सुश्री ज्योती कुलकर्णी
विविधा
☆ “शांतीचे मनोगत…” ☆ सुश्री ज्योती कुलकर्णी ☆
एका पुरुषाला जिने घडवलं ती ‘जिजाऊ’!
एका पुरुषाने जिला घडवलं ती ‘सावित्री फुले ‘!
पुरुषांनी लाथाडलेली स्त्री शांताबाई!
पुरुषांनी लाथाडल्यावर तिची काय अवस्था होते, ही व्यथा मी तुमच्या पुढे मांडणार आहे.
मी सादर करते आहे कोल्हाट्याचं पोर मधील शांताबाईचे मनोगत. ‘कोल्हाट्याचं पोर’ या किशोरच्या आत्मकथनाच्या आधारेच मी ते लिहिलेले आहे.
पुरुषांनी लाथाडल्यावर त्या स्त्रीची काय अवस्था होते हे व कोल्हाटी समाजाचे चित्रण या पुस्तकात केलेले दिसून येते त्याचप्रमाणे स्वतःचीच आई शांताबाई हिच्या माध्यमातून कोल्हाटी समाजाची समाजातील स्त्रियांची अवस्था किशोरने मांडली आहे.
हे आहे कोल्हाट्याचं पोर मधील किशोर ची आई शांताच मनोगत….
मी शांता! किशोरची आई.
कोल्हाट्याचं पोर असलेल्या किशोर नं, माझ्या किशोरने त्याची कैफियत तुमच्यापुढे मांडलीच आहे. त्याच्यासोबत माझीही कहाणी त्याला तुम्हाला सांगावीच लागली. कारण कोल्हाट्याची पोर शांता जन्माला येते म्हणूनच कोल्हाट्याचं पोर किशोर जन्माला येतो.
माझी कहाणी मला तुम्हाला सांगायचीही लाज वाटते पण
पण सांगितल्याशिवाय तुम्हाला तरी ती कशी कळणार ?
जीजी साळी समाजातली होती पण माझ्या आज्याने, कृष्णा कोल्हाट्याने लक्ष्मीला, म्हणजे तिच्या निराधार आईला आसरा देण्याचं नाटक केलं व तिच्यासोबत ठेवलेल्या बाईप्रमाणे राहू लागला. तिची मुलगी जीजी त्याची स्वतःची नसल्यामुळे कृष्णा कोल्हाट्याने कोल्हाट्याच्या पिढीजात व्यवसायाला तिला लावले. ती तरी काय करणार? स्वतःचे वेडसर वडील घरातून पळून गेल्याने तिच्या आईला व जिजीला ते जीवन स्वीकारावेच लागले.
जीजी खूप सुंदर असल्यामुळे माधवराव पाटीलांनी तिला बायको प्रमाणे जवळ वागवले. स्वतःला दोन बायका असतानाही!
किशोरची आई शांता ही कृष्णा कोल्हाट्याच्या लग्नाच्या बायकोपासून झालेल्या कोंडीबा नावाच्या मुलाची मुलगी. म्हणजे मीच! मी पण सुंदर असल्याने आयतं बसून खाण्यासाठी माझ्या बापानं कोंडीबानं, मला नाच गाण्याच्या व्यवसायाला लावले.
पण जीजी सोबत माझाही सांभाळ माधवराव पाटलांनी मुलीप्रमाणे केला व मला शिक्षिका व्हायचे स्वप्न दाखवले. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर आम्हा दोघींना पण घराबाहेर काढल्या गेले.
जीजी सोबत माधवराव पाटलांनानी माझाही उद्धार केला एका शिळेची अहिल्या केली पण दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडल्याने या अहिल्येची पुन्हा शिळा झाली.
झाली कसली! माझा जन्मदाता प्रत्यक्ष कोंडीबा यानंच ती केली. स्वतःच्या स्वार्थासाठी !आयतं बसून खाण्यासाठी! स्वतः सारखेच बैल असलेले माझेच भाऊ पोसण्यासाठी! कोल्हाटी पुरुष ना ते !
याच कोल्हाटी जातीत सुंदर स्त्री म्हणून जन्माला येण्याच्या माझ्या दुर्दैवानेच माझा घात केला !
कोल्हाटी समाजात जन्माला येऊनही माधवराव पाटलांनी माझ्या मनात निर्माण केलेलं मास्तरीण होण्याचं आरशासारखं स्वच्छ सुंदर स्वप्न !
पाटलाच्या मृत्यूनंतर कोंडीबा ने त्याचा एका क्षणात चुराडा केला.
माझ्या मनात उत्पन्न झालेलं नव्या जीवनाच्या स्वप्नाचं बीजांकुर उगवायच्या आतच तुडवल्या गेलं! या….
या माझ्या बापानच चंद्रकलाबाईच्या पार्टीत मला नाचायला पाठवलं व माझ्या पायाला घुंगरू बांधले.
चंद्रकला बाईची पार्टी बंद पडली आणि मी घरी आले.
पुन्हा कुठल्या बाईच्या पार्टीत नाचायला जायची माझी इच्छा नव्हती. वाटत होतं नको ते पार्टीतलं जिणं!
माझ्या बापाला तर हृदय नव्हतंच! आणि बाहेरच्या समाजातील तरी आता कोण माझ्याशी लग्न करणार होतं?
घुंगराची बेडी एकदा पायाला पडली की ती पक्की होऊन जाते. दलदलीत फसलेल्याला बाहेर येणे कठीण असते!
हं! एखाद्या बाप आपल्या पोरीला घडवतो एखादा स्वार्थासाठी बिघडवतो.
करमाळ्याचे आमदार जगताप यांनी माझ्याशी चिरा लावला आणि किशोर चा जन्म झाला.
किशोरच्या जन्मा अगोदरच जगताप यांनी मला सोडलं.
एका नाचणारीणची समाजात काय किंमत असणार !
मला सोडल्याबद्दल त्यांना कोण जाब विचारणार !
आमचे भाऊ आणि बापच तर आमच्याशी सावत्रपणाने वागतात !
पुन्हा नशिबाला पार्टी आलीच! किशोरला रडत ठेवूनही नाचायला जावं लागायचं छातीवर दगड ठेवूनच.
ढेबेगावला किसन पाटलांनं माझी खोडी काढली. जीजीने तर त्याला चप्पलच मारली. गुंडाप्पा पाटलाच्या तावडीतून सुटून कसेबसे आम्ही नेरल्याला आलो. पुन्हा दुसरी पार्टी! पुन्हा धारूरकरांशी माझा चिरा लागला आणि दीपक चा जन्म झाला.
धारूरकर तसे चांगले. पण माझ्या दुर्दैवाने तिथेही माझा घात केला. धारूरकरांना मृत्यू आला. पुन्हा मला नाचायला जावं लागणार होतं.
कारण कोंडीबा च घर माझ्यावरच होतं.
आता तर माझी लहान बहीण सुशीलाही माझ्याबरोबर नाचायला तयार झाली होती.
‘ शांता सुशीला’ पार्टी नावारूपाला आली. आता हेच काम मनापासून करायचं ठरवलं होतं. मी गायची सुशीला नाचायची. गाण्यातच मी प्रगती केली. कारण पुन्हा नाचगाणं करायला जायचं असं जीवन मला नकोस झालं होतं. म्हणून कित्येकांनी मला मागणी घातली तरी मी त्यांना नको म्हटलं.
पण नाना वाडकर मात्र मला रडून रडून खूप विनंती करायचे. अखेरीस त्यांच्या भुलथापांना मी बळी पडले. माझ्याही पायातलं घुंगरू सुटणार याचा आनंद मला मनातून होताच!
स्त्रीचे दैव पुरुष कसे फिरवतो पहा त्यातून मी तर एक नाचणारी
माधवराव पाटलांनी मास्तरीण होण्याचं बीज लहानपणीच रुजवलं.
कोंडीबानं माझ्या बापान ते पायदळी तुडवलं.
तमाशात येणाऱ्या पुरुषांनी शेलक्या शिव्यांनी माझं स्त्रीत्व हवं तसं हिणवलं
नाना वाडकर यांनी मला पुन्हा संसाराचं आमिष दाखवलं.
त्यांच्याशिवाय मला गती नाही हे कळताच त्यांनी मला हवं तसं छळलं!
मुख्य म्हणजे माझ्या किशोरला मला मुकावं लागलं! कारण पायात पक्के फसलेले घुंगरू मला काढायचे होते ना!
पाय रक्तबंबाळ होणारच होते !मन जखमी होणारच होतं!
माझ्याच नाही तर माझ्यासारख्या माझ्या भगिनींच्याही माथ्यावरचा कलंक मला धुवून काढायचा होता !कायमचा !
नानांनी माझा किती छळ केला तरी म्हणूनच मी तो निमुटपणे सहन केला. त्यांनी किशोर आणि माझी ताटातूट केली.
आदर्श संसारी स्त्री बनण्याच्या नादात किशोरवरही माझ्याकडून अन्यायच झाला.
कारण माझ्या मनात केवळ एकच विचार होता!
पायातलं घुंगरू कायमचं फेकण्याचा! त्या एका वेडापायी किशोरच्या बाबतीत मी चुकलेच.
किशोरनंच एकदा म्हटले आहे आईच्या पायातलं घुंगरू सुटलं आणि मी मात्र तुटलेल्या घुंगराप्रमाणे एकाकी झालो. या कोल्हाटी समाजातच राहिलो. खरंच माझ्या किशोरला ही दलदलीतून बाहेर निघण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
त्यातूनही माझा किशोर एमबीबीएस डॉक्टर झाला.
पण किशोरला मला सांगावसं वाटतं की माझ्यासारख्या अनेक शांतांच्या पायातलं घुंगरू कायमचं सुटल्यावर या समाजातल्या अनेक किशोर वर तुटलेल्या घुंगरासारखं जीवन जगायची वेळ येणार नाहीये…
वेळ येणार नाहीये…
© सौ. ज्योती कुलकर्णी
अकोला.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈