सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “चरित्रकार वीणा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
काही व्यक्तींची ओळख त्यांनी केलेल्या कार्यावरुन होते.बरेचदा त्या व्यक्ती आणि त्यांनी केलेले कार्य हे जणू समीकरणच बनतं.असच एक समीकरण म्हणजे वीणा गवाणकर आणि “एक होता कार्व्हर”.
हे जग खूप म़ोठ आहे. ह्या जगाच्या कानाकोपऱ्यात सुध्दा कर्तृत्ववान,हुशार मंडळी वास करीत असतात. त्यांच्या कर्तृत्वाची महती संपूर्ण जगासमोर आणण्याचे काम काही व्यक्ती आपल्या लिखाणातून करीत असतात. कोणाचेही सद्गुण हेरून ते मनोमन कबूल करून ,जाहीररीत्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणे हे तसे कठीण काम. कारण मानवी वृत्तीने आधी दुसऱ्या चे सद्गुण हेरून त्याची महती मान्य करणं हे खरंच एक अफलातून कामं.पण अशाही काही व्यक्ती असतात त्या हा घेतलेला वसा लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्या चरित्रासम लिखाणातून पार पाडीत असतात ,ते ही निःस्पृह भावनेने.
अशाच काही लेखनकार्यात भरीव कामगिरी करून ते आपल्या लेखनाद्वारे लोकांपर्यंत सातत्याने पोह़चविणा-या लेखकांपैकी प्रामुख्याने वीणा गवाणकर ह्यांचे नाव चटकन नजरेसमोर येतं. वीणा गवाणकर ह्यांनी लिहीलेली खूप सारी चरित्रे प्रसिद्ध आहेत . पण कसं असतं नं आपली एखादी कलाकृतीच खूप स्पेशल ठरुन जणू तीच आपली ओळख बनून जाते.वीणा गवाणकर म्हंटलं की चटकन आठवतं “एक होता कार्व्हर”.
त्यांचा जन्म 6 मे 1943 चा. स्वतः ग्रंथपाल, उत्तम चरित्रकार असलेल्या वीणाताईंनी लिहीलेली अनेक नावाजलेल्या व्यक्तींची चरित्र लोकप्रिय आहेत.”एक होता कार्व्हर”ह्या अफाट गाजलेल्या चरित्राने त्यांना घराघरांत पोहोचविले.ह्या पुस्तकाची मोहिनीच तशी विलक्षण आहे.
“एक होता कार्व्हर”,”आयुष्याचा सांगाती”, “डॉ. आयडा स्कडर”,सर्पतज्ञ डॉ रिमांड डिटमार्स,शाश्वती भगिरथाचे वारस,डॉ खानखोजे,नाही चिरा नाही पणती,डॉ सलीम अली,लीझ माईटनर,राँबी डिसील्व्हा,रोझलिंड फ्रँक्वीन,इ.अनेक उत्तमोत्तम चरित्रपर लेखन प्रसिद्ध आहे.
ह्यांचा जन्म लोणी काळभोरचा व पुढील शिक्षण चौल,मनमाड, इंदापूर येथील मराठी शाळेतून झाले. थोडक्यात काय तर माणसाला सुसंस्कृत, उच्चशिक्षित व्हायचं असेल तर लहान गावातून,मराठी शाळांतूनही होता येत हे ह्यांनी सिद्ध केलयं.पुढे फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी, पुणे विद्यापीठातून ग्रंथपाल ही पदवी घेतली.1964 पासून औरंगाबादच्या महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्याची सुरवात केली.
…वाचनाची आवड, शिक्षकांचे प्रोत्साहन ह्याने अनेक उत्तमोत्तम साहित्य त्यांच्या वाचनात आले, फूटपाथवर अर्ध्या किमतीत मिळणाऱ्या पुतकामध्ये त्यांना कार्व्हर चे पुस्तक हाती लागले.त्यांनी ते झपाटल्यागत वाचून त्यांचे हे चरित्र खास मराठी लोकांसाठी “एक होता कार्व्हर” ह्या पुस्तकाच्या रुपात आणले आणि ह्या पुस्तकाने एक इतिहासाच घडविला.
जन्माने गुलाम असलेल्या अनाथ, कृष्णवर्णीय,अमेरिकन कृषीशास्त्राच्या धडपडीची, मानवी जीवनाचे मोल वाढविणा-या प्रयत्नांनी वेध घेणारी,चरित्र कहाणी”एक होता कार्व्हर”,मानवी जीवनाची सेवा करण्यासाठी, भारतातील ग्रामीण आरोग्याच्या स्तर उंचावण्यासाठी आपले ज्ञान वापरणा-या कर्तव्यनिष्ठ अमेरिकन महिला डॉक्टर ची जीवनकथा “डॉ आयडा स्कडर”,सर्पतज्ञ डॉ रेमंड डिटमार्स ह्यांची साप पाळण्याच्या छंदातून जागतिक किर्तीचे सर्पतज्ञ होण्यापर्यंत चा प्रवास, डॉ सलीम अली ह्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या पक्षीतज्ञाच्या जीवनकार्याचा वेध, महान क्रांतिकारक ते श्रेष्ठ कृषीतज्ञ हा प्रवास, आँस्ट्रीयन अणूशास्त्रज्ञ स्त्री “लीझ मायटनर”, भडीरथाचे वारस विलास साळुंखे हा पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे हे ठणकावून सांगणारा अभियंता, इ.वीणाताईंनी ह्यांची चरित्रे आपल्या प्रभावी लेखणीद्वारे लोकांसमोर आणलीयं. त्यांनी जवळपास 30 चरित्रंलेखन दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध केलयं. तरी “एक होता कार्व्हर” हे पुस्तक म्हणजे जणू त्यांची ओळखच बनली.
नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप सा-या शुभेच्छा देऊन आजच्या पोस्टची सांगता करते.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈