? विविधा ?

आषाढस्य प्रथम दिवसे ! ☆ श्री मिलिंद रतकंठीवार ☆

अगदी परवा, परवापर्यन्त, आमच्या बंगलीच्या टेरेसवरुन, हाताच्या अंतरावर ही आमच्या आवारातील, विविध झाडांच्या, हिरव्या रंगाच्या विविध छटा दर्शविणारी हिरवाई मला दिसत होती.

बांबूच्या झाडाच्या त्या फांद्यांना स्पर्श करावे, म्हटले तरी, अगदी पाय उंचावून उभे राहून देखील, त्या फांद्या मला स्पर्श करू देत नव्हत्या, वाऱ्याच्या हलक्याश्या झोताने, जवळ येऊन, वाकुल्या दाखवीत त्या पुन्हा दूर पळून जात होत्या. कितीतरी कधीही न बघितलेले, रंगबिरंगी पक्षी , मधूरगुज करीत होते. ते देखील, ह्या खोडीचा आनंद लुटत असावेत. नव्हे, नव्हे ते आनंदित होत होतेच.

पण आज….आज मी पाठमोरा उभा असताना, त्या बांबूच्या एका फांदीची धारदार, इवलीशी, लवलवती पाती वाऱ्याच्या हलक्याशा गार झोताने आपणहून जवळ येऊन, मस्त मस्त, डोलत डोलत, माझ्या मानेला,पाठीला अन् खांद्याला करवती सारखा क्षणिक, खरखरीत स्पर्श करून पट्कन माघारी जात होती.

अशी माझी खोडी काढून ती पाने माझे लक्ष वेधू इच्छीत होती कां?

बांबूची ती तरारणारी, थरथरणारी, धारदार पाती, अंगाला, थरथरत, थरथरत बोचरा स्पर्श करून काही सुचवू इच्छीत होती कां?

त्या बरोबरच, जांभुळाची ती गर्द हिरवी, आकाराने लहान चमकदार, लकाकणारी दाट पाने, मला आज शांत, संयमी, धीरोदात्त अशीच भासत होती.

त्यातच, दोन्ही झाडांच्या फांद्यात, तो गुंतून, तजेलदार पानापानांतून, फुलणारा टप्पोरा पांढरा शुभ्र चाफा, सर्वांच्या अध्ये मध्ये, फांद्या फांद्यांच्या गर्दीत, गुंतत अन् गुंफत आपला हर्षोल्लास अभिव्यक्त करीत, आपली सुखद उपस्थिती नोंदवून, आपले अस्तित्त्व दर्शवीत होता. एखाद्या लहान खेळकर, खोडकर, मुलाने , फोटो काढताना जसे मध्ये मध्ये, उड्या मारीत, माझा पण, माझा पण, असा हट्ट करावा अगदी तस्साच..उनाड !

आणि, ….आणि आमच्या आवारातील, ह्या तिघांच्या, बरोबरीने एका कडेला उभा असलेला तो एकाकी शांत, धीरोदात्त, नारळाचा वृक्ष… श्री वृक्ष.! कडेवर अनेक श्री फलांचे ओझे सहजी घेत तो लेकुरवाळा निर्विकार उभा होता. हत्तीच्या कानाच्या, मंद हालचालीप्रमाणे, त्या श्री वृक्षाच्या मोठ्ठाल्ल्या झावळ्या, हळू हळू, डुलत होत्या. अन् तो, तटस्थपणे ध्यानस्थ होऊ पाहणारा, मौन, शांत, तृप्त, अन् पोक्त तपस्वी श्रीवृक्ष ,अध्यात्मिक अनुभूती दाखवीत होता .

अचानकच काही दिवसातच झालेला हा बदल मी उत्सुकतेने न्याहाळीत होतो.

अन् लाजत, मुरडत, चाहूल न जाणवू देत, ती संध्याकाळ आली. पक्षी थव्या थव्याने पश्चिम दिशेला परतीला जाऊ लागले. मावळतीला जाणाऱ्या त्या, तेजोगोलाची सुवर्णमय किरणे, इमारती, इमारतीवर, हिरवाई, हिरवाईवर अंकित होत, होत पसार होवू लागली, त्या बरोबरच पित प्रकाशाने न्यालेली पाने, हळूहळू कडेकडेने स्वर्णांकित होत, उर्ध्व दिशेने वेगाने जाऊ लागली. आवारातील चारही झाडांच्या फांद्या एकमेकांना स्पर्शून, जणू खांद्याला खांदा लावून, लयबद्ध, डोलत डोलत, गात गात एकमेकांच्या भावनांना मम् म्हणत होत्या.

हे एक त्यांचे समूह गानच असावे, नाही ? की ती एक सामूहिक सरगम असेल ? कारण, मी बघितले, सर्वच भवताल आनंदाने डोलत होता. सर्वच परिवेश उल्हासित होत होता. दृष्टी क्षेपातील, सभोवतालची सर्वच हिरवाई जणू पाय स्थिर ठेऊन ,शरीर, मनाने डोलत होती. तन्मयतेने नृत्य करीत होती. मनोमन मी ही न डोलतो तर नवल !
पण मग हा अधिरपणा कां? कशासाठी ? कशाची वार्ता? कुणाच्या स्वागताची तयारी?

पण, दुजोरा दिला…

त्या येणाऱ्या पश्चिमेच्या गार वाऱ्याने, अस्मानातील त्या ढगांच्या हालचालींनी, दूरवर वाजणाऱ्या त्या नगाऱ्याने… वार्ता दिली..

हो ! त्या आषाढाची, नेमेची येणारी पहिली सर झेलण्यासाठी होता तर एवढा खटाटोप ?

ती समर्पिता, तप्त धरित्री ग्रीष्म ऋतुचा एवढा ताप झेलल्यानंतर, एक दिलासा मिळविण्यासाठी, एक दिलासा देण्यासाठी, मृद्गंध प्रसृत करण्यासाठी, ती हिरण्मयी देखील आतुर झालेली आहे. हे त्या हिरवाईच्या स्पर्शा स्पर्शातून, चर्ये,चर्येतून सुचवीत होती.

हो, त्या सरींच्या आगमनाची प्रतीक्षा आहे तर,,!

त्या पहिल्या वहिल्या सरीची सर कशालाच नाही. ती पायाला नुपूर बांधून थुई थूई नाचणारी, पहिली सर! त्यात भिजून नाचणारे ते शैशव ! ती शब्दात व्यक्त न झालेली, पहिल्या वहिल्या कोवळ्या प्रेमाची अनुभूती अन् अभिव्यक्ती !

त्या मृण्मयीचा, तो सर्वत्र दरवळणारा हिरण्मयी मृद्गंध !

त्या सरीची, त्या क्षणाची आतुरतेने सर्व वाट बघत आहेत.

आम्ही देखील…

© श्री मिलिंद रतकंठीवार

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments