सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ आईचे दूध बाळाच्या हक्काचे ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
अनेक संतांनी, जवळ जवळ सर्वच संतांनी म्हटले तरी चालेल, पशुपक्षी, प्राणी, वनस्पती या सर्वांवर प्रेम करायला त्यांनी शिकविले. प्रत्येक प्राण्याला भुके पासून मुक्त करण्याचा संदेश दिला. माणसाची असो वा प्राणी-पक्ष्यांची, आई ही आईच असते. तिची जागा नाही कोणी घेऊ शकत. आपल्या बाळा प्रति कोणत्याही संकटांना सामोरे जायला तयार असते.
सातारा शहरातील घटना. “ॲनिमल राहत” या प्राणी कल्याणकारी संस्थेचे कार्यकर्ते शहरातून फेरफटका मारत असताना त्यांना एक हृदयद्रावक चित्र दिसले. एक गाय आपल्या वासराला दूध पाजण्याचा प्रयत्न करत होती. प्रेमाने पुन्हापुन्हा त्याला चाटत होती. तिला पान्हा फुटला होता. भुकेने वासरू ही दूध पिण्याचा प्रयत्न करत होते. पण ती त्याला बाजूला सारत होती. वासरू पुन्हापुन्हा आचळ पकडण्यासाठी धडपडत होते. ती त्याला पुन्हा पुन्हा चाटत होती. पण ती त्याला बाजूला सारत होती. हा काय प्रकार आहे? म्हणून “राहत” चे कार्यकर्ते त्यांच्याजवळ गेले. पहातो तो राग आणि चीड येण्यासारखा प्रकार होता. गाईचे दूध वासराने पिऊ नये, आपल्यालाच मिळावे म्हणून मालकाने वासराच्या तोंडावर एक टोकदार खिळ्यांनी बनविलेला एक पट्टा बांधल्याचे दिसून आले. वासरू दूध पिण्यासाठी जवळ गेले की त्याच्या तोंडाजवळ बांधलेल्या पट्टया वरचे टोकदार खिळे तिच्या स्तनांना टोचत होते. आणि तिला वेदना होत होत्या. “राहत” च्या कार्यकर्त्यांनी गाईच्या मालकाचा शोध घेतला. आणि त्याची चांगलीच कानउघडणी केली . वासराच्या तोंडावरचा पट्टा काढला. वासरू लगेच आईला जाऊन बिलगले. गाय भुकेल्या बाळाला मायेने चाटत होती. तिला पान्हा फुटला होता. वासरूही चक् चक् करून स्तनपान करत होते. भूक शमवत होते. किती छान चित्र!
आपण गाय वासराची पूजा करतो. खर तर गाईच्या दुधावर वासराचाच अधिकार ! प्राण्यांना प्रेम देणं, हीच त्यांची खऱ्या अर्थाने पूजा होईल. अशी अन्यायकारक घटना कोठेही दिसली तर, त्याला वाचा फोडणे हे प्रत्येकानेच आपले कर्तव्य म्हणून करायला काय हरकत आहे?
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈