतच असतो. आपल्या आईची समाजातील ‘ओळख’ ‘सौ. अमुक अमुक न राहता ती अमुक अमुक मुलाची आई आहे’, अशी करून देता आली तर आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा यापेक्षा चांगला उपाय नसेल..
मी इथे प्रत्येकाच्या मनात असलेली ‘आई’बद्दलची भावना प्रातिनिधिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चुकभुल माफी असावी.
चार मातीच्या भिंती
त्यात राहे माझी आई
एवढे पुरेसे होई
घरासाठी….. !!
जगातल्या सर्व मातांस आणि मातृभावनेने कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांस ही शब्दसुमनांजली सादर अर्पण!! श्रीरामसमर्थ।
☆
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर