सौ.ज्योत्स्ना तानवडे
विविधा
☆ “मला भावलेला श्रीकृष्ण” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
(‘shopizen.in‘ यांच्यातर्फे आयोजित केल्या गेलेल्या “ माझ्या मनातला श्रीकृष्ण “ या विषयावरच्या एका उपक्रमाअंतर्गत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांच्या लेखाला “ सर्वोत्कृष्ट लेखन “ म्हणून गौरविण्यात आलेले आहे. याबद्दल आपल्या सर्वांतर्फे ज्योत्स्नाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा. आज हा लेख सर्वाना वाचण्यासाठी उपलब्ध करत आहोत.
हे श्रीकृष्णा, नव्हे नव्हे युगपुरुष भगवान श्रीकृष्णा नमस्कार !
पण तुला बाळकृष्ण म्हणावे, माधव म्हणावे, मुकुंद म्हणावे, मुरलीधर म्हणावे, कन्हैया म्हणावे, वासुदेव म्हणावे का योगेश्वर म्हणावे ? नक्की काय म्हणावे असा मोठा प्रश्न पडतो. कारण तुझ्या प्रत्येक रूपाची मोहिनी वेगळी आणि लीलाही वेगळ्या. पण प्रत्येकच रूप तितकेच लोभस अन् हवेहवेसे.
हे युगंधरा,
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||
असे वचन तू दिले होतेस आणि ते पूर्ण करण्यासाठी द्वापरयुगात श्रीविष्णूंचा आठवा अवतार म्हणून वसुदेव देवकी यांचा पुत्र म्हणून अवतार घेतलास.
हे देवकीनंदना, तुझ्या बालरूपाने तर चराचरावर मोहिनी घातली. अवघ्या गोकुळाला तुझे वेड लागले. अगदी बालपणापासून तू अनेक खोड्या केल्या, पराक्रम केलेस. ते सर्व कृष्णलीला म्हणून प्रसिद्ध आहेत.
अगदी बालपणातच तू पूतना राक्षसीचा वध केलास. यशोदा मातेने उखळाला बांधून ठेवले असताना रांगत जाऊन दोन झाडे पाडून नलकुबेर आणि मणिग्रीव या दोन कुबेर पुत्रांना शापमुक्त केलेस. यशोदा मातेला आपल्या मुखामध्ये विश्वदर्शन घडवलेस. कालिया मर्दन करून कालिया नागाला यमुनेच्या डोहातून निघून जायला लावलेस. केवळ हाताच्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळवासियांचे मुसळधार पावसापासून रक्षण केलेस.
हे बाळकृष्णा, अशा अनेक घटनात तुझे देवत्व प्रकट होत गेले. पण प्रत्यक्षात मानव रुपातले तुझे मोहक हसरे रूप सर्वांना आकर्षित करणारे होते. कारण कृष्ण म्हणजेच आकर्षून घेणारा. डोळ्यात प्रेम, करुणा, वात्सल्य दाटलेले, चेहऱ्यावर आपुलकीचे लोभस भाव आणि तुझे ते खट्याळ लडीवाळ हसू प्रत्येकाला आपलेसे करून घेणारे म्हणूनच प्रत्येक जण तुझ्यावर जिवापाड प्रेम करणारा.
हे कन्हैया, तुझे तरुणपणातले मुरलीधर रूप सर्वांचेच अतिशय लाडके. तुझ्या बासरीचे सूर चराचराला धुंद करीत. त्या सुरांनी माणसेच नव्हे तर अवघे गोधन, पशू, पक्षी तुझ्या भोवती जमा होत असत.
हे योगेश्वरा, तू शूरवीर पराक्रमी योध्दा, न्यायनिपूण कुशल प्रशासक, दुर्बलांचा तारणहार, दुष्टांचा संहारक होतास. कौरव पांडवांचे युद्ध होऊ नये, संहार टळावा म्हणून तू शेवटपर्यंत प्रयत्नशील होतास. कौरवांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केलास. पण ही ‘कृष्णशिष्टाई’ अखेर विफल ठरली.
पुढे कुरुक्षेत्रावरील धर्मयुद्धात शस्त्र हाती न धरता एका उदात्त हितोपदेशकाची भूमिका उत्तम रीतीने पार पाडलीस. त्यामुळेच पांडव धर्मयुद्धात विजयी झाले. याचवेळी सर्व मानवजातीला मार्गदर्शक असा गीतोपदेश तू अर्जुनाला केलास. जीवनात प्रत्येक गोष्टीत ही गीतातत्वे आजही मार्गदर्शक ठरत आहेत. हे गीता तत्वज्ञान जीवनाची गाथा आहे.
हे वासुदेवा, तू मानव देहधारी अवतरलास. मानवाप्रमाणे जीवनातले सुखदुःखांचे चढ उतार सहन केलेस. सर्व भोग उपभोगलेस आणि भोगलेसही. दुःख, कष्ट, तिरस्कार, पीडा सहन केल्यास. आयुष्यातील सर्व नात्यांना योग्य न्याय देत सर्व नाती उत्तम निभावलीस. माता, पिता, सर्व वडिलधाऱ्यांना योग्य सन्मान, प्रेम दिलेस.
गुरूकुलात सर्व शिष्यांसमवेत त्यांच्यातला एक होऊन राहिलास. मित्र असावा तर असा म्हणत गरीब सुदामाशी आयुष्यभर मैत्री निभावली.
गोकुळवासी गोधन सांभाळायचे. पण कंसाच्या धाकाने सर्व दही, दूध, लोणी मथुरेच्या बाजारात जायचे. खरे तर त्यावर पहिला हक्क गोकुळातल्या बालगोपालांचा. त्यांच्यासाठी तू दहीहंडी फोडण्याला सुरवात केलीस. सर्वांमधली एकात्मता टिकवण्यासाठी गोपाळकाला करायला लागलास.
हे गोविंदा, तू कालियाला दुसऱ्या वनात पाठवून यमुनेचे जलशुद्धीकरण केलेस. गोधनाची अतिशय मायेने काळजी घेतलीस. गोवर्धन पूजेच्या निमित्ताने निसर्ग पूजनाचा पायंडा पाडलास. सगळ्यांना निसर्ग रक्षण, संवर्धन, प्राणी प्रेमाची महती शिकवलीस.
हे माधवा, द्रौपदीला बहीण मानून अखंड पाठीराखा झालास. नरकासुराच्या बंदीवासातून १६००० जणींना मुक्त केलेस आणि त्यांना सन्मानाचे जिणे प्राप्त व्हावे म्हणून त्यांना आपल्या पत्नीपदाचा दर्जा दिलास. स्त्रियांचा सदैव आदर केलास.
अगदी कंस, जरासंध, शिशुपाल यांना चुका सुधारण्याची संधी दिलीस. शंभर अपराध भरल्यानंतर वध केलास. अनन्यभावाने शरण आलेल्यांना अभय देत दुष्टांच्या दुष्कृत्यांना शिक्षा केलीस. सदैव नीतीचे, न्यायाचे अनुसरण केलेस.
हे मोहना, विश्व कल्याणासाठी दुष्ट शक्तींचे निर्दालन करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी विविध रूपात तू लीला केल्यास. या तुझ्या देवत्वाबरोबरच तुझ्यातलं मनुष्यत्व अतिशय मोहक आणि सर्वांना अगदी जवळचं वाटणारं आहे. सर्व नात्यांना जपणारं तुझं कुटुंबवत्सल रूप मला जास्ती आवडतं.
तुझ्या कृती उक्तीतून तू आपल्या वागण्याला अध्यात्मिक, सामाजिक, नैतिक अधिष्ठान कसे हवे हे दाखवून दिलेस. जीवनात आसक्ती आणि विरक्ती कशी असावी हे दाखवलेस. भक्ती कशी असावी, दुसऱ्याला नेहमी माफ करावे, परोपकार, संरक्षण करावे, नेहमी सत्याची बाजू घ्यावी, त्याचा लगेच परिणाम दिसला नाही तरी सत्याचाच शेवटी विजय होतो अशा अनेक गोष्टी तू कृतीतून दाखवत होतास.
हे दीनबंधो, राजसभेत दु:शासनाने तिच्या वस्त्राला हात लावताच द्रौपदीने तुझ्या असंख्य नावाने तुझा धावा केला. पण तू आला नाहीस. शेवटी तिने, ” हे दीनदयाळा, भक्तवत्सला, आत्मारामा मी तुला अनन्यभावाने शरण आले आहे. माझे रक्षण कर, ” अशी विनवणी करताच तू प्रकट झालास. कारण नुसती स्तुती नव्हे तर अंत:करणापासून मारलेली हाक तुझ्यापाशी पोहोचली. अशी समर्पण भक्ती तुला आवडते. तू आम्हाला निष्काम कर्मयोग, निरपेक्ष प्रेम, नि:स्वार्थ भक्ती शिकवलीस. म्हणूनच तुझी तुला करताना सत्यभामेच्या जडजवाहीराने नव्हे तर रूक्मिणीच्या एका तुळशीपत्राने पारडे खाली गेले. तिचा अनन्यभाव तुला प्रिय होता.
तू शिकवलेल्या या गोष्टी आचरणात आणून सुखाने जगणे शक्य आहे. पण आज कलियुगात माणूस पुन्हा उद्दाम, बेफाम बनू लागला आहे. आपलं माणूसपण विसरला आहे. मायबाप आणि लेकरांचे पवित्र नाते दुरावते आहे. कुटुंबांमधे मतभेदाच्या भिंती उभारल्या आहेत. स्त्री आज सगळीकडेच असुरक्षित झाली आहे. समाजातले दु:शासन राजरोस तिच्या वस्त्राला हात घालत आहेत. समाजातला एकोपा संपत चालला आहे.
हे पुरूषोत्तमा, आज तुझी प्रकर्षाने आवश्यकता आहे. तुझ्या कृपेने प्रत्येकाच्या मनातला निद्रिस्त कृष्ण जागा कर. प्रत्येक स्त्रीच्या मनातली दुर्गा जागृत होऊ दे. अन्याय, अत्याचार लयाला जाऊ देत. पुन्हा सर्वत्र सुधर्माचे राज्य येऊ दे.
हे मधुसुदना, पुन्हा एकदा साऱ्या विश्वाला आश्वस्त करणारे, सर्वांवर कृपेची पाखर घालणारे तुझ्या बासरीचे मधुर स्वर चराचरात घुमू दे. श्रीकृष्णाय नमः ||
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈