सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “गंगूताई हनगल…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
(पाच मार्च- जन्म दिनानिमित्त)
श्रीमंती म्हणजे नेमकं कायं ह्या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या त-हेने देऊ शकतील.मला विचारलं तर मी म्हणेन आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या व्यक्ती म्हणजे आपली श्रीमंती.आणि म्हणूनच आपला भारत देश हा मला वाटतं ह्या अर्थाने एक खूप जास्त श्रीमंत राष्ट्र असावं.
ह्या अनुभवी,जेष्ठ मंडळींबद्दल तर आपल्या प्रत्येकाच्या मनात नितांत आदर हा असतोच. म्हातारं वयानं असणं आणि म्हातारपणं येणं ह्या दोन निरनिराळ्या संकल्पना आहेत हे ह्या निमीत्ताने मला नव्यानेच उमगलं.म्हातारपण येण्यात खरतरं वयाचा संबंध नसून त्या मनोवृत्तीचाच खरा संबंध असतो हे अगदी मनोमन पटलं.कित्येक वयानं वयस्कं झालेल्या लोकांमधील तरुणाईला सुद्धा लाजवेल अशी कामाची आवड,चपळता,हौस, सकात्मकता, एनर्जी बघायला मिळते तर कित्येक तरुण व्यक्तींमध्येही कित्येकदा कमालीची विरक्ती,आळस,कामाची नावड,नकारात्मकता, औदासिन्य बघायला मिळतं.अशावेळी खरचं कळतच नाही म्हातारपणं हे कोणत्या मापदंडाने मोजावं.ही म्हातारपणातील तरुणाई आणि तरुणाईतील म्हातारपणं बघितले की चटकनं ती चवनप्राश वाली जाहिरात आठवते, “सोला साल के बुढ्ढे ओर सौ सालके जवान”वाली जाहिरात.
5 मार्च.आज अशाच एका अगदी कापसासारख्या म्हाता-या होऊन गेलेल्या पण शेवटच्या श्वासापर्यंत तरुणाई टिकवून ठेवणा-या व्यक्तीची जयंती. ही व्यक्ती संगीत क्षेत्रातील असून हे क्षेत्र प्रिय असणाऱ्या व्यक्तींसाठी तर ह्या दैवतच.ह्या व्यक्ती म्हणजे हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका गंगूताई हनगळ.
ह्यांचा जन्म 5 मार्च 1913 ला धारवाड येथे झाला. संगीताचे प्राथमिक धडे ह्यांनी दहाव्या वर्षी स्वतःच्या आईकडून घेण्यास सुरवात केली आणि वयाच्या अकराव्या वर्षी 1924 साली बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी महात्मा गांधी,नेहरुजी, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनीदेवी नायडू ह्यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गाऊन वाहवा मिळविली. काही काळ त्या कथ्थक नृत्य शिकल्या.मग 1938 पासून सवाई गंधर्व म्हणजेच रामचंद्र कुंदगोळकरांकडे किराणा घराण्याची गायकी पंधरा वर्षे साधना करून प्राप्त केली. त्यांना भिमसेनजी जोशी ह्यांचीही संगत लाभली.
सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह हुबळी येथील वकील व्यावसायिक गुरुराज कौलगी ह्यांच्याशी झाला. कौलगींना संगीताची जात्याचं खूप आवड असल्याने ग़गूताईंची संगीतसाधना ही शेवटपर्यंत टिकली,जोपासल्या गेली. त्यांचे संगीतसाधनेतील कारकीर्द आणि लोकप्रियतेचे टप्पे बघितले की खरचं अचंबीत व्हायला होतं. त्यांच्या जाहीर कार्यक्रमांची सुरवात 1931मध्ये
त्यांची एच.एम.व्ही.कडून गाण्याची पहिली तबकडी 1932 मध्ये तर आकाशवाणी वर पहिला कार्यक्रम 1933 मध्ये झाला.
कुठल्याही व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा ध्यास असला तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ती व्यक्ती कितीही आणि कोणतेही अडथळे पार करु शकते.फक्त इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेऊन सुद्धा गंगूताई आपल्या संगीतसाधनेच्या जोरावर धारवाड विद्यापीठाच्या मानद संगीत प्राध्यापक झाल्यात.त्यांनी परदेशात अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेत.संगीताच्या कार्यक्रमांमुळे त्या अमेरिका, इंग्लंड, कँनडा, नेपाळ,नेदरलँड, पाकिस्तान, जर्मनी, फ्रान्स व बांगलादेश इ.ठिकाणी जाहीर कार्यक्रम करण्यासाठी गेल्या.
भारतसरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण ह्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरविले.त्यांना पन्नास पेक्षाही जास्त मानाचे पुरस्कार मिळालेत.त्यांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी शाळा,महाविद्यालयातून सुमारे 200 जाहीर कार्यक्रम केलेत.त्यांना गानरत्न, गानसरस्वती,रागरागेश्वरी ह्या सारख्या उपाध्या मिळाल्यात.हुबळीमधील त्यांचे “गंगालहरी” नावाचे घर सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.हुबळीला सुमारे पाच एकर जागेत अद्ययावत संगीत गुरुकुल उभारण्यात आले.
सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंगूताईंनी त्यांचा तब्बल दीड तास चाललेला शेवटचा जाहीर गाण्याचा कार्यक्रम वयाच्या अवघ्या 89 व्या वर्षी दणदणीत पार पाडला. वयाच्या 96 व्या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी शेवटचे गायन केले.त्या दिवशी त्या दहा मिनीटे सलग गायल्या.खरचं आहे नं हा तरुणाईला लाजवणारा उत्साह, मेहनत, साधना अशा ह्या थोर,अख्ख आयुष्य संगीतसाधनेला वाहून घेणाऱ्या गंगूताई हनगळांनी 21 जुलै 2009 रोजी अखेरचा श्वास घेतला.खरचं अशा थोर विभुती बघितल्या की नतमस्तक व्हायला होतं हे नक्की.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈