सुश्री सुलु साबणेजोशी
🌸 विविधा 🌸
☆ “विस्मरणात चाललेला ठेवा – हादगा” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी ☆
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला पितृपक्षांमध्ये कुठलेही सणवार असत नाहीत, अशा वेळेला ठिकठिकाणीच्या मुलींना उत्साह भरतो तो हादग्याचा.
कॅलेंडरमध्ये सूर्याचा हस्तनक्षत्र प्रवेश दिला असेल, त्याच दिवशी हादगा सुरू. अनेक नारीकर्तृक व्रताप्रमाणे याचेसुद्धा इतके पाठभेद आहेत की, मुळात व्रतराज ग्रंथात ‘हस्ती गौरी व्रत’ या नावाने दिलेल्या व्रताचे मूळ विधान बाजूला पडून वेगवेगळ्या रीती प्रचलित झाल्या आहेत. त्यातूनच विदर्भात ‘भुलाबाई’, मध्य महाराष्ट्रात ‘भोंडला’, कर्नाटकात ‘गजगौरी’ आणि पश्चिम महाराष्ट्रात ‘हादगा’ या नावाने हा खेळ होतो.
याच्यामध्ये मूळ ग्रंथात दिलेले विधान बघितलं तर ते असं आहे – कोणे एके काळी गौरी स्वप्नामध्ये शिवमूर्ति दग्ध झालेली पाहते आणि साहजिकच शंकरांना त्याचा परिहार किंवा कारण विचारताच शंकर सांगतात, ‘मध्यान्ह काळी घेतलेल्या निद्रेमुळे तुला असे विचित्र स्वप्न पडले. तेव्हा आता सूर्य हस्तनक्षत्रात असताना तेरा दिवस तू ऐरावतावर आपल्या दोघांसह गणेशाची प्रतिमा स्थापन कर आणि त्याची तेरा दिवस पूजा करून तेरा वर्षांनी त्या व्रताचे उद्यापन कर. ‘ पुढे भगवान श्रीकृष्णांनी कुंतीच्या इच्छेवरून तिला हे व्रत आणि कथा सांगितली. नेमकं त्याच वेळेला गांधारीने देखील हे व्रत ऐकले होते. मूळ कथेत पार्वती शंकरांना विचारते, ‘आपण मला सोन्याचा गणपती ईश्वर पार्वती – सोन्याच्या हत्तीवर बसवायला सांगितले आहे, पण जर समजा सुवर्णाची मूर्ति करणे शक्य नसेल, तर काय करावे अशा वेळेला?’ शंकर तिला म्हणतात, ‘सोन्याची शक्य नसेल, तर मातीची कर. ‘ या पर्यायाप्रमाणे गांधारी कौरवांना सांगून गंगाकिनाऱ्याची माती आणायला सांगते. हे बघून कुंतीला दुःख होते. गांधारीचे इतके पुत्र तिच्या व्रताचा मनोरथ सहज पूर्ण करतील हा विचार तिच्या मनात येताच अर्जुनाने आईच्या मनातले शल्य ओळखले. तो स्वतः गंगाकिनारी गेला आणि उमा महेश्वराचे तप करून शंकरांनाच विनंती केली की, ‘आपण ऐरावतावर बसून येऊन माझ्या आईची व्रतपूजा स्वीकार करावी. ‘ व्रताच्या प्रभावाने कुंतीच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या पुत्रांना जय, यश, लाभ, सगळ्याची प्राप्ती झाली. असं हे व्रत तेरा वर्षं, तेरा तेरा दिवसांसाठी करून चौदाव्या वर्षी याचे उद्यापन करावे, असे विधान व्रतराज ग्रंथात आहेत.
विदर्भातली भुलाबाई, मध्य महाराष्ट्रातला भोंडला याविषयी मला अधिक सविस्तर माहिती नाही. पण हादगा म्हटलं की शाळेतल्या आठवणी जाग्या होतात. काल या लेखासाठी हादग्याचे चित्र शोधायला एका ठिकाणी गेलो. एरवी सगळं काही मिळणारे त्या दुकानात हादग्याचे चित्र मागितल्यावर त्या दुकानाच्या वृद्ध मालकीणीनं सांगितलं, ‘हल्ली आम्ही हादग्याचे चित्र ठेवत नाही. कारण किमान २५ कागद घ्यावे लागतात आणि तेवढे खपत नाहीत. म्हणून आम्ही हादग्याचे चित्र ठेवत नाही. ‘ हे ऐकल्यावर आणखीनच वाईट वाटलं, कारण साधारणपणे शाळेत असताना हादगा सुरू झाला की, प्रत्येक वर्गात एकेक चित्र तगडाला चिकटवून अडकवले जायचे, घरीसुद्धा बहीण, तिच्या मैत्रिणी आपापल्या घरी हादगा बसवायच्या. १६ दिवस कोणी खिरापत आणायची, कुणी माळ आणायची याचे क्रम ठरायचे. १६ माळा, सोळा प्रकारच्या असाव्यात, याकडे मुलींचं जातीने लक्ष असायचं. भिजवलेल्या गव्हाची माळ, फुलाची माळ, चिरमुऱ्याची माळ, रामाच्या पावलांची म्हणजे पारिजाताच्या बियांची, सोळा फळांची, १६ प्रकारच्या फुलांची अशा अनेक माळा हादग्याला चढवल्या जायच्या. रोज साधारणपणे तिसऱ्या प्रहरी म्हणजे जेवणाच्या सुट्टीनंतर दोन तास उलटून गेले की साधारणपणे चार वाजण्याच्या सुमाराला वर्गात फक्त मुलं शिल्लक राहायची. बाकी सगळ्या मुली एका पाटीवर हत्तीचे चित्र काढून तो हत्ती मध्ये ठेवायच्या. प्रत्येकीने आणलेली खिरापत तिथे ठेवलेली असायची. आमच्या शाळेत मुलांना देखील खिरापत आणायला परवानगी होती. खिरापतीचे डबे, फुलांनी सजवलेल्या हत्तीचे चित्र मध्ये ठेवलं की, हादग्याची गाणी सुरु व्हायची. पहिल्या दिवशी एक या क्रमाने गाणी वाढत जाऊन सोळाव्या दिवशी सोळा अशी गाणी असायची.
ही गाणी सुद्धा मराठीचा एक ठेवाच म्हणावी लागतील. ऐलमा पैलमा हे पारंपारिक पहिलं गाणं. गणपतीला ‘माझा खेळ मांडू दे’ म्हणून विनंती झाली की, तिथून पुढे गाण्यांच्या प्रकाराला मर्यादा नसायची. मग पारंपारिक सासुरवासाची निंदा, माहेरचं कौतुक, देवांचे वैभव असं वर्णन करणारी अनेक गाणी गायली जायची. ‘त्यातलं उरलं एवढंसंसं पीठ’ असं म्हणत पाककृतीची गाणी असायची. कधी ‘अक्कण माती चिक्कण माती’ म्हणत दळलेल्या रव्याच्या करंज्या – पालखीतनं माहेरी धाडल्या जायच्या, तर कधी ‘कोणा वेड्याच्या बायकोला वेड्याने कसं जिवंत जाळलं’ याची हसता हसता डोळ्यात पाणी आणणारी कथा गायली जायची. आडलिंबू ताडलिंबू म्हणताना फेर धरणाऱ्या प्रत्येकीच्या भावाचं नाव घेतलं जायचं. तर ‘आज कोण वार बाई’ म्हणून वाराच्या सगळ्या देवांना नमस्कार केला जायचा. वेळ कमी असेल तर ‘आड बाई आडोणी, आडाचं पाणी काढोणी’, याच्यापुढे ‘आडात होती देवळी, देवळीत होता… ‘ नंतर एक एक शब्द जुळवून ‘आमचा हादगा… ‘ असं गाणं संपवलं जायचं. त्याला एक गाणं मोजलं जायचं. उदाहरणार्थ, ‘आडात होती देवळी, देवळीत होता शिंपला, आमचा हादगा संपला’, हे शेवटचं गाणं. मग त्यात अगदी साबण-बामण, खराटा-मराठा अशी यमकं जुळवून सुद्धा कडवी जोडली जायची. हे म्हणताना कोणाला वाईट वाटणं, कोणी दुखावलं जाणं, वगैरे प्रकार काही नाहीत. पण ‘शिंपला’ म्हटलं मात्र की, आनंद व्हायचा, कारण आता पुढचा प्रकार असायचा तो खिरापत ओळखण्याचा. मग एकेका पदार्थांची नावे घेणे आणि डब्यातून वास येतो का, हाताला गरम लागतं का, वगैरे खिरापत ओळखण्याचा प्रकार व्हायचा. हे सगळं करताना आपली खिरापत ओळखली जाऊ नये यासाठी खिरापत आणणाऱ्याचा फार अट्टाहास असायचा. विशेष म्हणजे त्या काळातल्या आयांना अशी न ओळखणारी खिरापत करून देणे हे सुद्धा एक प्रेस्टीजच वाटायचं. कारण तो त्या आईच्या पाककलेच्या सन्मानाचा विषय असायचा. सोळा दिवस झाले की, सोळाव्या दिवशी हादग्याची बोळवण असायची. भिंतीवर लावलेलं हादग्याचे चित्र (हे सुद्धा एक गमतीचाच भाग आहे – कोल्हापुरात दगडू बाळा भोसलेंच्या दुकानात ही चित्रं मिळतात. त्या चित्रांमध्ये दोन बाजूला दोन हत्ती, त्याच्यावर बसलेले माहुत, माहुताच्या मागे अंबारी, अंबारीत राजा राणी म्हणजे गौरीशंकर, तेही मराठी शाही थाटात, त्यांच्या मागे चवऱ्या मोर्चेल घेतलेले दोन सेवक, अंबारीला धरून उडणाऱ्या देवकन्या म्हणजे पऱ्या, दोन्ही हत्तींच्या मध्ये फुगडी घालणाऱ्या दोन स्त्रिया, त्यांच्या हातावर कुंडीत उगवलेलं उंच फुलाचे झाड आणि त्या झाडावर बसलेली दोन माकडं, विशेष म्हणजे दोन्ही हत्तींच्या पायामधे बसलेले सिंह. मला वाटते गांधारीच्या मातीच्या हत्तीचे आणि कुंतीच्या प्रत्यक्ष शिवपार्वतीचे ते दोघेही प्रतीक असावेत, कारण त्या दोन्ही हत्तीत काहीही फरक असत नाही, असं ते चित्र!) उचलून माळा, फुलांसह जवळच्या ओढ्याला पाण्याला विसर्जित करण्यासाठी नेले जायचे. तिथे गेलं की पुन्हा फेर धरला जायचा. आज सगळ्यांनीच खिरापत आणायची असे. ती ओळखायची नाही, तर गोपाळकाल्यासारखी प्रत्येकाच्यातली थोडी थोडी वाटून घ्यायची असं झालं की, हादगा विसर्जीत करायचा. आमच्या इथल्या एक काकू पोरींना आठवण करायच्या, “हादगा लवकर बोळवा गं. त्याला दिवाळी दाखवू नये. नाही तर पाऊस दिवाळीपर्यंत थांबतो. “
हस्त नक्षत्रावर पडणारा पाऊस हा हत्तीच्या सोंडेतून पडणाऱ्या पाण्यासारखा कमी वेळात धुंवाधार. हा पाऊस पाणी पाणी करून टाकतो. म्हणूनच हा हत्ती बसला की बसतो अशी समजूत आहे. तो जर नवरात्राच्या पहिल्या माळेला पडला तर वातीत सापडला, किंवा माळेत सापडला, असं म्हटलं जातं. म्हणजे तो नऊही दिवस पडणार अशी अटकळ बांधली जाते.
असा साध्याभोळ्या पोरींचा आणि न ओळखणारी खिरापत हे एक चॅलेंज मानणाऱ्या आयांचा सण म्हणजे ‘हादगा’. कालौघात पोरीबाळी शाळा, क्लास, एक्स्ट्रॉ करिक्युलम यामध्ये बिझी झाल्या आणि हादग्याचं प्रस्थ शाळेतूनही हद्दपार झाले. आता कुठे तरी एखादी संस्था, एक कल्चरल ॲक्टिव्हिटी म्हणून एखाद् दिवसाचा हादगा घेते आणि तिथे पोळीबाळी नटून थटून जाऊन रेकॉर्डेड गाणी म्हणतात. ‘कालाय तस्मै नमः’, दुसरे काय?
॥श्री मातृचरणारविंदस्य दास प्रसन्नसशक्तिकः॥
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈