श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ असं आहे… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
मधुकर तोरडमल यांचे ‘ तरुण तुर्क म्हातारे अर्क ‘ हे नाटक बहुतेकांनी पाहिले असेल. पाहिले नसले तरी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी त्या नाटकात प्रा बारटक्के यांच्या तोंडी घातलेली ‘ ह हा हि ही… ‘ ची बाराखडी बहुधा सर्वांच्या परिचयाची असेल. व्यवहारात अशी अनेक माणसे पाहतो की ज्यांना बोलण्यासाठी पटकन शब्द सापडत नाहीत. अशी माणसे मग ‘ ह हा हि ही ‘ चा आधार घेतात. समोरच्या व्यक्तीला संदर्भाने त्यांचे म्हणणे समजून घ्यावे लागते. पण कधी कधी अशा बोलण्यातून भयंकर विनोद वा क्वचित गैरसमजही होऊ शकतो. पु ल देशपांडे, मधुकर तोरडमल, लक्ष्मण देशपांडे यांच्यासारखी निरीक्षण चतुर मंडळी लोकांच्या अशा लकबी बरोबर हेरतात आणि खुबीने त्यांचा आपल्या लेखनात वापर करून घेतात. ‘ वऱ्हाड निघालं लंडनला ‘ या लक्ष्मण देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगात तर प्रत्येक पात्रागणिक त्यांनी अशा लकबींचा सुरेख वापर केला आहे. त्यातून त्या पात्रांचे स्वभाववैशिष्ट्य तर दिसतेच पण त्यातून निर्माण होणारा विनोद श्रोत्यांना पोट धरून हसायला लावतो.
माझ्या संपर्कात अशी काही माणसे आली आहेत की बोलताना त्यांच्या लकबी किंवा विशिष्ट शब्दांची त्यांनी केलेली पुनरावृत्ती माझी नेहमीच करमणूक करून जाते. अर्थात तुमच्याही संपर्कात अशी माणसं आली असतीलच.
माझे एक सहकारी कोणतीही गोष्ट बोलताना नेहमी ‘ नाही ‘ ने सुरुवात करीत असत. ‘ नाही, ते असं नाही. नाही, माझं ऐकून घ्या. नाही ते असं करायचं असतं… ‘ वगैरे. त्यांचीच भाऊबंद असलेली ( नात्याने नाही बरं का, तर बोलण्याच्या लकबीमुळे ) एक ताई आपल्या बोलण्याची सुरुवात ‘ नव्हे ‘ ने करीत असत. कधी कधी बिचाऱ्यांना आपले म्हणणे अधिक स्पष्ट करण्यासाठी ‘ नव्हे नव्हे ‘ चा दोन वेळा वापर करावा लागायचा. खरं म्हणजे दोन नकारांचा एक होकार होतो असं म्हणतात. म्हणजे ‘ ते खरं नाही असं नाही ‘ या वाक्यात दोन नकार आले आहेत. त्यांचा अर्थ होकारार्थी होतो. म्हणजे ‘ ते खरं आहे. ‘ पण आमचे हे ‘ नाही नाही ‘ किंवा ‘ नव्हे नव्हे ‘ म्हणणारी मंडळी त्यांच्या मतावर इतकी ठाम असतात की त्यांच्या दोन्ही नकारांचा अर्थ ‘ नाहीच ‘ असा होतो.
हे ‘नाही नाही’ किंवा ‘नव्हे नव्हे’ कसं येत असावं ? प्रत्येक गोष्टीची सुरुवात नकारार्थीच का व्हावी ? एकदा मी कुठेतरी वाचलं होतं की लहानपणी नुकत्याच जन्मलेल्या रडणाऱ्या बाळाला हॉस्पिटलमधली नर्स जेव्हा शांत करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती त्याला हातात घेऊन ‘ नाही नाही ‘ असं म्हणते. मग पुढे आई आणि त्या बाळाला घेणाऱ्या आयाबाया तिचाच कित्ता गिरवतात. त्या रडणाऱ्या बाळाला हातात घेऊन ‘ नाही नाही, असं रडू नाही. ‘ वगैरे चा भडीमार त्या करतात. लहानपणापासून असं ‘ नाही नाही ‘ ऐकण्याची सवय झालेलं ते बाळ आपल्या पुढील आयुष्यात ‘ नन्ना ‘ चा पाढा लावील त्यात नवल ते काय ?
आमचे आणखी एक सहकारी होते. ते वयाने आमच्यापेक्षा ज्येष्ठ होते. ते ‘ नाही नाही ‘ जरी म्हणत नसले तरी त्यांना दुसऱ्याचे बोलणे कसे चुकीचे आहे हे नेहमी सांगण्याची सवय होती. आपण त्यांना एखादी गोष्ट सांगितली की ‘ प्रश्न तो नाही रे बुवा… ‘ अशी त्यांची सुरुवात असायची. मग तेच म्हणणे ते जरा वेगळ्या शब्दात सांगायचे. चार लोक एकत्र बोलत असले की ते अचानक यायचे आणि एखाद्याला ‘ अरे इकडे ये, तुझ्याशी महत्वाचं काम आहे ‘ असं म्हणून बाजूला घेऊन जायचे. पण खरं तर महत्वाचं काम वगैरे काही नसायचं पण मी कसा वेगळा आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.
आमच्या नात्यातले एक गृहस्थ चार दोन वाक्ये बोलून झाली की ‘ असं आहे ‘ असं म्हणतात. त्यांच्या बोलण्याचं सार इंग्रजीत सांगायचे झाले तर ‘ Thus far and no further. ‘ म्हणजे हे ‘ असं आहे. मी सांगतो ते फायनल. यापुढे अधिक काही नाही. ( आणि काही असले तरी ते सांगणार नाहीत. हा हा )
आमचे एक प्राध्यापक होते. ते वर्गात शिकवताना दोन चार वाक्ये बोलून झाली की ‘ असो ‘ असं म्हणायचे. मुलांना ते सवयीचे झाले होते. कधी कधी एक दोन वाक्यानंतर त्यांच्या तोडून ‘ असो ‘ बाहेर पडले नाही तर मागील बाकावरून एखादा खोडकर विद्यार्थी हळूच ‘ असो ‘ म्हणायचा. मग सगळा वर्ग हास्याच्या लाटेत बुडून जायचा. ते प्राध्यापकही हे गमतीने घ्यायचे आणि हसण्यात सामील व्हायचे. आणि पुन्हा ‘ असो ‘ म्हणून शिकवायला सुरुवात करायचे.
माझ्या परिचयातील एक गृहस्थ आपण काहीही सांगितलं की ‘ हो का ‘ किंवा ‘ खरं का ‘ असे विचारायचे. मग त्यांना पुन्हा ‘ हो ‘ म्हणून सांगावे लागायचे. जसं वर ‘ नाही ‘ ने सुरुवात करण्याचा किस्सा सांगितला आणि त्यामागे नर्सपासून सगळे जबाबदार होते ( खरं तर अशा लोकांना पकडून जाब विचारायला हवा की तुम्ही ‘ नाही नाही ‘ असे का शिकवले ? कोण विचारणार त्यांना ? जाऊ द्या.
हे म्हणणं म्हणजे लग्नानंतर पती पत्नीत वादविवाद झाले तर मध्यस्थ कोण होता किंवा लग्न लावून देणारे गुरुजी कोण होते त्यांना बोलवा असं म्हणण्यासारखं आहे. ) तसंच ‘ हो का ‘ किंवा ‘ खरं का ‘ असं विचारण्यामागे त्या व्यक्तीचा संशयी स्वभाव किंवा समोरच्या व्यक्तीवर विश्वास नसणे या मानसिकतेतून आलं असावं. असे सारखे ‘ हो का ‘ विचारणाऱ्यांचे नाव आम्ही खाजगीत ‘ होकायंत्र ‘ ठेवले होते.
अशीच काही व्यक्तींना आपण काही सांगितले तर ‘ अच्छा ‘ किंवा ‘ अरे वा, छान ‘ अशी म्हणायची सवय असते. त्यांना जरी सांगितले की ‘ अहो, तो अमुक अमुक आजारी होता बरं का ‘ यावर ते आपल्या सवयीने पटकन बोलून जातील, ‘ अच्छा ‘ किंवा ‘ अरे वा, छान… ‘ आता काय म्हणावे अशा लोकांना ? कोल्हापूर, साताऱ्याकडची मंडळी प्रत्येक वाक्यानंतर समोरच्याला बहुधा ‘ होय ‘ अशी छान तोंडभरून प्रतिक्रिया देतात. सोलापूर, पंढरपूरकडील मंडळी त्याहीपुढे जाऊन ‘ होय की ‘ असं गोड प्रत्युत्तर देतात. हे ‘ होय की ‘ त्यांच्या तोंडून ऐकायलाच मजा वाटते.
काही मंडळींना चार दोन वाक्ये झाली की समोरच्याला, ‘ काय कळले का ? ‘ किंवा ‘ लक्षात आलं का ? ‘ असं विचारण्याची सवय असते. अशी मंडळी या जन्मात नसली तरी पूर्व जन्मात शिक्षक असावी असे माझे पक्के मत आहे. त्यांचेच काही भाऊबंद ‘ माझा मुद्दा लक्षात आला का ? ‘ असे विचारणारी आहेत. कधी कधी तर दोन मित्र फिरायला निघाले असतील तर एखाद्या मित्राला अशी सवय असते की तो आपली बडबड तर करत असतोच पण समोरच्याचे लक्ष आपल्या बोलण्याकडे आहे की नाही यासाठी त्याचा हात किंवा खांदा दाबत असतो. माझ्या एका मित्राला अशीच खांदा दाबण्याची सवय आहे. आम्ही फिरायला निघालो की तो बोलत असतो. माझे त्याच्या बोलण्याकडे लक्ष असले तरी खात्री करून घेण्यासाठी तो माझा खांदा वारंवार दाबत असतो. मग एका बाजूचा खांदा पुरेसा दाबून झाला की मी चालताना बाजू बदलून घेतो मग आपोआपच माझा दुसरा खांदाही दाबला जातो.
काही माणसांना फोनवर बोलताना पाहणे किंवा ऐकणे हाही एक मोठा गमतीदार अनुभव कधी कधी असतो. हास्यसम्राट प्रा दीपक देशपांडे यांनी आपल्या एका कार्यक्रमात अशा बोलण्याचा एक नमुना सादर केला होता. एक व्यक्ती फोनवर बोलत असते. समोरच्या बाजूला कोणी तरी भगिनी असते. हा आपला प्रत्येक वाक्याला, ‘ हा ताई, हो ताई, हो ना ताई ‘ अशी ‘ ताईची ‘ मालिका सुरु ठेवत असतो. काही माणसे फोनवर बोलताना सारखं ‘ बरोबर, खरं आहे ‘ यासारखे शब्द वारंवार उच्चारताना दिसतात तर काही ‘ तेच ना ‘ याची पुनरावृत्ती करतात.
अजून काही मंडळी बोलताना जणू समोरच्या व्यक्तीची परीक्षा पाहतात. त्यांच्या सांगण्याची सुरुवातच अशी असते. ‘ काल काय झालं माहितीये का ? ‘ किंवा ‘ मी आज केलं असेल माहिती आहे का ? ‘ आता समोरच्या व्यक्तीला कसं माहिती असणार की काल काय झालं किंवा तुम्ही आज काय केलं ? मग पुढे अजून ‘ ऐका ना.. ‘ ची पुस्ती असते. आता आपण ऐकतच असतो ( दुसरा पर्याय असतो का ) तर कधी कधी समोरची व्यक्ती आपल्याला मी फार महत्वाचं सांगतो आहे किंवा सांगते आहे असा आव आणून ‘ हे पहा मी सांगतो. तुम्ही एक काम करा… ‘ अशी सुरुवात करतात. असो मंडळी. तर असे अनेक किस्से आहेत. ‘असो. ‘, ‘ असं आहे बुवा सगळं. ‘ आता तुम्ही एक काम करा. लेख संपत आलाय. तेव्हा वाचणं थांबवा किंवा दुसरं काही वाचा. आणि हसताय ना ? हसत राहा.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈