श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “वाघांची संख्या…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
ते आपल्या आजूबाजूला वर्तमानपत्र, लॅपटॉप, मोबाईल असा सगळा पसारा मांडून बसले होते. स्वतः काढलेली, आपल्यासाठी इतरांकडून (मुद्दाम) काढून घेतलेली, जूनी, नवीन अनेक (फक्त आणि फक्त वाघांची) छायाचित्रे देखील ते परत परत पहात होते. (सारखे सारखे पाहून त्यांच्या मानेला देखील रग लागली होती. म्हणून त्यांनी मानेचा पट्टा परत एकदा नीट केला.) पण त्यांच्या दृष्टीने त्यांच्याकडे (भागात) असलेले वाघ आणि जाहीर झालेली वाघांची संख्या याचा ताळमेळ काही बसत नव्हता. आपल्या मुलाच्या कॅमेऱ्यात काही (आपल्या) वाघांचे फोटो आहेत का? म्हणून त्यांनी मुलाला हाक मारली. पण तो आदि(च) कुठेतरी याच कामासाठी (नेहमीप्रमाणे) गेला होता.
मागच्या काही काळात यांना आकडेवारी गोळा करायची आणि आपणच सांगायची अशी सवय लागली होती. पण आज ते जाहीर झालेली आकडेवारी बघत होते. आकडेवारी नुसार वाघांची संख्या वाढली होती. पण मग हे वाढलेले वाघ नक्की कुठे आहेत? हाच प्रश्न त्यांना पडला होता. हे म्हणजे “बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी” प्रमाणे आपण प्रयत्न करुन देखील वाघांची संख्या आपल्या हद्दीत नाहीच वाघांचे ठाणे (घरोबा) दुसरीकडेच. अशीच परिस्थिती सध्या जाणवत होती.
यासाठी त्यांनी काटेकोरांना देखील कामाला लावले होते. पण कामाला लावण्या अगोदरच एखादे काम अंगावर घेण्याची सध्या त्यांना सवय लागली असल्याने काटेकोर अगोदरच कामाला लागले होते. काहीही करून हे काम वेळेच्या आधी संपवायचे असा त्यांचा विचार होता, त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने ते आपल्या घड्याळात बघत होते. पण काटेकोरांसमोर देखील नाना अडचणी होत्याच. आता मदतीसाठी नक्की कोणाचा हात घ्यावा यावर ते विचार करत होते, पण या समस्येवर काही प्रकाश पडत नव्हता. त्यांना आकडेवारी लवकर हवी होती, त्यामुळे दूरदृष्टीचे संजय त्यांना सध्यातरी नको होते. काकांना विचारावे असे वाटल्याने त्यांनी काकांना फोन देखील केला. काका म्हणाले अरे वाघांचे काय घेऊन बसला आहेस.
दुपारी वाघ गुहेत आराम करत होते तेव्हा यांची (चार) माणसे विनाकारण वणवण फिरत कारण नसतांना वाघ शोधत होते. तेव्हा वाघ सुरक्षित व आपापल्या गुहेतच होते. आणि रात्री दमून भागून यांची माणसे आराम करत होती तेव्हा वाघ गुहेतून बाहेर पडले आणि भक्ष्य शोधण्याच्या नादात ते दुसऱ्या हद्दीत कधी आणि कसे पोहोचले ते लक्षात देखील आले नाही. आणि आता तिथेच त्या वाघांना सुरक्षित वाटत असेल तर ते सुरक्षित असेपर्यंत तिथेच थांबतील, परतणार नाही ना……. वाघ जरी असला तरी तो इतरांसाठी…… त्याला स्वतःला सुरक्षित वाटले पाहिजे की नाही……..
प्रश्न सगळ्या वाघांचा असेल तर एकत्रित दिलेली आकडेवारी जवळपास खरी असेल. पण प्रश्न फक्त आपल्याच भागातील (आपले) वाघ आणि त्यांची संख्या असा प्रश्न असेल तर ते प्रत्येकाने आपले आपणच पाहिलेले जास्त बरे असते. कारण वाघांचे देखील काही प्रश्न असतीलच ना….. नाहीतर तो असा भटकला किंवा भरकटला असता का?
ते उगाचच आपली हद्द सोडून कशाला जातील.….. दुसऱ्या हद्दीत जातांना त्यांना देखील भिती असतेच. तु याचा विचार करु नकोस. तुला दुसरे काही काम नसेल तर मी सांगतो काय करायचे ते. असे म्हणत काकांनी फोन ठेवला सुध्दा……..
आता काय? वाघ किती? आणि त्यापैकी आपले किती? यातही लहान वाघ आणि मोठे वाघ यांची खरी संख्या कळण्यासाठी सगळ्यांनाच काही काळ थांबणे भाग आहे. या काळात प्रत्येकजण आपापल्या भागातील वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करेलच…… बाकी वाघ समर्थ आहेच………….
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈