सौ. अमृता देशपांडे
विविधा
☆ अनुभूती ☆ सौ. अमृता देशपांडे ☆
आमच्या छकुलीचा १० वा वाढदिवस झाला परवा. हां हां म्हणता छकुली दहा वर्षाची झाली. काल परवा पर्यंत पिटुकली, सोनुकली होती… मलाच मी खूप मोठा झालो आहे, असं वाटलं, वयानंही आणि विचारानंही. त्यालाही दोन कारणं होती. गेल्या दहा वर्षात मुलांबरोबर त्यांच्याच वयाचे होऊन खेळता खेळता काळ कसा सरला कळलंच नाही. मुलं मोठी होत होती, आम्ही ही एक एक नवीन अनुभव घेत मोठे झालो.
दुसरं म्हणजे मला आणि नंदिताला , माझ्या पत्नीला, गेल्या दोन महिन्यात एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. नवीन वर्षाची सुरुवात झाली तीच टेन्शनमध्ये. आईची तब्येतीची तक्रार होती म्हणून चेकअप साठी हाॅस्पिटलमध्ये गेली आणि पाच वर्षांपूर्वी झालेल्या ह्रदयाच्या शस्त्रक्रियेनंतर परत तेच दुखणं, आजारपण समोर ठाकलं . तिच्या ह्रदयावर परत शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. तीही ताबडतोब.
मनात खूप गोंधळ माजला. वैद्यकीय शस्त्रक्रिया, उपचार याबाबतीत नेहमीच उलटसुलट मते असतात. चहू बाजूंनी लोक अनेक सल्ले देत असतात. खूपदा सर्वच वास्तवात आणणे शक्य नसते. त्यामुळे गोंधळ, साशंकता निर्माण होते. मुख्य म्हणजे सल्ले द्यायला लोक एका पायावर तयार असतात. प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा कोणीही जवळ नसतो. जवळचेही सोबतीला नसतात. हा सर्वसामान्य दुनियादारीचा अनुभव आम्हालाही आला.
मी आणि नंदितानं सगळा धीर एकवटला. आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याची मनाची तयारी केली.
शस्त्रक्रियेची तारीख ठरली. मन धास्तावलं होतंच. त्याला कारणही तसंच होतं.आईचं वय, नाजुक तब्येत, दुस-यांदा शस्त्रक्रिया. एकीकडे काळजी, जबाबदारी, तर दुसरीकडे अॅडमिट करण्याचे सोपस्कार.
माझ्या ऑफिसचे माझे सहकारी सतत माझ्याबरोबर होते. रक्तपुरवठ्याची जुजबी तयारी केली होती. पण आदल्या दिवशी अठरा रक्तबाटल्यांची सोय करण्याची सूचना हाॅस्पिटलमधून देण्यात आली आणि पळापळ सुरू झाली. फोनवरून एकमेकांना निरोप सुरू झाले.
तासाभरातच चार तरूणांचा ग्रुप आला मला शोधत, ” साहेब, रक्त द्यायला आलोय.”
हाॅस्पिटलमध्ये फाॅर्म भरून रक्त घेण्याचे काम सुरू झाले. त्या चौघांचं संपता संपता आणखी दोघं आले. पाठोपाठ एका गाडीतून सहा जणांचा ग्रूप आला. सर्व जण फाॅर्म भरत होते, रक्त देत होते. मी आणि नंदिता अक्षरशः अवाक् झालो. आम्ही या शहरात नवीन होतो. रोजच्या संपर्कात येणा-यांशिवाय इतरत्र ओळखी करायला वेळच नव्हता. पण अनोळखी असूनही स्वयंस्फूर्तीनं स्वतःचं रक्त देणं, तेही कसलाही मोबदला न घेता. त्या फाॅर्म भरून घेणा-या नर्सताई मला तिथूनच हात हलवून सांगत होत्या, don’t worry, everything will be good! त्यांच्या डोळ्यांतही तेच भाव होते. मुलं घरी असल्याने नंदिता घरी चालली होती. जाताना त्या नर्सताईंना सांगायला गेली. तेव्हा त्या ” काळजी करू नका, सर्व ठीक होईल ” असं म्हणाल्या. कठीण परिस्थितीत ह्या एका शब्दाचा केव्हढा आधार वाटतो.
ज्या हाॅस्पिटलमध्ये आठ-दहा लाखांची बिलं आधी भरल्याशिवाय इलाज, उपचार सुरू होत नव्हते, तिथेच माणुसकीची ही श्रीमंती अनुभवली. शिवाय जाताना प्रत्येक जण प्रेमानं, आपुलकीनं आणि थोड्याशा प्रेमळ हक्कानं सांगत होते, ” काहीही, कसलीही गरज लागली तर लगेच फोन करा, फोन नंबर दिलाय. आम्ही आहोतच. ” जवळ जवळ रात्री १२ पर्यंत लोक रक्त द्यायला येत होते. गरजेपेक्षा जास्तच रक्त उपलब्ध झालं.
गेले चार-सहा तास हे चालू होते. मी झपाटल्यासारखा दिग्मूढ झालो होतो. जणू काही रक्तदानाचा एक सोहळा घडत होता. सगळे वातावरण परमेश्वराच्या अस्तित्वाची प्रचीती देत होते.
उद्या आईचं ऑपरेशन. पापणी मिटत नव्हती. मनात देवाचा धावा सुरू होता. नंदितानं देवाजवळ अखंड दिवा लावला होता. आम्हां दोघांना जाणवलं, ह्या सर्व मित्रांच्या रूपात ( हो, आता ते अनोळखी नव्हते, मित्र होते) देवच आमच्या बरोबर आहे.
दुसरे दिवशी ऑपरेशन व्यवस्थित झालं. डाॅक्टरनी बाहेर येऊन सांगितलं तेव्हा चार वाजले होते. दुपारनंतर अनेक रक्तदात्यांचे फोन आले आईची चौकशी करायला. आठ दहा दिवस झाले, आईची तब्ब्येतही दिवसागणिक सुधारू लागली. आईसारखा positive minded पेशंट लवकर बरा होतो. पंधरा दिवसांनी ती घरी आली.
मित्रांचे, त्या रक्तदात्यांचे आभार कसे मानू? त्यांची नावे माहीत नाहीत फक्त फोन नंबर आहेत माझ्याकडे. सर्वांना फोन करून छकुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावले. छकुलीचे दोस्त होतेच, आमचे शेजारी, माझे ऑफिस सहकारी बोलवले होते. नर्सताईंना बोलवायला मी हाॅस्पिटलमध्ये गेलो पण त्या भेटल्या नाहीत. काऊंटरवर निरोप ठेवला. पण तो स्टाफ ” मी कोणाबद्दल बोलतोय?” अशा संभ्रमात दिसला.
फूल ना फुलाची पाकळी म्हणून सर्वांना छोटीशी सस्नेह भेट दिली. सगळ्यांना Thank you म्हणताना माझ्या मनात एक विचार होता, इतक्या निस्वार्थी आणि निरपेक्षतेने दिलेल्या मदतीच्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ का? नर्स ताई आल्या. मला खूपच बरं वाटलं. आईची सगळ्यांशी ओळख करून दिली. नर्स ताईंची ओळख करून देणार होतो, पण त्या तिथे खुर्चीवर दिसल्या नाहीत.
हळूहळू सर्व लोक परतू लागले. त्यांना निरोप देता देता मी नर्सताईंना शोधत होतो. तिथे बसलेल्या एक दोघांना विचारले, त्या लाल साडी नेसलेल्या, आणि मोठ्ठं कुंकू लावलेल्या बाई गेल्या का? नंदिता पण त्या कुठे गेल्या म्हणून शोधू लागली. सेक्युरिटीला विचारले. त्यांना कळेना, कुठली लाल साडीवाली ताई? अशी कुणीच नव्हती. आम्हाला कळेना, कुठे गेल्या? त्यांनी फक्त गोड खीर खाल्याचे मी बघितले होते. पण माझ्याशिवाय आणि नंदिताशिवाय दुस-या कुणीच त्यांना बघितलेच नव्हते…असं कसं?
……
मनाला चुट्पुट लागली……
त्या बसल्या होत्या त्या खुर्चीवर आमच्या कुलदेवीचा फोटो आणि गुलाबाचं फूल होतं. ……
ते कसं तिथे आलं? त्यांना आमची कुलदेवी कशी माहीत? शेजारचे ८५ वर्षाचे आजोबा म्हणाले, “ अहो, तुमची देवीच आली असणार…. किती भाग्यवान आहात तुम्ही ! “
आम्ही निःशब्द…..
देवीनं दिलेला फोटो आणि फूल घेऊन घरी आलो. ऊर भरून आला होता देवासमोर हात जोडून दंडवत घातलं….
© सौ. अमृता देशपांडे
पर्वरी – गोवा
9822176170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈