डाॅ. मीना श्रीवास्तव
विविधा
☆ ‘‘लता मंगेशकर : सप्तसुरांच्या गंधर्वगायनाची आकाशगंगा’’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
(२८ सप्टेंबर १९२९- ६ फेब्रुवारी २०२२)
नमस्कार प्रिय मैत्रांनो!
‘एको अहं, द्वितीयो नास्ति, न भूतो न भविष्यति!’
(म्हणजे फक्त मीच आहे, बाकी सर्व मिथ्या आहे, ना माझ्यासारखे कोणी आले आहे ना माझ्यासारखे कोणी येणार आहे. ना भूतकाळात असे काही घडले आहे, ना भविष्यात असे काही घडणार आहे!)
वरील अवतरण गान सरस्वती लता मंगेशकरवर सर्वोपरी उचित रूपाने लागू होते. लता मंगेशकरला शास्त्रीय संगीताचा वारसा महान नाट्यअभिनेता गायक तिचे पिता दीनानाथ मंगेशकर यांच्या कडून मिळाला. लहानग्या लताच्या गायनी कळा दीनानाथांनी ओळखल्या आणि तेव्हापासून तिचा जो रियाज सुरु झाला तो अविरत सुरूच राहिला. शास्त्रीय गायन करण्याची संपूर्ण क्षमता असूनही पित्याच्या अकाली निधनानंतर तिचे वडिलांकडून संगीतदीक्षा अधुरी राहिली. सिनेक्षेत्रात पदार्पण केल्यावर देखील प्रतिभावान गुणी संगीतकारांनी तिचे हे शास्त्रीय संगीतातील प्राविण्य ओळखून तिला अशा कांही संगीतरचना बहाल केल्या की पट्टीचे संगीतकार देखील अवाक झाले. बडे गुलाम अली खान आणि बेगम अख्तर सारख्या प्रसिद्ध कलाकारांनी तिला खूप नावाजले आणि तिच्या या स्वरगंधाराची मुक्त कंठाने तारीफ केली.
मंडळी, लता मंगेशकरवर लिहिणे म्हणजे एखाद्या समुद्रातील रत्ने शोधून त्यांचे मूल्यमापन करणे सोपे, पण लताने गायलेल्या हजारो गाण्यांपैकी कांही निवडक गाण्यांवर लिहिणे त्यापेक्षा दुष्कर कार्य आहे. म्हणूनच या लेखात शास्त्रीय संगीतावर आधारित अशा माझ्या आवडत्या निव्वळ तीन गाण्यांविषयी चर्चा करीन. शास्त्रीय संगीत शिकलेले नसतांना देखील माझ्यासारखी अज्ञ व्यक्ती हे लिहायचे धाडस करीत आहे, कारण लता आमच्या हृदयात सदैव अक्षय संगीतप्रेमाचे प्रतीक अशी लतादीदी म्हणूनच अमर आहे.
पहिले गाणे आठवले ते ‘ऋतू आये ऋतू जाये सखी री, मन के मीत न आये’ हे ‘हमदर्द’ (१९५३) सिनेमातले गाणे, गायले आहे लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी! चार कडवी चार शास्त्रीय रागात बांधली आहेत बुजुर्ग प्रतिभावान संगीतकार अनिल बिस्वास यांनी! हे चार राग आहेत (क्रमश:) राग गौड़ सारंग (ग्रीष्म ऋतू) , राग गौड़ मल्हार (वर्ष ऋतू), जोगिया (शिशिर ऋतू ) आणि बहार (वसंत ऋतू!) एका मुलाखतीत लताने सांगितले की अनिलदा आमचे ‘मास्टरदाच’ होते. वरील गाण्याच्या रिहर्सल मन्ना डे आणि लता जवळपास दोन आठवडे करीत होते. म्हणूनच हे गाणे शास्त्रीय संगीतावर आधारित सिनेगीतांमध्ये सर्वोच्च स्थानावर आहे असे मला वाटते. एक अजून माहिती मिळाली की यातील सारंगी पं.रामनारायण यांनी वाजवली आहे. शेखर आणि निम्मी या कलावंतांवर हे गाणे चित्रित झाले. हमदर्द सिनेमा कांही खूप गाजला होता असेही नाही, पण प्रेम धवन, अनिलदा, लता आणि मन्ना डे यांनी हे गाणे अजरामर करून ठेवले. मन्ना डे यांची शास्त्रीय गाण्यांवर किती मजबूत पकड होती हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे.
अनिलदांनी तिला संगीतातले खूप बारकावे समजावून सांगितले. श्वास सोडतांना माईकवर तो कसा जाणवू द्यायचा नाही, हे अनिलदांनीच शिकवले. म्हणूनच कठीण आणि दीर्घ ताना घेतांना लता मध्ये कुठे श्वास घ्यायची हे कोडेच आहे. इतके मात्र वाचले होते की बऱ्याच गाण्यात लता नेमका कुठं अन कसा श्वास घेते हे शोधण्यात बऱ्याच नवोदित गायिकांचे आयुष्य खर्ची पडले, पण दुर्दैवाने त्यांना उत्तर मिळाले नाही. आमच्यासारखे रसिक या भानगडीत पडत नाहीत, सरळ गानशारदेला नमन करायचं, अन गाणं जी भरके एन्जॉय करायचं.
दुसरे एकमेकाद्वितीय गाणे, सौतेला भाई (१९६२) मधले, यातला हाच एक सगा करिष्मा! लता किती म्हणून रियाज करत असावी याची साक्ष देणारे, शास्त्रीय गायक जे तासनतास गाऊन साध्य करत असतील किंवा नसतील ते या ३-४ मिनिटात लताने साध्य केलंय. ती शास्त्रीय गायन करत होतीच, माध्यम वेगळे होते इतकेच. ‘जा मैं तोसे नाहीं बोलूं’ (राग सहाना बहार) हेच ते अजरामर गाणे, लताच्या रागदारीवर आधारित गाण्यांपैकी एक बेहतरीन पेशकश! पडद्यावर दोन कथक नृत्यांगना, राणीबाला अन रत्ना या दोन दुधारी तलवारीसारख्या, नृत्य काय तर टिपिकल मुजरा, त्यांच्या जीवघेण्या दिलकश अदा, अदब, तहजीब, नृत्याभिनय, इत्यादी इत्यादी तर आहेतच, त्यांच्या कात्रीत सापडलेला नायक गुरुदत्त, पण या सर्वांना पुरून उरलेला लताचा जलप्रपातासारखा अक्षरशः अंगावर कोसळणारा स्वर! स्वरानंदाच्या तुषारात चिंब भिजवणारा! दोन नृत्यांगनांसाठी लताच्या स्वराविष्काराचा वेगवेगळा लहेजा! वाह क्या बात है! तिच्या ताना ऐकून अवाक व्हायला होते. गाण्यातील जादूभरले शब्द शैलेंद्र यांचे आणि संगीत माझे प्रिय संगीतकार अनिलदा यांचेच!
तिसरे माझे अत्यंत आवडीचे गाणे म्हणजे ‘जा जा रे जा बालमवा!’ हे हिंदी सिनेमातील सर्वसामान्य पठडीतला मुजरा या शीर्षकांत मोडणारे गाणे. चित्रपट ‘बसंतबहार’ (१९५६), पडद्यावर तेव्हाचा नामी खलनायक चंद्रशेखर आणि त्याला भुलवत मुजरा सादर करणारी कुमकुम! मंडळी, मला वाटते की या कुमकुमच्या सुंदर रूपाचा अन अभिनयाचा म्हणावा तितका उपयोग फिल्म इंडस्ट्रीने केला नाही. नेहमी दुय्यम स्थानावरील सहनायिकाच राहिली ती. पण हे गाणे बघाल तेव्हां ही कसलेली अभिनेत्री होती याची आपल्याला खात्री पटेल. या गाण्यात लताचा फिरत घेणारा स्वर्गतुल्य कोमल स्वरगंधार, शैलेंद्र यांचे प्रसंगानुरूप दिलखेचक शब्द, शंकर जयकिशन यांचे राग झिंझोटीवर आधारित एक नंबरचे लाजवाब संगीत तर आहेच, पण कुमकुमचा नखरा, तिचा बोलका चेहरा, भावविभ्रम आणि जबरदस्त शास्त्रीय नृत्याची जाण या गाण्याला अस्मानात घेऊन गेली. या गाण्यातील लताच्या स्वरांचा तो अद्भुतरम्य हँगओव्हर गाणे संपल्यावरही कमी होत नाही हा माझा नेहमीचा अनुभव!
मैत्रांनो, अशी सर्वांगसुंदर गाणी यू ट्यूब वर बघायची सोय आहे हे आपले परम भाग्यच! बघा ना चित्रपट चालो अथवा न चालो, ही गाणी रसिकांच्या हृदयात कायमस्वरूपाने विराजमान झालीत. श्वेत- श्याम रंगात असूनही या गाण्यांनी आपल्या आयुष्यात आनंदाचे किती रंग भरले त्यांची गणतीच नाही. म्हणूनच आजच्या निमित्याने या गाण्यांची चर्चा करावीशी वाटली!
२८ सप्टेंबरच्या लताच्या जन्मदिनाचे निमित्य साधत या स्वरशारदेच्या दिव्यचरणी ही भावशब्दसुमने अर्पण करते!💐
( टीप- वरील तीन गाण्यांची लिंक जोडत आहे. लिंक न उघडल्यास गाण्याचे शब्द यू ट्यूब वर टाकावेत.
https://youtu.be/L8ht_BXmOp4?si=bjAj8WctCbWfV3vA
‘ऋतू आये ऋतू जाये सखी री, मन के मीत न आये’- चित्रपट: ‘हमदर्द’ (१९५३)
गायक-गायिका: मन्ना डे, लता मंगेशकर, गीतकार: प्रेम धवन, संगीतकार: अनिल बिस्वास
https://youtu.be/WTcXSp2KvNs?si=hOJDPY4Vi3q7ggSc
‘जा मैं तोसे नाहीं बोलूं’- चित्रपट: सौतेला भाई (१९६२)
गायिका: लता मंगेशकर, गीतकार: शैलेंद्र, संगीतकार: अनिल बिस्वास
https://youtu.be/TwBNRmvwAxA?si=k9GJJYMtvw-rjUrs
‘जा जा रे जा बालमवा!’- चित्रपट: बसंत बहार
गायिका: लता मंगेशकर, गीतकार: शैलेंद्र, संगीतकार: शंकर जयकिशन )
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈