श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “नावात काय आहे?…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
हे वाक्य कोणाचं या बद्दल मी बोलणार नाही. पण आपल्याकडे नावातच सगळं काही आहे. मग त्या नावाचा संबंध कुठेही आणि कसाही असो. अगदी व्यक्ती, वस्तू, प्राणी, अन्न काहीही.
घरात मुल जन्माला आलं की पहिला आणि त्यातल्यात्यात मोठा सोहळा हा नांव ठेवण्याचाच असतो. मग नंतर भलेही घरातले लाडाने त्याला सोन्या, बाळा, छोट्या म्हणत असतील. किंवा वयस्कर त्याला तु रमेशचा का? तु प्रकाशचा का? असं विचारात असतील. पण नंतर तुझं नांव काय? असंच विचारतात.
पीटरसन, सॅमसन असं वडीलांच्या नावावरुनच मुलांचं नांव ठेवण्याची रीत काही ठिकाणी असेल. आपल्याकडे मात्र तसं नाही.
नांव ठेवण्याबद्दल आपला हात आणि काही वेळा तोंड कोणी धरणार नाही. आपल्याकडे मुलांच नांव ठेवण्याचा कार्यक्रम होतोच. पण काही कार्यक्रमांना नांवं ठेवायला सुद्धा आपण मागे नसतो. भलेही मागून म्हणजे कार्यक्रम झाल्यावर नावं ठेवत असलो तरी नांवं ठेवतांना मात्र मागे नसतो.
लग्नात सुध्दा नवरीमुलीचे नांव बदलण्याची पद्धत काही प्रमाणात आहे. यावेळी नांव काय ठेवलं हे कौतुकाने विचारतातच, पण ते घेण्याचा आग्रह देखील होतो. नांव ठेऊन नांव घेण्याची, किंवा नांव घेउन नावं ठेवण्याची सुरुवात इथूनच होत असावी. ठिक आहे आपल्याला आत्ता त्याबद्दल नांव ठेवायचं नाही.
मुलांचीच काय…… आपल्या कडच्या पाळीव प्राण्यांना सुद्धा आपण ठेवलेलं नांव असतं. मग कुत्रा, बैल, गाय, घोडा, मांजर, पोपट यांचा टायगर, सर्जा, कपीला, चेतक असं होतं. आणि त्या ठेवलेल्या नावानेच त्यांना प्रेमाने हाक मारली जाते.
तसच आजुबाजूच्या काही जणांना त्यांच्या दिसण्यावरुन, वागण्यावरून, राहण्यावरुन सुध्दा नावं ठेवतो. पण बऱ्याचदा अशी आपण ठेवलेली नांव प्राण्यांचीच असतात. म्हैस, पाल, बोकड, मांजर, गाढव इ…. या सारख्या नावांनी आपण त्यांचा प्रेमळपणे उल्लेख करतो. जाड्या, बारक्या, काळ्या अशी सुध्दा काही नावं आपण ठेवतो. म्हणजे प्राण्यांची चांगल्या नांवाने आणि माणसांची प्राण्यांच्या नांवाने ओळख आपल्याकडेच असावी.
एकाच देवाला अनेक नांवं आपल्याकडेच असतील. सुर्य, गणपती, विष्णू, हनुमान या सारख्या अनेक देवांना अनेक नावं आहेत. देव कशाला… झाड, तरु, वृक्ष… फुलं, सुमन… जल, पाणी. आभाळ, गगन, आकाश, नभ….. अशी एकाच गोष्टीला अनेक नावं असणारी अनेक उदाहरणं आहेत.
लहानपणी तर समानअर्थी शब्द लिहा…… असा प्रश्न सुद्धा परिक्षेत असायचा.
आपल्या नावामुळे त्या क्षेत्राचं आणि देशाचं नांव मोठं करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे इतकी आहे की सांगतासुध्दा येणार नाही. आणि अशी असंख्य नांवं प्रत्येक क्षेत्रात आहेत. यात व्यक्ती, वस्तू, निसर्ग, वनौषधी, स्थळ या सगळ्यांचा हातभार आहे. पण ओळखले जातात सगळे नावानेच.
नावाचा प्रभाव आपल्या कडे इतका आहे की आजही काही ठिकाणी काही काम करुन घ्यायचे असेल तर आपण कोणाच्या तरी नावाचा आधार घेतोच.
पण… अरे तो कोपऱ्यावर पानवाला आहे ना…… त्याला माझं नांव सांग तो बरोबर माझं पान देईल……… इतका विश्वास नावात असतो..
ठेवलेलं नांव उच्चारतांना झालेली चूक आपल्याकडे काही वेळा चालते. जसं प्रवीण ला परवीन, प्रमोद ला परमोद, लक्ष्मी ला लक्शमी अशी हाक मारणारे सापडतील. पण कागदोपत्री नावाची अशी चूक चालत नाही. पण तरीही नावाच्या बाबतीत काही वेळा तशी चूक होतेच. आणि नांवातली चूक बदलण्यासाठी खटाटोप करावा लागतो. शुद्ध नावाच्या बाबतीत असलेला हा अशुद्ध पणा सुध्दा आपल्याकडेच असेल.
राजकारणात तर नावाचं महत्त्व विचारु नका. नांव आहे म्हणून गोंधळ, नांव नाही म्हणून नाराजी, नांव बदललं तर विरोध, नावात बदल करण्यासाठी गदारोळ. काही नांव तर फक्त घराण्यामुळे ओळखली जातात. तर काही नावामुळे घराण्याचा मोठेपणा आजही शाबूत आहे. हे सगळं फक्त नावामुळेच होतं.
देश आणि त्यातले भाग यांना नांव बहुतेक सगळ्याच ठिकाणी असतील. पण आपल्याकडे खाद्यपदार्थ सुद्धा भागानुसार ओळखले जातात. जसं पंजाबी डिश, गुजराती थाळी, महाराष्ट्रीयन जेवण, साऊथ इंडियन डिश आणि हे सगळीकडे मिळतात. आज असंख्य पदार्थ नावामुळेच ओळखले, मागवले, आणि खाल्ले जातात. फक्त पदार्थांच्या नावामुळेच बऱ्याच ठिकाणी मेनू कार्ड गरजेपेक्षा जास्त मोठी, लांबलचक वाटतात. या बाबतीत आपण आपल्या सीमा खूप वाढवल्या आहेत. म्हणजे आज छोट्या छोट्या गावात सुद्धा चायनीज सहज मिळतं.
फक्त रोटी या नावाखाली पाच सहा प्रकार, डोसा या नावाखाली पंधरा विविध प्रकारचे डोसे मेनू कार्ड वर पाहिले आहेत. तांदूळ, गहू, आंबा यात चिनोर, कोलम, बासमती, चंदूसी, लोकवन, हापूस, लंगडा, केशर, बदाम अशी अनेक नांवं आहेत.
आंबा यात केशर, बदाम हा प्रकार आहे. पण केशर आणि बदाम यात आंबा हा प्रकार नाही.
जसं खाण्याच आहे तसंच कपड्यांच, वस्तूंचं, दागिन्यांच सुद्धा आहे. पंजाबी ड्रेस, गुजराती साडी, जोधपुरी, पुणेरी पगडी, कोल्हापुरी फेटा, साज, चप्पल.
असं किती आणि काय काय सांगणार. आणि हे सगळे प्रकार नावावरुच ओळखले जातात.
आजही नावावरुन भविष्य सांगणारे, आणि भविष्यात आपले नांव उज्वल करणारे अनेक जण आहेत, आणि होतील.
देशापासून वेशा पर्यंत, खाण्यापासून नटण्यापर्यंत, आणि वस्तू पासून व्यक्ती पर्यंत नावातच खूप काही आहे.
हे तर फक्त नावाचेच आहे. आडनावाचा भाग अजून वेगळाच आहे. पण त्याच्या आड बऱ्याच गोष्टी येत असल्याने त्याचे नाव आत्ता नको………
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈