श्री जगदीश काबरे
☆ “दिवाळीचा सांगावा…–” ☆ श्री जगदीश काबरे ☆
विवेकाचा दिवा हृदयात जपून ठेवा,
हाच या दिवाळीचा सांगावा.
हजारो वर्षापासून मेंदूवर चढलेली अज्ञानाची काजळी खरडून काढण्याचा प्रयत्न ज्यांनी केला
त्यांनाच या अंधाऱ्या संस्कृतीने संपवून टाकले आहे.
त्यांनी दिलेला विचार गिळंकृत करून समाजाला मोडून-तोडून सांगितला जात आहे.
विज्ञान तंत्रज्ञानात जगाने अभूतपूर्व मुसंडी मारलेली असताना – – –
भारतात आताच्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी धर्मग्रंथांची पाने चाळली जात आहेत.
डार्विन, न्यूटन, आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग या सगळ्यांना वेड्यांच्या पंक्तीत बसविण्याची सत्तेला घाई झाली आहे.
शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे सोवळे परिधान करून मंदिरात घंटा बडवत बसले आहेत.
राफेल सारख्या अत्याधुनिक फायटर विमानांवर निंबू-मिरची उतरवल्या जात आहेत.
गाय, गोमुत्र आणि गोपालनाला राष्ट्रीय स्वरूप आले आहे.
अशा काळात अज्ञानाची काजळी अधिक घट्ट होताना दिसत आहे.
विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन यांना शत्रुस्थानी मानले जावून नवे अभ्यासक्रम तयार केले जात आहेत.
विवेकाचा एक मंद दीप घेवून मूठभर व्यक्ती चार्वाकाच्या काळापासून चालत आहेत,
पण त्यांना ध्येय गाठता आले नाही.
कारण अविवेक आजही प्रभावीच आहे.
…
परंतु विवेकाने पराभव अजून पत्करला नाही.
तुमचाही विवेक धडका देतोय
… मेंदुतील अंधश्रद्धांच्या पोलादी तटबंदींना…
त्याला बघा एकदा मोकळे करून…
… विवेकाचा दीप पेटवून तर बघा, हृदयाच्या एखाद्या कोनाड्यात…
… मग बघा सारं विश्व कसं प्रकाशमान होतेय ते…!
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈