सौ ज्योती विलास जोशी
विविधा
☆ अस्मादिकांच्या पादुका…… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆
पायातलं वहाण म्हटलं की सिंड्रेलाच्या परिकथेतला तिचा तो एक बूट आठवतो. जिच्या भोवती कथा फिरते. मला प्रकर्षानं आठवते ती ‘द आदर पेअर’ही इजिप्शियन अवॉर्ड विनिंग फिल्म ! अवघ्या चार मिनिटाच्या या फिल्म मध्ये रेल्वेत चढताना एकच बूट पायात राहिलेल्या मुलानं सारासार विचार करून तो बूट प्लॅटफॉर्मवरच्या मुलाकडे भिरकावला जेणेकरून त्याला त्याचा वापर होईल. निरागसतेला केवढ्या उंचीवर नेऊन ठेवणारी ही गोष्ट.
चाळीस लाखाच्या चप्पल्स चोरी करून लक्षाधीश झालेला माटुंग्याचा इब्राहिम सर्वश्रुत आहे.कुलभूषण जाधवला त्याची आई पाकिस्तानात भेटायला गेली तेव्हा सुरक्षेच्या नावाखाली तिच्या आभूषणांसह तिचे चप्पल काढून घेतले.तेव्हा ट्विटरवर ‘चप्पल चोर पाकिस्तान’या# खाली दिवसभर ट्विटर ट्रेंड करत होतं.आपल्या कोल्हापूरी चप्पलनं तर जगात चप्पल ची किंमत वधारून ठेवलीय….
जूते लो पैसे दो म्हणत हम आपके है कौन मध्ये माधुरी थिरकते. लग्नातल्या या विशिष्ट प्रसंगाने चप्पलला केवढा भाव मिळतो. नवऱ्या मुलाने देऊ केलेल्या पैशावरून त्या चप्पलची किंमत ठरते…. ते निराळंच….एकेकाळी ‘पायातली वहाण पायातच’ असं म्हणून स्त्रीला हिणवणारया पुरुष प्रधान संस्कृतीच स्मरण झालं. दुसऱ्याच क्षणी चप्पल जोडीवर फुल ठेवून त्याची पूजा करत आर्चीला विनवणारा सैराट सिनेमातला परशा आठवला.
आताशा प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक अस्तित्वाला एक दिवस ठरवायची पद्धत आहे. तो त्याच्या अस्तित्वाचा दिन म्हणून साजरा करतात. पंधरा मार्चला नुकताच चप्पल दिन होता. एरवी ‘चपलीनं मारीन’या इतक्या मोठ्या अपमानाचा मूळ असणारी ही चप्पल आजच्या दिवशी इतकी वलयांकित का झाली ? त्याचं रहस्य मला कळलं होतं……..अर्थातच एक नवीन चप्पल जोड खरेदी करून मीही ‘चप्पल डे’ साजरा केला.
आज व्हाट्सअपचं पान हिरवंशार झालं होतं. उघडून पाहते तो प्रत्येक पानावर चप्पल दर्शन घडत होतं. अनाहूतपणे कर जुळू नयेत याची मी काळजी घेत होते.चप्पलचं असणं किती महत्त्वाचं आहे. तिचं असणं हेच तिचं अस्तित्व! अस्तित्व साजरा करण्याच्या दिवसांमध्ये एक दिवस तिचा ही असणारच ना? माझ्याच प्रश्नांचं निरसन माझ्याच अभ्यासातून झालं. उद्या परत कोणाच्या अस्तित्वाचा दिवस असा विचार करत मी झोपी गेले.
नित्य नेमानं सकाळी उठल्याबरोबर मोबाईलचा डाटा ऑन केला आणि पुन्हा हिरवंगार पान मला खुणावू लागले. बुचूबुचू मेसेजेस येऊन पडले होते. प्रामुख्यानं आमच्या मैत्रिणींच्या ग्रुपचं पान अगोदर उघडलं जातं आणि ते आजही उघडलं तर ‘अहो आश्चर्यम’ गुड मॉर्निंग च्या जागी एक चप्पल जोडचा फोटो! ‘टुडे ‘या मथळ्याखाली…..आणि खाली लिहिलेलं…..हे कुणाचं आहे? माझं कुणीतरी घालून गेलं आहे’
सकाळ सकाळी रामाच्या पादुकांच दर्शन व्हावं तसा मी नमस्कार केला. टेक्नॉलॉजीला ही मनोमन दंडवत घातला ते पुढचा मॅसेज वाचून…. अगं तुझं आणि माझं एक्सचेंज झालंय बहुतेक अगदी सेम टू सेम..
चप्पल हा खरंच प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय ! आमची आजी म्हणायची ‘देह देवळात चित्त खेटरात’.. तिच्या या बोलण्याचा मला पदोपदी अनुभव येतो बापाला आपली मुलगी देखणी असली की जसं कोणीही उचलून नेईल अशी सुप्त भीती मनामध्ये असते ना तसंच प्रत्येकाला आपली चप्पल डोळ्यात भरण्या जोगी आहे; कोणी तरी घालून जाईल असंच वाटतं आणि कधीकधी घडतही तसंच…..
मंदिरात आत जाताना नेहमीच्या पेढेवाल्याकडे पेढे देऊन चप्पल ठेवायची प्रथा त्यामुळेच पडली असावी. तो बिचारा स्वतःचे पेढे खपवण्यात इतका मशगुल असतो की आपल्या चप्पलची त्याला कितपत काळजी असते देव जाणे !आपला तो अंधविश्वासच !!
पैसे देऊन स्टॅन्ड मध्ये चप्पल ठेवण्याची मानसिकता बहुतेकांची नसतेच. खेटरंच ते… त्यासाठी इतकी किंमत द्यायची गरज नाही. जे कोणी त्या स्टॅन्ड मध्ये चप्पल ठेवतात ते टोकन देऊन चप्पल परत घेताना, देणारा माणूस चप्पल अशा पद्धतीने भिरकावत होतो की आपल्या चप्पलची हीच लायकी आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा..आपल्या देशात भाजी रस्त्यावर आणि चप्पल दुकानाच्या शोकेसमध्ये अशी परिस्थिती असताना चप्पल ची अशी किंमत केलेली मनाला लागते. सहाजिकच आहे ना?
चप्पल बूट यांच्या आताच्या जाहिराती पाहून आमचे आजोबा सांगायचे. “आम्हाला वर्षातून एकदा चप्पल मिळे. सततची घालायची सवय नसल्यानं ती घातलेल्या दिवशी आम्ही कुठेतरी विसरून येत असू. त्यानंतर पुन्हा एक वर्षांनंतरच नवीन मिळे.चप्पल घालायची सवयच नसल्याने ती विसरायची सवय जास्ती लागली होती.”
कुटुंबात जितक्या व्यक्ती तितकी वाहनं आणि चौपट वहाणं. चपलांची खानेसुमारीची डोकेदुखी होऊन बसली आहे. माणशी दहा याप्रमाणे चप्पलचा स्टॅन्ड भरलेला असतो. वॉकिंग, जॉगिंग, कॅज्युअल, स्पोर्ट्स, स्लिपर्स ,फॉर्मल बापरे बाप!म्हणून का चप्पल इतक वलयांकित? आणि तिची जागा दुकानातल्या काचेत आणि मेथीची पेंडी रस्त्यावर?…..
एकदा माझ्या मैत्रिणीकडे आम्ही रात्री जेवायला गेलो होतो. जेवणानंतर गप्पा-टप्पात बारा वाजून गेले. फ्लॅट सिस्टिम मधल्या तिच्या घरातून आम्ही चौघेही बाहेर पडलो आणि लिफ्टने खाली निघालो तितक्यात, दोघांच्या पायात घरातलेच स्लीपर आहेत हे त्यांच्या लक्षात आलं पण पुन्हा आत जाऊन चप्पल घेण्याऐवजी तात्पुरतं शेजारच्या फ्लॅटच्या चप्पल स्टैंड मधील आपल्याला बसतील ते चप्पल घालून ते खाली आले.माझ्या प्रश्नार्थक मुद्रेकडे पाहून ती हसली. “अगं गाढ झोपलेत ते ! काय समजतं त्यांना? शिवाय आमचे स्लीपर्स आहेतच की त्यांच्या दारात….
रात्री घरी पोचलो आणि कॉरिडोर मधल्या माझ्या चप्पलच्या रॅकला एक कुलूप आणि त्याला दोन किल्ल्या लावलेल्या मला दिसल्या. मी स्टॅन्डला कधीच कुलूप लावलं नव्हतं आत्ता मी लगेच एक किल्ली फिरवली चपला बंदिस्त केल्याआणि आत आले.दर खेपेला कुलूप उघडून चप्पल काढायची आणि बाहेर पडायचं…. चप्पल स्टॅन्ड ला जणू मी लाॅकरचा दर्जा प्राप्त करून दिला होता.प्रत्येक ठिकाणी जायचे चप्पल निरनिराळे… दुपारी मंदिराला घालून जायचे चप्पल घालून मी बाहेर पडले. भजन आटोपलं आणि मंदिरात गेले देव दर्शन करून बाहेर आले तो चप्पल गायब ‘मंदिराला घालून जायचे चप्पल’असलं म्हणून काय झालं आता पुन्हा मंदिरात जायचं तर कोणतं चप्पल वापरायचं? पंचाईत झाली ना माझी??
माझे डोळे सगळ्यांच्या पायांकडं भिरभिरू लागले. काय काय करावं सुचेना. मंदिरात बसलेला राम आठवला. तो असताना मी का उगा चिंता करत बसले होते? पुन्हा एकवार मी राम मंदिरात जाऊन रामाला साकडं घातलं, रामा बाबा रे, तू हि अनवाणीच आहेस पण तुझ्या पादुका सुरक्षित आहेत रे ….भरतानं सिंहासनावर ठेवल्यात. राज्य करताहेत त्या ….रामाचा हसतमुख चेहरा मला काहीतरी सांगतोय असा मला भास झाला . काय ?माझ्या हि चप्पलांचा असाच कोणीतरी सन्मान केला असेल ? इश्श्य काहीतरीच ! कुणाच्या पायातून गेली असेल माझी चप्पल त्याला सद्बुद्धी दे रे देवा..” मी रामाला साकडं घालून बाहेर आले.
मंदिराबाहेर चपलांचा खच पडला होता. गर्दी कमी होऊ लागली तशी चपलांही कमी होऊ लागल्या. चुकून आपल्या पायातील चप्पल आपलं नव्हे म्हणून कोणी परत येतं का असं वाटून मी थोडीशी रेंगाळले.
फुलवाला हे सर्व काही पाहत होता. नेहमीचा तोंड ओळख असणारा तो हसला आणि मला त्याने एक अफलातून सल्ला दिला.”मावशी,अहो चपला कमी व्हायला लागल्यात. तुम्हाला बसणारा साईज आता उरणार नाही. त्यापेक्षा त्यातलं तुम्हाला बसतंय ते घाला आणि जा घरी नाहीतर अनवाणी जायची पाळी येईल.”त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं.मी अनवाणी कशी जाणार? त्यातलं एक चप्पल देवाच्या साक्षीने मी चोरलं आणि घर गाठलं.
घर गाठताच त्या चप्पलचं ‘मंदिराचं चप्पल’असं नामकरण झालं.ते चप्पल घालून मी नियमित मंदिरात जाते. जी कोणी माझं चप्पल घालून गेली आहे ती माझं चप्पल ठेवून स्वतः चप्पल घेऊन जाईल.या आशेवर आहे मी अजून ….अजूनही मला वाटतं रामाच्या कृपेनं माझ्या पादुका मला मिळतील पुनःश्च राम राज्य येईल….
© सौ ज्योती विलास जोशी
इचलकरंजी
मो 9822553857
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈