सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “वाचनवेड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
…नव्याची नवलाई खरच आगळीवेगळीच असते हे काही खोट नव्हे. सगळं कसं अप्रुप, कौतुकाचं. माझं जरा बरं नसणं पण मी नवलाईने एन्जॉय करतेयं. हा आता मोबाईल, वाचन ह्या आवडत्या गोष्टींवर आलाय खरा थोडा अंकुश पण त्याजागी मस्त आराम,लाड कौतुक हे मिळतयं हे पण विसरून चालणार नाही. त्यामुळे कधी नवीन पोस्ट लिहीणं तर कधी जुन्या पोस्ट मध्ये अजून भर टाकून वरणात पाणी घालून वरण वाढवण्यासारखे सुरू आहे. अर्थात नवीन आजाराचं कौतुक पण खूप वाटतयं, त्या औषधांच्या,उपचारांच्या वेळा पाळणे, आज नवीन जागी कुठं दुखतयं कां ह्याचा शोध घेणे,आणि नोकरी वगळून उर्वरित वेळात मस्त आवडता आराम, ताणून देणं छान उपभोगतेयं. डॉ. म्हणलेत एवढी आजाराबाबत सकारात्मकता असल्यामुळे आजार चुटकीसरशी पळतोय,थोडक्यात काय तर हे आरामाचे दिवसही उरकत येताहेत.असो.
…नुकताच वाचनदिन झाला. त्या निमीत्ताने एक लता मंगशकरांवरील द्वारकानाथ सांझगिरी लिखित एक मस्त पुस्तक वाचायला हाती घेतलयं.आता हे पुस्तक हळूहळू सावकाश वाचावे लागणार, पुर्वीसारखे फडशापाडल्यागत वाचन आता करता येणार नाही.
वाचनाचं आणि माझं एक अलवार,सुंदर पण घट्ट जुळलेलं नातं. ना ह्या नात्यात कोणता स्वार्थ ना कुठलाही वेळेचा दुरूपयोग,असलीच तर ती फक्त चांगल्या गोष्टींची वैचारिक देवाणघेवाण. पुस्तक दिनाच्या निमित्ताने ह्या आमच्या अऩोख्या बंधांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
प्रत्येक पुस्तकाची वेगवेगळीच खासियत असते बघा. काही पुस्तकात समाविष्ट असलेलं कथानक, विषय हा बाजी मारून जातो तर कधी त्या पुस्तकाच्या लेखकाची लेखनशैली भाव खाऊन जाते. कधीकधी हे कथानक पटणारं असतं म्हणून आवडून जातं तर कधीतरी न पटणारं कथानक पण आपण ह्या अँगलने कधी विचारच केला नाही हे शिकवून जातं. काही पुस्तकांतील अलंकारिक,नटवलेली भाषा मेंदूत ठसते तर कधीकधी अगदी सहज साध्या सोप्या भाषेत मांडलेले विचार अगदी आपल्या मनात घर करून राहतात.काही वेळा पुस्तकात ह्या दोन्ही भट्टी एकदम जमून येतात मग तर ते पुस्तक म्हणजे क्या कहना. अगदी हातातून सोडवत नाहीत अशी पुस्तकं.
वाचनासारखी मनं रमवणारी, चांगल्या गोष्टी शिकवणारी,नवनवीन माहितीचे भांडार खुली करून देणारी दुसरी कुठलिही गोष्ट नाही. अर्थातच मी हे म्हणायचं, लिहायचं म्हणून नाही तर स्वानुभवाने मनापासून सांगतेयं.
वाचनाइतका दुसरा चांगला मित्र नाही. फक्त हवा मात्र ह्या मैत्रीचा मनापासून स्विकार, आवडीने जवळीक. फक्त एक नक्की ह्या मित्राची निवड जरा दर्जेदार आणि चोखंदळपणे करावी लागते. आपण जे मनापासून वाचतो नं ते आपल्या मनातून मेंदूपर्यंत थेट झिरपत जाऊन वसतं. ह्या वाचनवेडा वरुन मला वपुंच एक वाक्य आठवलं,”प्रत्येकाला कसलतरी वेड हे हवचं,वेड असल्याशिवाय शहाणी व्यक्ती होऊच शकत नाही”.
जशी झाली बघा अक्षरओळख
तशी हाती आली मस्त अंकलिपी
बघून त्यातील अंक ,अक्षरे आणि चित्रं
गावला मला त्या रुपाने एक सच्चा मित्रं ।।।
शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकं
खरतरं वाटतं होती जराशी निरस,
पण त्यांनीच तर केले अवघे
सगळ्यांचे उत्तरायुष्य खरे सरस।।।
किशोरावस्थेत अभ्यासला इतिहास
वाचनातून उमगले हिंदवी स्वराज्याचे तोरण,
ऐतिहासिक पुस्तके बनली
चढविण्या देशप्रेमाचे स्फुरण ।।।
ज्ञानसंपत्ती मध्ये नित्य करावी वृद्धी
पुस्तकांनी बहाल केली आपल्याला समृध्दी
पुस्तकांनीच बहाल केली खरी समृद्धी ।।।
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈