श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

☆ “ह्याचा इन्श्युरन्स निघत नाही” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

माझा एक दुकानदार मित्र आहे. वडिलोपार्जित व्यवसायात आहे. कधीही येता जाता त्याच्या दुकानापाशी हात करताना मला दुकानाबाहेर ठेवलेले उंदरांचे दोन पिंजरे दिसतात. पण त्यात पकडले गेलेले उंदीर मात्र कधी दिसले नाहीत. मी त्याला एकदा सहज विचारलं, “बाबा रे, आजतागायत एकदा तरी उंदीर सापडला का पिंजऱ्यात?” तो हसून म्हणाला,” दुकान सुरुवातीला नवं होतं,तेव्हां सहा महिने उंदीर सापडायचे. नंतर पुन्हा कधी सापडले नाहीत. सगळे उद्योग करुन झाले. भजी ठेवली,कॅडबरी ठेवली,चीज क्यूब्ज ठेवून पाहिले,नॉनव्हेजचे तुकडे ठेवून बघितले. पण हे उंदीर अफाट हुशार झालेत. त्यांच्या आवडीची कुठलीही गोष्ट त्यात ठेवा,तो सापळा आहे,हे त्यांना अगदी बरोबर समजतं. ते सगळ्या दुकानात धुडगूस घालतात, पण सापळ्याकडे फिरकतच नाहीत. मी आपला रित म्हणून रोज मोठ्या आशेनं पिंजरा लावूनच दुकान वाढवतो.” मीही हसण्याचा आनंद घेऊन त्याचा निरोप घेतला. पण त्याचं वाक्य मात्र डोक्यात घुमत राहिलं – आजकालचे उंदीरसुद्धा हुशार झालेत…!

असाच एक दुसरा प्रसंग माझ्या अगदी चांगला लक्षात राहिला आहे. आमच्या दारी गायींसाठी एका मोठ्या सिमेंटच्या पात्रात पाणी ठेवलेलं असतं. उन्हाळ्यात अनेकदा गायी फार लांबून लांबून पाण्यासाठी येतात. त्या कुणालाही कसलाही त्रास देत नाहीत. त्या येतात आणि पाणी पिऊन शांतपणे निघून जातात. पण एकानं त्या गायींना हुसकून लावण्याचा उद्योग सुरु केला. दगड मारणे, काठीने मारणे असे प्रकार सुरु केले. गायींचं त्यांच्या दारात थांबणं बंद झालं. आमच्याकडे येऊन पाणी पिऊन जायच्या. पुढं एका दिवाळीत वसुबारसेच्या दिवशी मी गायींना खाऊ घालत होतो, तेव्हां तेच गृहस्थ पुरणाची पोळी घेऊन आले आणि गायीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करु लागले. त्या गायीनं बाकी सगळ्यांचे गोग्रास घेतले, पण ह्यांच्याकडे ढुंकूनही न पाहता शांतपणे निघून गेली. गायीसुद्धा हुशार झाल्यात..!

हीच गोष्ट मधमाशांची आणि मुंग्यांची. एखाद्या ठिकाणी त्यांच्या जिवाला धोका असेल तर त्या ठिकाणी त्या वसत नाहीत. उलट त्या त्यांची अधिकाधिक सुरक्षितता शोधतात. माणसांचा उपद्रव होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतात. ‘लक्ष्मणरेषा’ नावाचा मुंग्यांचा उपद्रव टाळण्यासाठी उपयुक्त असा खडू मिळतो. त्याच्या रेषा धान्याच्या पोत्याभोवती मारल्या तर मुंग्या त्या बाजूनं फिरकत नाहीत. पण त्यावरचा मार्ग बरोब्बर शोधून काढतात. एकदा उन्हात आईनं वाळवणं घातली होती आणि बाजूनं लक्ष्मणरेषा मारल्या होत्या. पण मुंग्या असल्या बिलंदर की, त्यांनी गच्चीत पडलेलं एक छोटंसं वाळकं भुईमुगाच्या शेंगेचं टरफल ढकलत आणलं आणि त्या रेषेवर ठेवून वेढा फोडला. संध्याकाळी उन्हं कलल्यावर गोळा करायला गेलो तर सगळा प्रताप लक्षात आला. पण तोवर मुंग्यांचा डाव बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. म्हणजे, मुंग्यासुद्धा शहाण्या झाल्यात..!

प्रश्न आहे तो आपण माणसांचाच..! पर्यावरणातला सर्वात बुद्धिमान प्राणी असूनसुद्धा जगण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारं शहाणपण माणसाला का मिळवता येत नाही? स्वतःच्या बुद्धीचा वापर करुन मार्ग काढता येत नसेल तर किमान इतरांच्या अनुभवातून तरी योग्य तो बोध मनुष्यप्राणी का घेत नाही? ‘जब वुई मेट’ नावाच्या हिंदी सिनेमात भर रात्री अनोळखी प्रवाशाचा शोध घेण्यासाठी रेल्वेतून उतरलेल्या करिना कपूरला वयानं तिच्याहून वडील असणारा स्टेशन मास्तर “अकेली लडकी खुली हुई तिजोरी की तरह होती है” हे सांगत असतो. पण “यह ग्यान मुफ्त का है या इसके पैसे चार्ज करते हैं? क्योंकी चिल्लर नहीं है मेरे पास” असं मोठ्या तोऱ्यात सुनावणाऱ्या त्या करिना कपूरच्या तोंडचं ते वाक्य आपल्याला विनोदी वाटतं. पण त्या स्टेशन मास्तरच्या सांगण्यातली काळजी एकालाही दिसत नाही,जाणवत नाही. हाच तर आपल्या माणसांच्या शहाणपणातला उसवलेला टाका आहे.

रात्री तीन वाजता कुणालाही न सांगता, मित्रांसोबत घराबाहेर भटकणारी तरुण मुलंमुली दिसणं पुणेकरांना नवीन नाही. पावसाळ्यात कुणालाच न सांगता, कॉलेजला दांडी मारुन, खोटं बोलून परस्पर लोणावळा, भुशी डॅम, ताम्हिणी घाट अशा ठिकाणी भटकणारी मुलंमुली खरोखरच व्यवहारज्ञानी असतात का? सेल्फी काढण्याच्या नादात कड्यावरून कोसळलेली मुलं मुली, धोकादायक धबधब्यात उतरलेली माणसं खरोखरच प्रॅक्टिकली शहाणी असतात का? हा प्रश्न माझ्यासारखाच अनेकांना पडत असेल.

“आईवडील म्हणजे आपले सर्वात मोठे शत्रू” असं वाटणाऱ्या तरुण पिढीची आपल्या समाजात मुळीच वानवा नाही. मुलांच्या आयुष्यात घडणाऱ्या कित्येक गोष्टी अनेकांना ठाऊक असतात, पण त्यांच्या पालकांनाच ठाऊक नसतात. कित्येकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचे पालक ॲड नसतात. आपल्या मुलामुलींचं मित्र-मैत्रीण मंडळ पालकांना माहितच नसतं. आपल्या आयुष्यात काहीही घडलं तरी घरच्यांना सांगावंसं मुलांना का वाटू नये? हा खरोखरच काळजीचा मुद्दा आहे. आपल्याच परिवारातल्या माणसांपासून मुलंमुली गोष्टी लपवून का ठेवतात? अत्यंत महत्वाच्या गोष्टींबाबत सुद्धा आईवडीलांपेक्षा त्यांना मित्र अधिक जवळचे का वाटतात? आपल्या आयुष्यातली अत्यंत मोठी घटना घडल्यानंतर सुद्धा मुलंमुली पहिला फोन आपल्या पालकांना का करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर गांभीर्यानं शोधलं पाहिजे.

नागरिकशास्त्र हा विषय १०० गुणांचा केला पाहिजे,असं आता अनेकांना वाटतं. ते समाजातली एकूण परिस्थिती पाहता खरंच आहे. पण त्याहीआधी व्यवहारज्ञानाचं आणि स्वतःची सुरक्षितता जपण्याचं शिक्षण आपल्या कुटुंबातूनच मुलामुलींना मिळणं नितांत आवश्यक आहे. जगण्यातलं शहाणपण शिकण्यासाठी मुंग्या,उंदीर,गायी किंवा अन्य प्राणिमात्र कुठल्याही वेगळ्या व्यवस्थेकडे जात नाहीत. त्यांना ते शिक्षण त्यांच्या पालकांकडून मिळतं. मधमाशा सुद्धा त्यांची कुटुंब प्रमुख असलेल्या राणीमाशीचं ऐकतात. जगण्यातली शिस्त मोडत नाहीत. मन मानेल तसं वागत नाहीत किंवा वडीलधाऱ्यांचं सांगणं धुडकावून सुद्धा लावत नाहीत. त्यांच्या जगण्यातले निसर्गधर्म आणि परिवार व्यवस्था ते पूर्ण निगुतीनं आणि आदरानं जपतात, मोडीत काढत नाहीत.

आईवडील आणि कुटुंबातल्या अन्य मोठ्या माणसांच्या संपर्कात राहणं, त्यांच्याशी चांगला संवाद असणं, वागण्याबोलण्यात पारदर्शकता असणं म्हणजे बिनकोठडीचा तुरुंगवास नसतो. उलट तेच आपल्यासाठीचं अतिशय सुरक्षित आणि सहृदय वातावरण असतं, हे शहाणपण आपण माणसं कधी शिकणार? कारण, जगण्यातलं शहाणपण नसल्यापोटी जी किंमत मोजावी लागते, तिचा इन्श्युरन्स निघत नसतो..!

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

3 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

खूप छान !वेगळाच विचार मांडणारा लेख.