सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “किमया प्रेमाची…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो.आणि प्रत्येकजण आपापल्या परीने रास्तच असतो. त्यामुळे आधी आपल्या मताला,आवडीला आपल्या दृष्टिकोनाला महत्त्व हे द्यावंच पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूचाही थोडी वेगळी वाट उमजून, समजून घ्यावी.
गेले सात दिवस व्हँलेटाईन उत्सव साजरा होत होता. आता हे आनंदाची,प्रेमाची उधळण करीत आलेले सात दिवस साजरे करायचे की त्याकडे “नसती थेरं”हे बिरुद लावून अगदी जाणीवपूर्वक त्याला फक्त आणि फक्त विरोधच करायचा ह्याबाबतीत प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र असं मत असणारच आहे परंतु एक नक्की काही वेळा आपल्या मतांना थोडं दूर ठेऊन, आवडींना जरा बदलाची कलाटणी फोडणी देऊन साजरे करायचे हे आपले आपण ठरवायचे.
.. नुकताच कुठे आत्ता हा तरुणाई चा उत्सव संपला, जरा कुठे हुश्श झालं बघा.कुठलीच संस्कृती, धर्म, पंथ कधीच चुकीची शिकवण देत नसतो. खरतर चुकीचा असतो आपला दृष्टिकोन त्याकडे बघण्याचा,चुकीची असते ती कुठलीही आपली टोकाची भुमिका.काही जणांनी पूर्ण सप्ताह वेगवेगळ्या दिवसांचे महत्व जाणून साजरा केला तर काही जण प्रेम करायला ह्या दिवसांची गरजच नाही मुळी, प्रेम ही सदासर्वकाळ मनातून उमलून येऊन करण्याची गोष्ट ह्या मतांचे.दोन्हीही विचार आपापल्या जागी योग्यच.अश्याच एका “तो”आणि “ती”ची गोष्ट. हे दोघेही नुकतेच ह्या स्वप्नाळू आठवड्या तून बाहेर पडून परत आव्हानं स्विकारुन जगायला सिद्ध झालेत. नुकतीच दोघही ह्या आभासी जगात फेरफटका मारून मोठ्या कष्टाने काडीकाडी जमवून साठवलेली गंगाजळी ह्या प्रेमाच्या लाटेत जरा अटलीच ह्या वास्तवतेची जाण येऊन भानावर आलीत. रोज आपण जो गिफ्ट्स चा मारा केला तो एक मार्केटिंग फंडा होता हे त्यांना उमगले.शेवटी सगळे हप्ते जाऊन महिना अखेर किती उरलेत ह्याचा हिशोब ती करु लागली.शेवटी प्रेम हे मनातून फुललं,जपलं,जाणवलं,आतून वाटलं तेच खरं आणि हे शेवटापर्यंत पुरून उरणारं असतं हे पण खरं.त्यामुळे आता संपूर्ण वर्ष परस्परांची काळजी घेऊन,एकमेकांच्या सोयी बघून,त्यानुसार वागून हा कायमचा वर्षभराचा व्हँलेंटाईन जास्त सुख देईल हे पण त्यांना उमगले.तरीही ह्या साजरा केलेल्या उत्साहाने त्या निमीत्ताने का होईना आपण दोघे जरा जास्त जवळ आल़ो हे पण त्यांना कळले. असो
ह्या निमित्ताने मागे मीच केलेल्या रचनेने आजच्या पोस्टची सांगता करतेयं.
काय ते गिफ्ट्स, काय ते बुके,
बाजार नुसते सजले होते,
हीररांझा,सोनीमहिवाल काय ह्या
“डेज”ची वाट बघत बसले होते,?
पानोपानी फुल फुलावे,
पडावे अंगणी प्राजक्ताचे सडे,
ख-या प्रेमाचा साक्षात्कार झाला,
तर रोजच असेल व्हँलेंटाईन डे.।।
व्हँलेंटाईन म्हणजे नको खरतरं
एकमेकांत अजिबात दुरावा,
आठवण इकडे अन उचकी तिकडे,
हाच असेल बघा फक्कड पुरावा,
प्रेमात नको नुसत्याच अपेक्षा,
हवे जोडीला त्याग आणि समर्पण,
मग काय रोजच व्हँलेंटाईन आणि
अंगणी फुलेल बघा नंदनवन।।
नकोत नुसती उणीदुणी,
हवे एकमेकांशी समरसून जगणे,
व्हँलेंटाईन म्हणजे तरी काय हो,
शेवटी परस्परांना सांभाळूनच तर घेणे,।।।
प्रेम म्हणजे नसतो नुसताच सहवास,
प्रेम म्हणजे खरतरं एक सच्चा “एहसास”,
मनोमनीच्या प्रेमाची किमयाच न्यारी,
कोसो अंतरे ते लिलया पार करी,
कोसो अंतरे ते लिलया पार करी,।।।
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈