श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “इस्त्री, E स्त्री…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

नेहमीच्या सवयीने इस्त्री करणाऱ्या माणसाला फोन करून कपडे घ्यायला येऊ का? कार्यक्रमाला जायचे आहे. कपडे हवे आहेत. असे विचारले. तो त्याच्या नेहमीच्या सवयीने म्हणाला, तयार नाहीत..  अर्ध्या तासात होतील.

फोन बंद करून ठेवला, आणि लगेचच फोन वाजला. नंबरच होता. कोण आहे…….. या विचारातच फोन घेतला……. सध्या मी फोनमध्ये सेव्ह केलेल्या नावापेक्षा इतर नंबरचेच फोन जास्त येतात……… आपले नंबर यांना मिळतात कसे? हा प्रश्न असतोच……

फोनवर मी काही बोलण्याच्या आधीच एका छान आवाजात माहिती देण्याची प्रक्रिया सुरू देखील झाली.‌.‍………(आता आवाज छान होता म्हटल्यावर ती माहिती नको असताना देखील मी फोन सुरू ठेवला होता हे ओळखले असेलच. त्या आवाजाला उगाचच गोड, मंजुळ अशी विशेषणे लावण्याच्या भानगडीत पडलो नाही.)

सध्या प्रचारात असलेली आणि प्रचलित होणारी ती E जाहिरात होती. या E प्रणालीची सुरुवात कुठून आणि कशी झाली ते सांगता येणार नाही. पण सध्या बऱ्याचशा जाहिराती या अशा E प्रकाराबाबतच असतात, आणि त्यात बहुतांश स्त्रीचाच आवाज असतो. म्हणून ही E स्त्री. कपड्यांच्या इस्त्री चा आणि या E स्त्री चा काहीही संबंध नाही किंवा नव्हता हे आता लक्षात आले असेलच.

साधारणपणे कर्जाने घेतलेले घर, वस्तू यांचा जो एक ठराविक हप्ता असतो त्याला हप्ता ऐवजी  E M I म्हणायची सुरुवात झाली आणि तेथूनच पुढे E चा प्रवास आणि प्रसार वाढला असावा.

E पेमेंट, E शिक्षण, यापासून सुरुवात होत E गेम, E सिगारेट, E व्हिकल, E न्यूज पेपर, E बुक्स असे त्यांचे जाळे वाढतच चालले आहे. आणि इंटरनेट वापरत आपणही त्या जाळ्यात पुढे पुढे सरकत आहोत. 

प्रत्येक पिढीने काही वाक्ये हमखास ऐकली असतील. ती वाक्ये म्हणजे, सगळं बदलत चालले आहे. किंवा, आमच्या वेळी असले काही नव्हते. इ…… तीच वाक्यं परत आठवली.

अगदी जुन्या काळातील वाक्यांचा संदर्भ आठवला, त्यात (इ)कडून काही निरोप नाही, (इ)कडून काही बोलणे नाही असे इ ने सुरु होणारे शब्द आणि वाक्ये स्त्रियांच्या तोंडी असत. पण त्या इ चा संबंध घरच्या माणसाबद्दल असे. पण आता E स्त्री चा आवाज आला की त्याचा संबंध जाहिरातीशी असतो हे समजले. आणि अशी जाहिरात पैशांच्या गुंतवणूकी पासून वैयक्तिक गुंतागुंत सोडवण्यासाठी सगळ्या बाबतीत असते.

फक्त इस्त्रीच्या कपड्यांवरून नंतर लगेचच आलेल्या फोनमुळे ही जाहिरात करणारी E स्त्री देखील आहे हे लक्षात आले. बाकी काही नाही………

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments