सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
विविधा
☆ आधार… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆
आधार हा शब्द इतका सोपा आहे का? कोणाचा आणि कशाचा आधार वाटावा हे प्रत्येकाच्या नजरेतून आणि विचारातून वेगवेगळा असू शकतो. म्हणजे त्याची व्याख्या करणे कठीण आहे ना. पण आधार वाटावा ही भावनाही खूप सुखद आहे. ते मला जास्त भावते. प्रत्येकाला आधार हा हवा असतो पण स्वतःचा अहंम आड येतो. काहीजण खरच मान्य करतात की खरच आधार हा माझ्यासाठी खूप मोठे काम करतो माझ्या आयुष्यात. पण अशी ही काही लोक असतात त्यांना आधार हवा असतो पण त्यांना तो दाखवायचा नसतो. समोरून आधाराचा हात आला तरी तिथे त्यांचा अहंम आड येतो. अशी लोक मला खूप केविलवाणी वाटतात आणि मग त्यांच्यासाठी जिव कळवळतो पण ते ही त्यांना कळत नाही. हे असे का व्हावे हे कळत नाही पण असे असू नये असे माझे निर्मळ मत आहे. हे मान्य आहे की आपल्या कमकुवत बाजूचा लोक गैरफायदा घेतील ही पण मनात एक भीती असते. पण त्यावेळेला हे तरी विचारात घेण्यासारखे असते की आधार देणारा हात कोणाचा आहे. आणि प्रत्येक वेळेला आधारासाठी पुढे आलेला हात हा काही स्वार्थ मनात ठेऊनच आधार देत नसावा. त्याच्या मागे त्याचे निर्मळ मन न दिसावे ही खंत आहे. आणि कदाचित आधाराला पुढे येणारा हात हा मैत्रीचा असू शकतो किंवा त्याला पण तुमच्यातला चांगुलपणाची जाणीव असावी म्हणून पुढे येत असेल? खूप मोठे प्रश्न चिन्ह आहे माझ्या मनात???
आधार हा खूप गोष्टीं मधून मिळू शकतो. तो शब्दातून मिळतो, स्पर्शातून मिळतो किंवा निव्वळ नजरेच्या एक कटाक्षात पण आधार असतो. किती छान भावना आहे खरं तर ही… सोपी निर्मळ निस्वार्थी… ज्याला आपली गरज आहे त्याच्या पाठीशी नाहीतर त्याच्या सोबत राहणे आणि त्याच्या बरोबरीने त्याला साथ देणे.
प्रत्येक वेळेला पैसा हाच आधाराचा मुद्दा नसतो ना? नुसते…. मी आहे ना…. हे शब्द ही खूप समाधान देऊन जातात. मनातला एक कोपरा त्याने चिंब भिजून जातो… ओलावा वाढतो… मनाची ताकत वाढवतो.
आधार घेणे किंवा मागणे हे कमीपणाचे असूच शकत नाही. खूप निर्मळ संवेदना आहे ही जी एकाच्या मनात दुसऱ्या बद्दल निर्माण होते. आधार देणारा हा मनाने खंबीर असतो पण प्रत्येक वेळेला नाही होत असे. समोरच्यावर जीव ओवाळून टाकताना आधार देणारा हा मनाने खचला असला तरी त्या समोरच्या माणसाला आधार देतोच ना…
आधार या भावनेला वयाचे बंधन नसतेच मुळी. आपल्या लहान बाळाच्या प्रांजळ नजरेचा त्याच्या स्पर्शाचा ही आपल्याला कधी कधी आधार असतो जगण्याची उमेद देतो. आपण पण तो आधार खूप प्रामाणिक पणे मान्य करायला शिकायला हवे.
खऱ्या मित्र मैत्रिणीच्या मैत्रीला पण आपण आधारच म्हणतो ना… राधेला कृष्णाच्या बासरीच्या सुरांचा आधार मान्य करतो… वारकऱ्याला वारी मध्ये विठ्ठलाच्या भक्तीचा आधार असतो. बुडत्याला काठीचा आधार अशी म्हण पण मराठीत आहेच की… अशी किती पैलू आहेत आधार या शब्दाला.
देव आहे की नाही हा मुद्दा मला इथे मांडायचा नाहीये तो विषयच नाहीये माझा कारण मी कामालाच देव मानते आणि त्याच्याशी खूप प्रामाणिक राहते. हीच माझी देवाबद्दल श्रद्धा आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रूपाने तो देव सापडतो आणि त्याची श्रद्धा पण तो मनात बाळगत असतो. मग ही श्रद्धा म्हणजेच आधार आहे का? हा विचार माझ्या मनात रुंजी घालतोय आणि असे वाटते खरंच ही देवावरची कामावरची श्रद्धा म्हणजे पणआधारच आहे. आपण त्या देवावर कामावर विश्वास ठेवतो आणि जगणे आनंदी व्हावे म्हणून आपण नकळत किंवा जाणून बुजून त्याचा आधारच घेत असतो.
© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈