सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “संत  निवृत्तीनाथ…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एखादी व्यक्ती घडते तेव्हा ती घडतांना अनेक नानाविध गोष्टींचा, व्यक्तीमत्वांचा तिच्यावर कळत नकळत प्रभाव पडतो आणि मग तिच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण होते. ह्यालाच आपण संस्कार असही म्हणतो. ह्यामधूनच त्या व्यक्तीचे कर्तृत्व बहरते,तिचा विकास होतो आणि काही वेळा तिच्याकडून अतुलनीय कामगिरी घडून एक अद्भुत, अद्वितीय व्यक्तिमत्त्व आकारास येतं आणि पुढे वर्षानुवर्षे आपण कित्येक पिढ्यानपिढ्या त्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो.

ह्याचप्रकारे आपल्यासगळ्यांच्या माऊली म्हणवल्या गेलेल्या अद्वितीय अविष्कार म्हणून घडलेल्या ज्ञानेश्वर माऊलींना घडविण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या निवृत्तीनाथांची आज प्रकर्षाने आठवण होते. संपूर्ण वारकरी मंडळींची साक्षात माऊली असलेल्या ज्ञानोबांना घडविण्याची किमया वा ताकद ही निवृत्तीनाथां कडे होती. माणसाच्या जडणघडणीत अनेक गोष्टींचा सहभाग असतो.त्यात जर ती व्यक्ती आपल्या सगळ्यांसाठी आदर्श व्यक्ती असेल तर आपण नकळत तीला घडविणा-या गोष्टींचा अभ्यास करतो.त्या गोष्टी लक्षात आल्यावर आपापल्या परीने त्याचे अनुकरण करायचा प्रयत्न करतो. अशा अनेक श्रध्दास्थानी आदरणीय व्यक्तींपैकी प्रामुख्याने निवृत्तीनाथांचे नाव अ्ग्रक्रमी राहील. नुकतीच  निवृत्तीनाथांची जयंती झाली.त्यांना कोटी कोटी प्रणाम.

भारतभूमी ही अनेक संताच्या सहवासाने पावन झाल्यामुळे खूप पवित्र, वैविध्यपूर्ण आणि संस्कृती ने परिपूर्ण झालेली आहे.अनेक संत,महात्मे येथे जन्मले आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना घडविले सुद्धा.त्यांच्या शिकवणी पैकी काही अंश जरी आपल्या कडून आचरणात आणल्या गेले तर जीवन धन्य होईल.

निवृत्तीनाथांचं अवघं 23 वर्षांचं आयुर्मान. पण ह्या अवघ्या 23 वर्षात अख्ख ब्रम्हांडाचं ज्ञान त्यांनी जगाला दिलं. त्यांची सगळ्यात मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी आपल्या ज्ञानोबारायांना घडविलं,वाढविलं. ज्ञानेश्वर माऊलींचे पालक,थोरले बंधू,गुरू, मार्गदर्शक, असं सर्व काही म्हणजे निवृत्तीनाथ जणू.त्यांनी आपलं मोठेपणं,वडीलपणं ह्या लहान भावंडांना आदर्श घडवून सार्थक केलं.

निवृत्तीनाथ,ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताई ह्या भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे सगळ्यात थोरले.जणू ह्या कुटूंबाचे पालकच.आईवडीलां- च्या पश्चात पालकांच्या जबाबदारीची भुमिका  निवृत्तीनाथांच्या वाट्याला आली.

भागवत संप्रदायाचे आद्यपीठ ज्ञानेश्वर माऊलींचे सकलतीर्थ,विश्वकल्याणासाठी पसायदानातील श्री विश्वेश्वरावो,आद्यगुरू, आदिनाथ ह्या उपाध्या लागलेल्या निवृत्तीनाथां च्या शिकवणींची आज परत ह्या निमीत्ताने मनोमन उजळणी होते.आईवडीलांबरोबर निवृत्तीनाथ एका जंगलात गेले होते.तेव्हा एका वाघाने त्यांना उचलून एका गुहेत नेले.त्या गुहेत त्यांना एका तेजःपुंज साधूने बहुमोल ज्ञान दिले. हेच ते त्यांचे गुरू, नाथपंथातील गहिनीनाथ होत अशी आख्यायिका आहे.

निवृत्तीनाथांनी एक हरीपाठ व तिनचारशे अभंग रचले आहेत.त्यांनी ज्ञानेश्वरांना सामान्य लोकांना समजेल, उमजेल अशा भाषेत गीता लिहावयास सांगितली, तीच ही भावार्थ दिपीका ज्ञानेश्वरी होय.

ज्ञानेश्वर, सोपानदेव ह्यांनी समाधी घेतल्यानंतर मुक्ताबाईंनी अन्नपाणी त्यागून देह ठेवला.त्यानंतरच निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. खरचं ज्ञानेश्वर माऊलींसारख्या व्यक्ती घडविणारे निवृत्तीनाथ अलौकिक शक्ती चे प्रतीक. त्यांना परत एकदा कोटीकोटी प्रणाम

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments