श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “उंदीर…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
त्या तिथे राहणाऱ्या उंदरांची तातडीने बैठक बोलावण्यात आली होती. विषय होता उंदरांची वाढती संख्या आणि त्यांचा मुक्त संचार यांचे झालेले व्हिडिओ चित्रण आणि त्याची बातमी.
बैठकीत (महत्वाच्या उंदीरांसह) सगळ्यांनाच आमंत्रण होते. पण काही (महत्वाचे) उंदीर उपस्थित तर नव्हतेच, पण नाॅट रिचेबल देखील होते. काही तर सहज फिरत फिरत दिल्ली पर्यंत पोहोचले होते अशी चर्चा होती. बैठक कशासाठी होती हे बाजूला राहिले, आणि कोणते उंदीर बैठकीला नाहीत यावर कुजबुज सुरु झाली.
महत्वाचा प्रश्न होता तो व्हिडिओ मध्ये चित्रीत केले गेलेले उंदीर नेमके कोणते होते? आपलेच की दुसरे…
आपली वाढती संख्या आणि आपला इथे असलेला मुक्त संचार याची बातमी किती महत्वाची होऊ शकते. यावर काय करायचे यावर चर्चा सुरू झाली.
करायचे काय? मध्यंतरी वाघांची वाढती संख्या यांचे किती कौतुक झाले. मग आपल्या बाबतीत देखील तसेच व्हायला पाहिजे… अगदी जागतिक पातळीवर वाघांची संख्या किती? पैकी आपल्या देशात किती? यांच्या टक्केवारी सह सगळी माहिती आणि सोबत फोटो सुध्दा छापले होते. आपल्या बाबतीत निदान प्रदेश पातळीवर संख्या दिली पाहिजे. …एक विचार…
अरे वाघ आणि उंदीर यात फरक आहे हे लक्षात येईल का? त्यांची संख्या वाढायला खास प्रयत्न झाले. त्यासाठी निधी होता… आपले काय?… आपल्याला पकडण्यासाठी कंत्राट दिले जाते. आणि त्यात देखील भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जाते. म्हणजे त्यांच्या वाढीसाठी निधी, आणि आपल्याला पकडण्यासाठी निधी. हा फरक लक्षात येतो का? आजकाल पकडायला कोणतेही कारण पुरेसे आहे… एक ज्येष्ठ विचार…
ज्येष्ठ म्हणून त्यांचा विचार उघडपणे डावलला गेला नाही. पण आम्हाला देखील थोडे महत्व मिळायला पाहिजे. आपल्यात देखील आता घराणेशाही रूजत चालली आहे. व याचा फटका आम्हाला बसतो. अशी कुरकुर (विचारांना कुरतडणे) लहान उंदरांची सुरू झाली.
फटका म्हणजे काय? चांगलाच बसतो. आपण या इमारतीचे माळे (मजले) वाटून घेतले. पण महत्वाचे मजले ठराविक उंदरांकडेच आहे. आमच्या वाट्याला आलेल्या मजल्यांवर खाण्यापेक्षा जास्त फिराफीर करावी लागते. काहीतर या इमारतीमध्ये कधी यायला मिळेल याच विचारात अजुनही आहेत. याचाही विचार करावा लागेल…
यांच्या वाट्याला नवीन करकरीत कागद. आणि आमच्या वाट्याला जुनाट कागद. असे किती दिवस चालणार. आमचे घराणे नावलौकिक केव्हा मिळवणार… उंदीर असलो म्हणून काय झाले? आपल्यातलेच काही खूपच गलेलठ्ठ झाले आहेत. त्यांचे काय?
किती दिवस काही ठराविक उंदीर चांगले कागद कुरतडणार, आणि आम्ही मात्र फक्त वायर चघळायच्या. आता तर त्या वायरवर देखील वेगळे आवरण असते. काहीवेळा ती सहज कुरतडता येत नाही. काहीवेळा तर वायर कुरतडतांना शाॅक लागायची भिती वाटते. यांच्या कागदांचे बरे असते. हे विचारांचे कुरतडणे थोडे वाढत चालले होते.
तेवढ्यात इमारतीमध्ये उंदराचे पिंजरे आणणार आहेत अशी बातमी एका उंदराने आणली.
आता बाकी सगळे बाजूला ठेवा. आणि सगळे वातावरण शांत होईपर्यंत काळजी घ्या. उगाचच मोकळेपणाने फिरु नका. तुर्तास यावरच आपण थांबू. मग पुढचे बघू. जे इमारतीच्या बाहेर आहेत त्यांची काही व्यवस्था होते का ते बघू, पण उगाचच येथे येण्यासाठी धडपड आणि घाई करु नका. असा सबुरीचा सल्ला देत बैठक संपवली. आणि सगळेच उंदीर मिळेल त्या बिळात शिरले.
आता त्यांची आपसात कोणत्या बिळात कोणता उंदीर गेला आहे याची चर्चा सुरू झाली आहे…
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈