श्री संदीप काळे
विविधा
☆ “संतोषचं नेमकं काय चुकलं…” ☆ श्री संदीप काळे ☆
पुण्यात माझ्या मित्राची, समीरची एक छोटी कंपनी आहे. परवा सकाळी मी समीरकडे जाऊन चहा घेत गप्पा मारत होतो, तेवढ्यात ऑफिसमध्ये काम करणारा मुलगा आला. तो समीरला सांगत होता, ‘‘आजही तो मुलगा परत आला आहे. तो म्हणतोय, मला काहीतरी काम द्या.’’
समीर हळू आवाजात म्हणाला, ‘‘त्या मुलाला प्यायला पाणी द्या, चहा पाजा आणि सांगा, जेव्हा आमच्याकडे काम असेल, तेव्हा तुला कळवू.’’
मी काचेमधून बघत होतो. एक पंचविशीमधला तरुण हाताने घाम पुसत होता. समीरला मी विचारलं, ‘‘कोण आहे हा मुलगा?’’
समीर म्हणाला, ‘‘सहा महिन्यांपासून नेहमी येतो आणि मला काम द्या, असं म्हणतो.’’
मी म्हणालो, ‘‘हल्ली बेरोजगारी खूप वाढली आहे. बिचारा शिक्षण नसल्यामुळे कदाचित असं म्हणत दारोदारी फिरत असेल.’’
समीर म्हणाला, ‘‘तसं नाहीये, तो उच्चशिक्षित आहे, तीन डिग्री आहेत त्याच्याकडे. गेल्या चार वर्षांपासून पुण्यामध्ये तो स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. आता त्याच्या सहनशीलतेचा अंत झालाय. स्पर्धा परीक्षांचा नाद त्याने सोडून दिलाय. दोन वेळच्या खायची व्यवस्था व्हावी, असं त्याला वाटतंय. म्हणून तो कामाच्या शोधात आहे.”
समीरने सांगितलेलं ऐकून मला फार वाईट वाटलं. मी फोन आल्याचं निमित्त करून तिथून बाहेर पडलो व पाणी पीत असलेल्या त्या मुलापाशी येऊन बसलो. त्याची विचारपूस केली, चौकशी केली. त्याच्याशी बोलण्यातून अनेक विषय पुढे आले. मी ज्या मुलाशी बोलत होतो त्याचं नाव संतोष जाधव.
संतोष हा वाशीमचा. डिग्री मिळवल्यावर मित्राच्या सोबतीने स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात आला. केवळ एवढ्यावरच थांबला नाही, तर आपल्या आसपास असणारी अनेक मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात घेऊन आला. संतोषला एकच आवड होती, स्पर्धा परीक्षेतून मोठं नाव असणाऱ्या व्यक्तीचं मोटिव्हेशन असणारे व्हिडीओ पाहत बसायचं. त्या व्हिडीओच्या मोहातूनच आपणही लाल दिव्याच्या गाडीत बसावं, असं स्वप्न संतोषचं होतं.
एक बहीण होती, त्या बहिणीला घेऊन संतोषने आपलं पूर्ण बिऱ्हाड पुण्याला थाटलं. बहीणही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागली. एका वर्षानंतरच बहिणीने निर्णय घेतला की, आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा नाही, कुठंतरी नोकरी करून आयुष्याला सुरुवात करायची.
एका खासगी शिकवणीमध्ये बहीण शिकवायला लागली. दोन वर्षांनंतर तिने संतोषच्या मित्रासोबतच लग्न केलं. तो मित्रही स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा; पण आता पुण्यातच एका किराणा दुकानामध्ये काम करतो.
समीरही बाहेर येऊन आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाला. समीर संतोषला म्हणाला, ‘‘आज जरा गडबड आहे, तू उद्या ये आणि आपण सगळं ठरवून टाकू.’’ समीर त्याच्या कामाला लागला. मी माझ्या कामाच्या दिशेने निघालो. संतोषचा काळजीने व्यापलेला चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हता.
माझ्या ड्रायव्हरने गाडी काढली. आम्ही रस्त्याने निघालो. थोडं पुढे गेलो. संतोष रस्त्याच्या कडेने जात होता. त्याच्या अंगावरला जर्जर झालेला शर्ट पाहून मला तो लगेचंच
ओळखता आला. मी त्याला आवाज दिला, ‘‘अरे, कुठं निघालास?’’
तो म्हणाला, ‘‘बुधवार पेठेमध्ये बहीण राहते, तिच्याकडे निघालो.’’
मी म्हणालो, ‘‘चल, मीही त्याच भागात चाललोय, तुला सोडतो.’’ गाडीमध्ये परत आमच्या गप्पा सुरू झाल्या. शनिवारवाड्याजवळची रहदारी एकदम कंटाळवाणी, तिथं आम्ही थोडा वेळ अडकलो. माझं ‘सकाळ’चं कार्यालय आलं.
संतोष खाली उतरून निघणार, इतक्यात मी त्याचा हात धरला आणि त्याला म्हणालो, ‘‘चल, आपण दोन घास काहीतरी खाऊ या.’’ आमच्या ‘सकाळ’च्या ऑफिसमधल्या कॅन्टीनमध्ये जेवताना आमच्या अजून गप्पा सुरू होत्या.
संतोष म्हणाला, ‘‘लहानपणी कळायला लागलं, तेव्हा आजारामध्ये आई गेली. आई दहा दिवस तापाने फणफणत होती; पण एक गोळी आणायला बापाकडे पैसे नव्हते. आई गेल्यावर आयुष्याचा बराचसा काळ माझ्या लहान बहिणीचा सांभाळ करण्यासाठी गेला. बाबा वारल्यावर गावाकडे जे जे होतं, ते वडिलांचं कर्ज फेडण्यात संपलं. गावाला अखेरचा रामराम ठोकला.’’
घरचा विषय काढता काढता आम्ही स्पर्धा परीक्षा या विषयावर येऊन थांबलो. स्पर्धा परीक्षेबाबत संतोषने मला जे काही सांगितलं, ते अतिशय धक्कादायक होतं.
मराठवाडा आणि विदर्भातून रोज कित्येक मुलं पुण्यात येतात आणि स्वतःच्या आयुष्याला साखळदंड घालून घेतात. स्पर्धा परीक्षांमध्ये तयारी करणाऱ्या त्या मुलांच्या समस्यांनी मोठा कळस गाठल्याचं मला पाहायला मिळालं.
मी आणि संतोष तिथल्या अनेक पेठांमध्ये गेलो. तिथं अनेक मुलांना भेटलो. प्रत्येक मुलाचं म्हणणं एकच होतं, ‘माझ्या हाताला काम मिळेल का? आता बस झालं, नको स्पर्धा परीक्षा.’
मी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होईन, या विचारानं संतोषसारख्या हजारो जणांनी आपलं गाव सोडलं खरं; पण अधिकारी होणं सोडा, साधी गाडी पुसण्याचीही नोकरी द्यायला कोणी तयार नव्हतं.
संतोषचा मित्र सिद्धार्थ कांबळे, राजन गायकवाड, समीर धायगुडे या सगळ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशी झालेली मुलं व्यसनाच्या आहारी कशी गेलेली आहेत, हे सांगितलं. किती मुलं वाममार्गाला लागलेली आहेत, याचे अनेक किस्से सांगितले.
आम्ही सगळे जण पेठेमधल्या संतोषच्या दहा बाय दहाच्या रूमवर बसलो होतो. ती रूम कसली, जनावराचा खुराडा जसा असतो ना, तसं होतं ते. त्या भिंतीमध्ये हात घातला, तर पलीकडे हात निघेल, अशा त्या घराच्या भिंती होत्या. एवढ्या छोट्या जागेत पाच जण कसं काय राहत असतील देवाला माहीत!
आमच्या आवाजाचा गलबला ऐकून खाली असलेला घराचा मालक वर आला. संतोषला म्हणाला, ‘‘दोन दिवसांत जर तू रूमचं भाडं दिलं नाहीस, तर तुझ्या शर्टला धरून बाहेर काढीन, तुझं सामान रस्त्यावर फेकून देईन.’’
संतोष बिचारा शांतपणे ते ऐकून घेत होता. संतोष मला म्हणाला, ‘‘गेल्या सहा महिन्यांपासून ताईने पैसे देणं बंद केलं. मला पैसे देण्यावरून तिचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण व्हायचं. हे मला जेव्हा कळालं, तेव्हा मी तिच्याकडे पैसे मागणं, तिच्याकडे फारसं जाणं सोडून दिलं.’’
मी म्हणालो, ‘‘अरे पण रोजचे खर्च भागवायचे कसे?’’
संतोष म्हणाला, ‘‘काही नाही, आता मी आणि माझे हे दोन मित्र सकाळी दोन-तीन सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांच्या गाड्या धुतो. त्यातून जे पैसे मिळतात, त्या पैशांमध्ये आता एक-एक दिवस काढतोय.’’
संतोषच्या नजरेतून मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा सुरू असलेला बाजार पाहिला, तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. किती भयानक ते चित्र होतं.
अनेक मुलांना भेटत असताना नांदेडचे प्रोफेसर समीर जाधव भेटले. जाधव आता सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ एका क्लासेसमध्ये शिकवणीचं काम करतात. मी त्यांना म्हणालो,
‘‘हा बाजार दिवसेंदिवस अजून वाढतोय, गंभीर होतोय, त्याला जबाबदार कोण आहे?’’
जाधव म्हणाले, ‘‘पालक आणि विद्यार्थी दोघेही आहेत.’’
मी म्हणालो, ‘‘कसं काय?’’
ते म्हणाले, ‘‘पालकांनी त्यांच्या फारशी समज नसणाऱ्या मुलांना समजावून सांगायला पाहिजे. जर विद्यार्थ्याला सुरुवातीपासून ६० आणि ७० टक्केच्या आतमध्ये मार्क असतील, तर त्याने स्पर्धा परीक्षांकडे न गेलेलं बरं. पालकही मुलांना स्पर्धा परीक्षेचा आग्रह धरतात. तुम्हाला सेवाच करायची, तुम्हाला कामच करायचं, तर कुठलंही काम आनंदाने करा ना! सन्मानाने जगण्यासाठी पैसा लागतो किती? जिथं तुमचं कधीही समाधान होत नाही, तिथं जायचा विचार का करायचा?’’
जाधव सर जे बोलत होते, ते अगदी खरं होतं. जाधव सर म्हणाले, ‘‘संतोषचं आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या त्या हजारो मुलांचं काम सगळीकडे शेतात एकच पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसारखं झालं आहे. पीक येतच नाही. आलं तरी सगळीकडे एकच पीक असल्यामुळे कवडीचा भाव असतो. मुलांना आणि त्यांच्या पालकांना हे पटलं तर नवलच.”
पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेत अपयशी ठरलेल्या मुली वाममार्गाला कशा लागतात, याची अनेक उदाहरणं संतोष आणि त्यांचे मित्र मला देत होते. ते सगळं ऐकून माझ्या अंगावर काटा येत होता. संतोषचा मित्र सिद्धार्थ याला मी म्हणालो, ‘‘ज्या दिवशी तुमच्याकडे पैसे नसतात, त्या दिवशी तुम्ही जेवण कसं करता?’’
सिद्धार्थ म्हणाला, ‘‘पुण्यामध्ये काही ठरलेली ठिकाणं आहेत, तिथं अनेक मुलं जेवण्यासाठी जात असतात. अनेक मंदिरांच्या समोर प्रसाद म्हणून अन्नदान होतं, तिथं आम्ही जातो. पोटाची भूक इतकी भयंकर आहे की, लाज नावाचा प्रकार काही केल्या शिल्लकच राहत नाही. गावाकडे काम करायला मन तयार होईना.”
संतोषचं काय चुकलं आणि संतोषसारख्या हजारो मुलांचं रोज काय चुकतंय, याकडे आता सगळ्यांनीच डोळसपणे पाहण्याची वेळ आली होती. अवघ्या राज्यातली तरुणाई पुण्यात येत आहे. पुण्यामध्ये या सगळ्यांच्या स्वप्नांना सोनेरी झालर मिळते, असं अजिबात नाही. किंबहुना नव्वद टक्केपेक्षा अधिक जणांच्या वाट्याला अपयश येतं. हे अपयश का येतं, याचा शोध जर वेळीच घेतला नाही, तर मोठा अनर्थ घडणार आहे, हे मात्र नक्की..!
(आजचा हा लघुलेख स्वतः लेखक श्री. संदीप काळे, संपादक, मुंबई सकाळ, यांच्या सौजन्याने.)
© श्री संदीप काळे
९८९००९८८६८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈