प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

☆ माझ्या डायरीतून… ☆ प्रा. भरत खैरकर 

यशस्वी होणे याचा अर्थ कधीही अपयश न येणे असा नसून अंतिम ध्येय गाठा असा आहे. बहुतेक लोक क्षमता आणि बुद्धिमत्ता यांच्या अभावामुळे अयशस्वी होतात असे नाही तर ईच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त यांच्या अभावामुळे ते अयशस्वी होतात. आपल्या अंतरंगात जे काही असते त्यामुळे आपण उंचीवर जातो. म्हणजे आपला दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.

आपल्या दृष्टीकोनात बदल करून माणूस आपले आयुष्य बदलू शकतो. प्रामाणिक असणं जास्त महत्त्वाच आहे. तुम्ही प्रथम चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपोआपच तुम्हांला सद्बुद्धी लाभेल.

मनाने इतके कणखर व्हा की कुठलाही आघात तुमची मनःशांती ढळू देणार नाही. भूतकाळातील चुका विसरून भविष्यातील यशाचा विचार करा. स्वयम् सुधारणेसाठी इतका वेळ द्या की दुसऱ्यावर टीका करायची वेळच उरणार नाही!

काम उद्यावर टाकण्याच्या सवयीमुळे नकारात्मकता वाढीस लागते. बौद्धिक शिक्षणाचा प्रभाव विचारशक्तीवर पडतो तर मूल्य शिक्षणाचा प्रभाव हृदयावर पडतो.

प्रत्येक विद्यार्थ्याची विशिष्ट विषयातील गती किंवा क्षमता ओळखून जीवन जगण्यासाठीची सर्वांगीण तयारी करून घेणारे शिक्षण म्हणजे खरे शिक्षण!!

अर्धवट ज्ञान धोकादायक असते अज्ञान हे भीती हटवादीपणा, पूर्वग्रह अशा दोषांना जन्म देते. आपल्या बलस्थानांची जोपासना करणे, शिकण्याची उत्कट इच्छा बाळगणे, अत्यंत गरजेचे आहे.

सकाळची सुरवात सकारात्मक वाचनाने केली पाहिजे. आपण जर आपल्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नातून समर्थ होण्यासाठी धडपडू दिले नाही तर त्यांचेच नुकसान करतो आहोत. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही,शिड कसं लावायचं हे आपण ठरवू शकतो ! माणसाच्या मनामध्ये जे रुजतं किंवा माणूस मनात जे आणतो आणि त्यावर विश्वास ठेवतो ती गोष्ट तो माणूस साध्य करू शकतो.

जास्त कष्ट कराल तितके तुम्ही जास्त नशिबवान असाल. सामान्य माणूस आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या फक्त एक चतुर्थांश काम करतो. जी माणसं आपल्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक क्षमतेने काम करतात त्यांना जग सलाम करते. आणि मोजकीच माणसं शंभर टक्के काम करतात त्यांना जग डोक्यावर घेतं.

कोणत्याही गोष्टीतील कौशल्य नशिबाने मिळत नाही त्यासाठी भरपूर कष्ट आणि सराव करावा लागतो. कठोर परिश्रम आणि अखंड सराव त्यामुळे माणसाच्या कामात सफाईदारपणा येतो. एक म्हण आहे “हातोड्याच्या घावाने काचेचे तुकडे होतात परंतु पोलाद घडविल्या जाते”.

एखादी गोष्ट आपल्या मनात येईल तेव्हा व तशी करणे ह्यापेक्षा जशी आणि जेव्हा करणे गरजेचे आहे त्यासाठी मनाची शिस्त असावी लागते. भावनांवर आपण मात केली पाहिजे आणि आपला आत्मविश्वास परत मिळविला पाहिजे. नकारात्मक विचाराचे लोक धोकादायक असतात. बहुसंख्य लोक आपल्या संपूर्ण आयुष्याची आखणी करण्यापेक्षा मौजमजेच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात अधिक वेळ घालवतात. सामान्य असणं जेवढं सोपं आहे त्यापेक्षा उत्तम असणं कितीतरी कठीण!!

माणसाचं व्यक्तिमत्त्व हे त्याचं चालणं, बोलणं, त्याच्या आवाजातील मार्दव, आणि आत्मविश्वास यामधून जाणवतं. माणसाचा दृष्टीकोन, वर्तणूक आणि त्यातून व्यक्त होणारा भाव यांचा मिलाफ म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व. चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव आपल्या कपड्या पेक्षा अधिक प्रभाव कारक असतो!

तुम्ही जेव्हा इतरांशी चांगलं वागत असता तेव्हा तुम्ही स्वत:शीही उत्तम वागत असता. चांगुलपणा नेहमी तुमच्याकडे परत येत असतो. हा जगाचा नियमच आहे. ‘जग आहे असं आपल्याला दिसत नाही तर आपण जसे आहो तसं ते दिसतं ‘. आपली चूक आपण तात्काळ आणि सहजतेने स्वीकारली पाहिजे. हे यशस्वी जगण्याचं तत्वज्ञान आहे. ‘स्वतःला एक प्रामाणिक माणूस बनवा म्हणजे जगातील एक लबाड माणूस कमी झाला!’ त्याबद्दल तुम्ही निश्चिंत व्हाल.

मित्रांनो, ह्या काही नोंदी किंवा ते टिपणं आहेत माझ्या डायरीतील, तुमच्याशी त्या शेअर कराव्या वाटल्या म्हणून हा प्रपंच!!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments