सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “अर्थसंकल्पाच्या निमित्ताने…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
नुकताच अर्थसंकल्प जाहीर झाला. सगळ्या देशाचं म्हणजेच अर्थतज्ञ मंडळींच ,व्यापा-यांच तसेच आर्थिक बाबीशी निगडित असलेल्या प्रत्येकाचं लक्ष ह्याकडे होतचं. प्रत्येक अर्थसंकल्प हा थोडी खुशी थोडा गम स्टाईलच असतो. ह्यामुळे ह्यात कोणाला जरा दिलासा मिळतो तर कुणाला पुढील सगळ्या गोष्टींची तरतूद करून ठेवावी लागते.
लहानपणापासून प्रश्न पडायचा हे अर्थशास्त्र, अंदाजपत्रक म्हणजेच बजेट आणि अर्थसंकल्प ही काय गोष्ट आहे? तेव्हा ह्या बाबींशी फारसा संबंध न आल्याने ह्याचे चटकन आकलन व्हायचे नाही..
मग थोडसं ह्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं अर्थसंकल्पामध्ये आयव्ययाचे म्हणजेच जमाखर्चाचे अंदाजपत्रक करआकारणी, वस्तुंच्या किमती ह्या सगळ्याची सविस्तर मांडणी म्हणजेच एक प्रकारचं गणित असतं.थोडक्यात अर्थसंकल्पाची व्याख्या म्हणजे विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमाखर्चाची ताळमेळ बसवतं तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प. प्रत्येक व्यक्तीला आणि संघटनेला अर्थसंकल्प ,बजेट ह्या गोष्टी आखाव्याच लागतात. त्यानुसार आपले खर्चाचे आणि उत्पादनाचे कार्यक्रम योजावे लागतात.
लहानपणी आईबाबांची,वडीलधाऱ्या मंडळींची बजेट,बचत,तरतूद ह्या बाबींना व्यवस्थित महत्त्व देणं बघतं आलेय.आणि आज जरा युवावर्गाचे आजचा दिवस मस्त जगून घ्यावा, उपभोगून घ्यावा हा फंडा पण बघतेयं. ह्या दोन्ही बाबी अगदी तशा विरोधी त्यामुळे कायम मनात द्वंद्व उभं राहायचं नक्की कोणाचं बरोबर आधीच्या पिढीचं की नंतरच्या पिढीचं.
पण दोन वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या आकस्मित संकटाने ह्या प्रश्नाचं उत्तरं जवळपास शोधून दिलं.तसं तर कोणतीच टोकाची भुमिका ही बरोबर नसते पण योग्य म्हणून निवडायची झाली तर मला जास्त मागील पिढीची
भूमिका म्हणजेच भूक नसली तरी शिदोरी ही हवीच ही जास्त पटली. लहानपणी आईबाबांची बजेट,नियोजन, पुढील तरतूद ह्या गोष्टी म्हणजे कंजुषपणा वाटायचा. पण आता वाढत्या प्रचंड महागाईने,आर्थिक डोलारा डळमळीत झाल्याने,रोजगार मिळण्याच्या भ्रांत पडण्याच्या परिस्थिती ने परत एकदा आईबाबाचं बरोबर हे मी मनोमन कबूल केलयं.
पुढे बँकींग सेक्टर मध्ये काम करतांना “अंथरुण पाहून पाय पसरावे”, ह्या म्हणीचा प्रत्यय बघण्याचा योग खूपदा आला.बरेच जण आर्थिक नियोजन नीट न करता वारेमाप कर्जामुळे मानसिकरित्या कोलमडलेले पण बघण्यात आले.त्यामुळे मला मुळात आधीच भविष्याचे नीट नियोजन, आखीवरेखीव संकल्पना, आपलं बजेट हे आधीचं आखून कच्चा आराखडा तरी तयार असणं हे आवडायचं पण ह्या बँकींग सेक्टर मध्ये आल्याने त्याची आवश्यकता ही नक्कीच लक्षात आली.व्यापक दृष्टिकोनातून खूप काही शिकायला मिळालं,अनुभव गाठीशी बांधता आले.त्यामुळे दरवर्षी बजेट आखतांना हे मनाशी मी आधीच ठरवायचे आरोग्य,शिक्षण आणि घरचे ताजे सात्विक खाणे ह्यात अजिबात नो काटकसर परंतू चैनीच्या गोष्टी, ज्याचा कधीच अंत नसतो अशा रोज बाजारात नित्यनवीन येणाऱ्या गोष्टी, ज्या गोष्टी कमीपैशात वा स्वस्तात मिळाल्यातरी स्टेटस च्या नावाखाली डोलारा आखणं ह्याला अजिबात मनातच थारा द्यायचाच नाही.
खरचं प्रत्यक्ष संसारातील, घराचं बजेट तयार करतांना यजमान वा गृहीणीची तारांबळ उडते तर प्रत्यक्ष एवढ्या मोठ्या देशाचं आर्थिक नियोजन ही काही साधीसोप्पी गोष्ट नव्हे.तरी दरवर्षी केंद्रीय अर्थमंत्र्यांना ही कसरत करावीच लागते आणि सामान्य जनता त्यातील लाभ हानी जाणून घ्यायला उत्सुक असते.असा हा पैशांचा खेळ व्यवस्थित मेळ घालून खेळावाच लागतो.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈