सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “रूचिरा आणि खवय्ये…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
कुणाच्यही ह्रदयात शिरायचा मार्ग हा त्याच्या पोटातूनच जातो अशी आपल्याकडे एक म्हण आहे. खरचं, आपल्याकडील खवैय्येगिरी बघितली की ही म्हण पटते सुद्धा. खाद्यसंस्कृती म्हंटली की त्यात दोन बाजू असतात. एक बाजू खाण्याची आवड असणाऱ्यांची आणि दुसरी बाजू सुगरणगिरी करीत मनापासून आग्रहाआग्रहाने खिलवणा-यांची.
खाण्याची आवड असणाऱ्यांमध्येही प्रकार असतात काही सरसकट सगळेच पदार्थ आवडीने,खाण्याचा मनमुराद आनंद लुटणारे तर काही चोखंदळपणे नेमकेच विशिष्ट पदार्थ आवडून त्याचा मनापासून स्वाद घेणारे. मी माझ्याच बाबतीत अभ्यास केल्यावर लक्षात आलं,आधी शिक्षण,मग नोकरी ह्यामुळे स्वयंपाकघरात घुसघुस करणा-यातली मी नक्कीच नव्हे. त्यामुळे मला स्वतः ला शक्यतोवर घरचं,ताजं अन्न इतकीच माझी डिमांड मग बाकी नो आवडनिवड. फक्त एक गोष्ट जे काही पदार्थ करते ते होतात मात्र चवदार, सगळ्यांना आवडतील असे.आता ही कदाचित अन्नपूर्णेची कृपा असावी वा आपल्या जवळच्या माणसांच माझ्यावरील प्रेम, मला बरं वाटावं म्हणून गोड पण मानून घेत असतील बिचारे.
खिलविणा-यांमध्येही प्रकार असतात. काही अगदी ओ येईपर्यंत मनापासून आग्रह करून करून खाऊ घालणार तर काही मला आग्रह अजिबात करता येत नाही तेव्हा हवं तेवढं मनसोक्त पोटभर खा असा सज्जड दम देणारे.
ह्या सगळ्यांमुळे आज अगदी हटकून घराघरात पोहोचलेल्या अन्नपूर्णेची आठवण प्रकर्षाने झाली. 20 एप्रिल ही तारीख खास सुगरण व्यक्तींच्या आणि त्या सुगरपणाला दाद देणा-या खवैय्ये लोकांच्या तोंडची चवच घालवणारी तारीख. 20 एप्रिल 1999 रोजी साक्षात अन्नपूर्णेची छाप असणा-या प्रतिअन्नपुर्णा म्हणजेच कमलाबाई ओगले ह्यांचा स्मृतिदिन.
कमलाबाईंना “सव्वालाख सुनांची सासू”असं म्हंटल्या जायचं.खरोखरच 1970 साली अगदी अल्पावधीतच मेहता पब्लीकेशन्सने प्रकाशित केलेल्या कमलाबाई ओगले ह्यांनी लिहीलेल्या “रुचिरा”ह्या पुस्तकाच्या सव्वालाख प्रती हातोहात विकल्या जाऊन त्यापासून ब-याच जणींना बरचं काही शिकता आलं ही गोष्टच खूप अलौकिक खरी. नवीनच संसाराला सुरवात करणाऱ्यांसाठी रुचिरा पुस्तक म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेले नवनीत ,बालविद्या डायजेस्टच जणू.
खरतरं कमलाबाई फक्त चार इयत्ता शिकलेल्या. पण दांडेकर घराण्यातून एका लहानशा खेडेगावातून लग्न करून त्या सांगलीच्या ओगले कुटूंबात आल्या आणि त्यांच्या सासूबाईंच्या हाताखाली पाकशास्त्रात एकदम पारंगत झाल्यात.पुढे त्यांचे वास्तव्य काही काळ आँस्ट्रेलियात पण होते.
त्यांच्या “रुचिरा” ह्या पुस्तकात मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे पदार्थांसाठी लागणा-या जिन्नसांची मापं ही चमचा वाटीने मापलेली आहेत.ते ग्रँम,मिलीग्रँम असं आखीवरेखीव मोजमाप माझ्यासारख्या वैदर्भीय खाक्याला झेपणारचं नव्हतं मुळी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकात असलेली साधी,सरळ,सोपी,चटकन डोक्यात शिरणारी भाषा.आणि तिसरी ह्या पुस्तकातील आवडणारी बाब म्हणजे ह्या पुस्तकातील पदार्थ हे आपल्याला नित्य लागणा-या जेवणातील वा आहारातील आहेत.जे पदार्थ आपण वर्षानुवर्षे, सठीसहामाशी कधीतरीच करतो अशा पदार्थांचा भरणा कमी व नित्य स्वयंपाकात लागणा-या अगदी चटण्यांपासून चा समावेश ह्या पुस्तकातं आहे.
मला स्वतःला हे “रुचिरा” पुस्तक बरचं पटल्याने,भावल्याने बहुतेक लग्न ठरल्यावर वा नुकतेच नवविवाहित मुलींना मी हे पुस्तक आवर्जून भेट द्यायचे.आतातर शिक्षणाच्या, नोकरीच्या निमीत्त्याने घरापासून दूर राहणाऱ्या तसेच लग्नाळू मुलांना पण हे पुस्तक भेट म्हणून द्यायला अगदी योग्य आहे.किमान स्वतःच्या उदरभरणाइतके तरी पदार्थ स्वतःचे स्वतः करता यायलाच हवे मग तो मुलगा असो वा मुलगी. कुठल्याही व्यक्तीने स्वतः हाताने आपल्या आवडीनुसार घरच्या घरी रांधणं ह्यासारखी तर उत्तम आणि फायदेशीर गोष्ट नाही. आपल्या घरात आपण जे शिजवू ते आपल्या चवीनुसार असेल,त्यात उत्तम जिन्नस वापरलेले असतील,स्वच्छता सांभाळलेली असेल आणि नक्कीच विकतच्यापेक्षा निम्म्या किमतीत हे पदार्थ घरच्याघरी बनतात.
ज्यांची ह्या रुचिरा वर श्रद्धा वा विश्वास होता त्या आमच्या शेजारच्या काकू कितीही खिळखीळं झालं असलं तरीही त्यांचं जुनं रुचिरा हे पुस्तक वापरायच्या.मला ते बघून कायम भिती वाटायची की खिळंखीळी झालेली ती पुस्तकाची पानं इकडची तिकडं का सरकली तर त्या पदार्थांची काय वाट लागेल कोण जाणे. म्हणून मी त्यांच्या वाढदिवसाला मुद्दाम नवीन रुचीराची प्रत भेट म्हणून दिली. तरीही त्या ग्रेट काकू नवीन पुस्तक छान कव्हर घालून शेल्फ मध्ये ठेवायच्या आणि ते जूनंचं पुस्तक बरोबर असल्यासारख्या वापरायच्या.
काहीही असो आज ह्याच रुचिराकार कमलाबाईंच्या पुस्तकातून वाचून, शिकून कित्येक नवीन सुनांच्या घरची मंडळी “अन्नदाता सुखी भव,अन्नदात्याचे कल्याण होवो”हे आपोआप म्हणायला लागले.
ह्या रुचिरावाल्या आजींच दिनांक 20 एप्रिल 1999 साली निधन झालं. पण आजही त्यांच्या रुचीराच्या रुपांत घरोघरी त्यांच अस्तीत्व जाणवतयं हे खरं.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈