सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ विविधा ☆ आमची अंदमान सफर… भाग-4 ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
या ट्रीप मधील पुढील आकर्षण राॅस आयलंड हे होते. तिथे अनुराधा राव मॅडम ना भेटायचे होते. निसर्गाच्या सान्निध्यात पशू-पक्षी आणि प्राण्यांबरोबर संवाद साधून जीवन आनंदात व्यतीत करणारी अनुराधा कशी असेल ते बघण्याची उत्सुकता होती. या आयलंडवर ब्रिटिशांनी उभारलेल्या बऱ्याच इमारतींचे भग्नावशेष पहायला मिळाले. बेकरी, प्रिंटिंग प्रेस,पाॅवर हाऊस, चर्च, बरॅक्स अशा विविध इमारती होत्या.
युध्दाच्या काळात त्यातील काही नामशेष झाल्या तर काही त्सुनामी, वादळे यामुळे नाश पावल्या. हे आयलँड बरेच खचल्यासारखे झाले आहे. तिथे फारसे लोक राहात नाहीत. मोर, हरणे, ससे, खारी या सुद्धा अनुराधा मॅडमच्या हाकेला ओ देतात ही गोष्ट विशेष वाटली. त्या प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी मोठ्या पिशवीत खाऊ घेऊन फिरत असतात. खरं निसर्गप्रेम त्यांच्यामध्ये दिसून येते.अनुराधा मॅडम नी आम्हाला तेथील खूप छान माहिती दिली. तिथे आम्ही भरपूर फोटो काढले.
पोर्ट ब्लेअर सोडण्यापूर्वी आम्ही एक संध्याकाळ वांडूर बीचवर गेलो होतो. येथील किनारा खूप मोठा, शुभ्र पांढरी वाळू असलेला होता.आम्ही शंख, शिंपले वेचत फिरलो. खुप फोटो काढले. समुद्रकिनारी उंच उंच झाडे होती.
समुद्रावर गेलं की सूर्यास्त होईपर्यंत हलायचंच नाही हे ठरलेले असे.
तो सूर्याचा गोळा अस्ताला गेला की परतायचं ! बीच वर शहाळ्याचे पाणी, खोबरे याचा मनसोक्त आस्वाद घेतला!
क्रमशः….
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈