श्री संभाजी बबन गायके
विविधा
☆ काहीही चालवून घ्यायचे का ??? ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
“ ह्याचा पेक्षा चांगला मराठी नाही येतात का? “
वरील ह्याचा या शब्दातील ‘चा’ या शब्दाचा उच्चार ‘चार’ मधील ‘चा’ सारखा समजावा. तसाच ‘चांगला’ शब्दातील ‘चां’ चा उच्चार ‘च्या’ सारखा समजावा!
तर तमाम मराठी वर्तमानपत्रात आज ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. वर्तमानपत्रे जाहिरातदारांनी दिलेला मजकूर जसाच्या तसा छापतात हे कबूल. पण म्हणून या मराठी वर्तमानपत्रांनी काहीच नाही म्हणायचं का?
किमान मराठी वृत्तपत्रे आपण मराठी वृत्तपत्रे आहोत याचे भान राखून जाहिरातदारांना बदल, दुरुस्ती सुचवू शकत नाहीत का? की पैसे मिळाले की काम झाले? इतर भाषिक, विशेषतः दाक्षिणात्य लोक त्यांच्या भाषेत एक काना मात्रा अधिक उणा खपवून घेत नाहीत. संगणकामध्ये इंग्लिश स्पेलिंगची अगदी किरकोळ चूक जरी झाली तरी त्वरित तांबडी अधोरेखा दिसू लागते. असे मराठीत कधी होईल?
जर खरेच आपली मराठी भाषा अभिजात म्हणून प्रस्थापित करायची असेल तर सर्व ठिकाणी किमान स्वीकारार्ह मराठी उच्चार, लेखन व्हावे, याचा आग्रह धरला पाहिजे. जाहिराती, सार्वजनिक सूचना या जर मराठीत लिहायच्या असतील तर त्यांतील मजकूर तपासून घ्यायला पाहिजे. यासाठी हे काम करून देणारी अधिकृत संस्था असणे गरजेचे आहे. अशी संस्था नसेल तर ती स्थापन केली गेली पाहिजे. तोवर मराठीचे शिक्षक, प्राध्यापक, विद्यापीठे यांतील तज्ज्ञ यांचेकडून हे काम विनंतीपूर्वक आणि सशुल्क करून घेणे अनिवार्य करावे.
एक तर बहुतांश जाहिरातदार संस्था अमराठी असाव्यात, असे दिसते. महामार्गांवर जे सूचना फलक दिसतात त्यात लेखन अपराध दिसतात, त्याचे एक कारण म्हणजे देश पातळीवर बहुधा contracts दिली जात असावीत आणि ही contracts बहुदा अमराठी लोकांकडे जात असावीत. अन्यथा असे प्रकार झाले नसते. आंबेगाव चे अम्बेगाव झाले असते का? हिंजवडी (म्हणजे हिंजव हा सलग उच्चार आणि लगेच डी.. जसे पुनव… डी.. म्हणजे पुणे) असे गावाचे नाव आहे.. त्याचे हिंजेवाडी झाले नसते. लोह गाव लोहे गाव झाले नसते. या अमराठी लोकांकडे हिंदी, इंग्लिश जाणणारे लोक उपलब्ध असतात आणि ते याच लोकांकडून मराठी मजकूर लिहून, वाचून घेतात. मग अशा चिंधीवृत्तीने घोटाळे होणारच !
अभिजात मराठीची अशा प्रकारांनी इभ्रत जात असते, हे ध्यानात कधी घेणार आपण? की हेच भाषेचे प्रवाहीपण असे मानायचे?…..
मोरया चा मोरिया, गोट्या चा गोटिया, शेतकऱ्याचा शेतकरीयाचा …. असा हिंदी उच्चार जवळपास सर्वमान्य झाला आहेच. च, ळ इत्यादी मुळाक्षरे अमराठी बांधवांना आणि भगिनींना जड जातात, हे मान्य.. पण म्हणून काहीही चालवून घ्यायचे का?
केवळ पैसे वाचवण्यासाठी contractors, copy writers कुणाकडूनही मराठी कामे करून घेत आहेत.
जर एखादी अधिकृत संस्था स्थापन केली गेली तर बरेचसे नियंत्रण येईल, असे वाटते !
तोवर नाही येत ऐवजी नाही येतात, असे वाचायची आणि ऐकायची सवय करून घ्यावी लागेल.
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈