विविधा
☆ आण्णांची सुंदर बालकविता ☆ श्री सुभाष कवडे ☆
मराठी वाङ्मयात आपल्या अभिजात काव्य प्रतिभेने स्वत:ची ‘सुवर्णमुद्रा’ निर्माण करणारे, माणदेशाचे ‘सुवर्णरत्न’ म्हणजे, स्व.ग.दि.माडगूळकर(आण्णा) होत. आण्णा म्हणजे दुष्काळाने होरपळणाऱ्या माणदेशाची श्रीमंती होय. बहुमुखी प्रतिभेच्या आण्णांचा जन्म माणदेशातील आटपाडी तालुक्यातील ‘शेटफळे’ या छोट्या खेड्यात झाला आहे. माडगुळे आणि शेटफळे ही दोन छोटी गावे मराठी माणसाच्या मनामनात कुतूहलाचा आणि आदराचा विषय बनली आहेत. ते गदिमा आण्णांच्या आणि व्यंकटेश माडगूळकर तात्यांमुळेच. गदिमा, तात्या आणि शंकरराव खरात यांच्यामुळे माणदेशी माती धान्य झाली आहे .
आण्णांवर काव्यलेखनाचे संस्कार अगदी लहानपणापासून त्यांच्या मातोश्रीकडून झाले आहेत. ओव्या,भजने,लोकगीते,पोवाडे,भारुडे आदी प्रकारच्या लोकगीतांचा खजिना त्यांना माणदेशातूनच विपुल प्रमाणात ऐकावयास मिळाला. ज्या मातीतून गदिमा जन्मले त्या मातीचे संस्कार घेऊनच ते मोठे झाले. लिहिते झाले. कोणताही कलावंत आपल्या मातीचे संस्कार घेऊनच मोठा होत असतो. आण्णांची लेखणी निर्मळ झऱ्याप्रमाणे होती. मनाला दिलासा देणारी होती. समाजमनावर संस्कार आणि मूल्यांची पेरणी करणारी होती. आण्णांच्या मनात माणदेशातील भोळ्याभाबड्या वारकऱ्यांबद्दल अपार श्रद्धा होती. म्हणूनच आण्णा संत कवी वाटतात. जगण्याचे तत्त्वज्ञान साध्या-सोप्या भाषेत सांगणारे तत्त्वचिंतक वाटतात. अत्यंत साधे-सोपे शब्द, सरलता, प्रासाद, अर्थपूर्णता ही आण्णांच्या लेखणीची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे आण्णांची कविता मातीत राबणाऱ्या अशिक्षित बळीराजालासुद्धा भावते. अण्णांची कविता म्हणजे, मानदेशी मातीचे ‘अक्षरलेणे’ आहे. आण्णांना आपल्या काव्यलेखनाचा अभिमान होता. पण गर्व मुळीच नव्हता. फुटपाथवर झोपलेल्या,उदबत्त्या विकलेले, शिकवण्या केलेले,आडत्याच्या दुकानात कामावर राहिलेले आण्णा आपल्या अलौकिक प्रतिभेने रसिकांच्या हृदयसिंहासनावर आज आरूढ झाले आहेत. महाराष्ट्राला पसा-पसा भरून ‘शब्दधन’ दिले आहे. व्यक्तीचित्रे, कथा, कादंबऱ्या, नाटके, पटकथा आणि हजारो गाणी लिहिणारे आण्णा उत्कृष्ट अभिनेते होते. अण्णांनी गाण्यांमध्ये विविध प्रकार हाताळले आहेत. अभंग,कविता,भावगीते,भक्तिगीते, पोवाडे,लावण्या,गवळणी,स्फूर्तीगीते, अंगाईगीते असे विविध प्रकार हाताळले आहेत.याबरोबरीने गदिमांनी सर्वांगसुंदर अशी बालगीतेसुद्धा लिहिली आहेत. चांदण्यात चुळभरा, तळ्याकाठचे नंदी, चक्रपाणी,पोपटाची गोष्ट अशा काही सुंदर संस्कारक्षम बालकथा लिहल्या आहेत. आण्णांची ‘बालगीते’ म्हणजे आण्णानी ‘मूल’ होऊन लिहिलेल्या कविता आहेत. अतिशय निष्पाप मनाने आण्णांनी लेखणी लिहिती केली आहे. चिमुकल्यांचा भाबडेपणा, निष्पापपणा, भावविश्व सारं काही बाळाचं आहे. मुलांचं म्हणून एक जग असतं आणि या बाळजगताचा अभ्यास करुन बालकविता लिहिल्या आहेत.
‘बिनभिंतीची शाळा’ नावाची आण्णांची सुंदर कविता आहे. चार भिंतीतल्या शिक्षणाइतकेच निसर्गाचे शिक्षणही मुलांना आवश्यक आहे. हे निसर्गशिक्षण शिकवणारी ही कविता आहे. निसर्गातील प्राणी, पक्षी, फुलपाखरे,तारे,वारे,चांदण्या, प्रत्येकजण आपल्याला काहीतरी शिकवीत असतात म्हणून हे सारे आपले गुरू आहेत. असा उदात्त विचार मांडणारी ही कविता आहे.
बिनभिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू
झाडे वेली पशू-पाखरे
यांशी गोष्टी करू…..
या ओळी मुलांना शाळेबाहेरच्या ज्ञान देणाऱ्या या गुरूंचा परिचय करून देणाऱ्या आहेत. ‘कुरूप बदक’ अशीच एक आण्णांची सुंदर कविता आहे. एकटेपणाची जाणीव होता-होता जीवनाचे वास्तव समजल्यावर स्वतःचे अस्तित्व गळून जाते. यासाठी स्वपरिचय महत्त्वाचा आहे. असे मूल्य सांगणारी ही कविता मनाला चटका लावून जाते. आभाळ, सूर्य,चंद्र, चांदण्या याबद्दल मुलांना सदैव कुतूहल आणि आकर्षण वाटत आले आहे. या घरात जाण्यासाठी निळी वाट आहे, असं सांगणारी अण्णांची ‘देवाचे घर’ नावाची एक सुंदर बालकविता…. बाळाबरोबर मोठ्यांनाही आनंद देणारी आहे. या कवितेत लिहितात. याबरोबरीने गदिमांनी सर्वांगसुंदर अशी बालगीतेसुद्धा लिहिली आहेत.चांदण्यात चुळभरा, तळ्याकाठचे नंदी, चक्रपाणी,पोपटाची गोष्ट अशा काही सुंदर संस्कारक्षम बालकथा लिहल्या आहेत. आण्णांची बालगीते म्हणजे आण्णानी मूल होऊन लिहिलेल्या कविता आहेत अतिशय निष्पाप मनाने आण्णांनी लेखणी लिहिती केली आहे. चिमुकल्यांचा भाबडेपणा निष्पापपणा भावविश्व सारं काही बाळाचं आहे. मुलांचं म्हणून एक जग असतं आणि या बाळजगताचा अभ्यास करुन बाल कविता लिहिल्या आहेत.
बिनभिंतीची शाळा नावाची आण्णांची सुंदर कविता आहे.चार भिंतीतल्या शिक्षणाइतकेच निसर्गाचे शिक्षणही मुलांना आवश्यक आहे.हे निसर्ग शिक्षण शिकवणारी ही कविता आहे निसर्गातील प्राणी,पक्षी,फुलपाखरे,तारे,वारे,चंद्र, चांदण्या,प्रत्येकजण आपल्याला काहीतरी शिकवीत असतात.म्हणून हे सारे आपले गुरू आहेत. असा उदात्त विचार मांडणारी ही कविता आहे.
बिन-भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू
झाडे वेली पशु पाखरे
यांशी मैत्री करू…
अण्णांची ‘देवाचे घर’ नावाची एक सुंदर बालकविता बाळाबरोबर मोठ्यांनाही आनंद देणारी आहे. या कवितेत लिहितात .
निळी निळी वाट
निळे निळे घाट
निळ्या निळ्या पाण्याचे
झुळझुळ पाट…..
‘लयबद्धता’ आणि ‘देखणी शब्दकळा’ यामुळे सारेजण ही कविता गुणगुणत राहतात. आणखी एक सुंदर बालकविता म्हणजे……
‘नाच रे मोरा’. पावसाळी वातावरण जिवंत करणारी, सातरंगी इंद्रधनुष्याच्या कमानीखाली मोराने नाचणे…. ही कल्पनाच आपल्या मनात मोरपंखी सातरंगी इंद्रधनुष्य निर्माण करणारी आहे.
पावसाची रिमझिम थांबली रे..
तुझी माझी जोडी जमली रे..
आकाशात छान-छान
सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच,
नाच रे मोरा, आंब्याच्या बनात,
नाच रे मोरा नाच…..
‘गोरी गोरी पान’ हे गीत असेच फुलासारखे छान आहे. ‘चांदोबाची गाडी,’ गाडीला जुंपलेली हरणाची जोडी, ही कल्पनाच किती मजेशीर व अफलातून आहे आण्णा शब्दप्रभू होते. अलौकिक प्रतिभेचे वरदान लाभलेले महाकवी होते. त्यांची साक्ष ही कविता देते. मुलांसाठी सोपे लिहिणं अवघड असतं पण ते लिहीत होते.
वहिनीला आणायला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणाची जोडी तुडवी गुलाबाचे रान
दादा मला एक वहिनी आण…..
बालसुलभ कल्पना असावी तर अशी. हे फक्त गदिमांना शक्य झाले आहे. फुगडी खेळू गं फिरकीची,बकुळीचं झाड झरलं गं, अशांसारख्या अनेक गीतांचा उल्लेख करता येईल. ‘निज माझ्या पाडसा’ हे गदिमांनी लिहलेल प्रसिद्ध अंगाईगीत आहे. उत्तम निसर्गचित्रण या अंगाईगीतांमधून अनुभवता येते.
मिटून पापण्या पहा लाडक्या, स्वप्नामधली घरे ,
निळ्या धुक्यांच्या इमारतींना बर्फाची गोपुरे.
महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधाप्रमाणे शिरलेल्या गदिमांच्या कवितांमध्ये त्यांनी लिहिलेल्या गीतांना एक वेगळे स्थान आहे. गदिमांनी शब्दमळा फुलवला. शब्दांची श्रीमंती पेरली. पाण्याविना भगाटा सोसणाऱ्या मातीला आपल्या शब्दांनी ओलावा दिला. म्हणूनच त्यांच्या सर्व साहित्यकृतींना आपण सारे अभिमानाने मिरवत आहोत. आण्णांच्या हृदयात सदैव एक निष्पाप मुल वास करत होते. म्हणून आण्णांनी चिमुकल्यांसाठी त्यांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी सुंदर संस्कारक्षम बालगीते लिहिली आहेत. ही बालगीते मराठी मनाला चिरंतन , चिरकाळ आनंद देत राहतील, यात शंकाच नाहीत.
© श्री सुभाष कवडे
भिलवडी जि.सांगली
भ्रमण -९६६५२२१८२२
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈