विविधा
☆ आईचा उपदेश ☆ सौ.रोहिणी अमोल पराडकर ☆
सासरी जाणाऱ्या मुलीला आईने काय समजवावे
सासरी जाणारी मुलगी आईला विचारते की, “आई, नक्की कशी वागु गं मी सासरी????”
आई म्हणते की, तुझ्या वहिनीने तुझ्या आईवडिलांशी जसे वागावे, असे तुला मनापासून वाटते. त्याहुन चांगली तू तुझ्या सासरच्या मंडळींशी वाग!!
सासरी जाणाऱ्या मुलीला आईने काय समजवावे ?
“सासर हेच तुझ घर आहे. तिकडच्या कुरबुरी आम्हांला सांगत बसू नकोस. तुझ्या बहिण भावंडांना चॅट किंवा सतत फोन करायचा नाही. पूर्वी पत्र हा एकमेव दुवा होता. सासर व माहेर मध्ये त्यावेळी मुली कशा सासरी साखरेच्या पाकाप्रमाणे मिसळून जात होत्या त्यांचा आदर्श ठेव. त्या कमवत नव्हत्या पण माणस नातेवाईक जोडत होत्या.
तुम्ही आज कालच्या मुली खूप शिकलात, गलेलठ्ठ पगार हातात पैसा खेळतो. त्यामुळे तुमची जनरेशन आमची जनरेशन……. वडिलधार्यांशी भांडण करणं त्यांना तुच्छ लेखण असे प्रकार तुझ्याकडून होता कामा नये.
माहेर आता हे तुझं पाहुण्यांचे घर आहे असं समज. चार दिवसासाठी ये पाहुणी म्हणून रहा आणि निघून जा…….” हे निक्षुन सांगायला हवे,
मुलगी सासरी गेल्यानंतर माप ओलांडून घरात प्रवेश केल्यावर तिच्या आईचा लगेच फोन येतो काय गं कशी आहेस? आठवण येते का? असे विचारणा सतत होत असते. काय खाल्लं? काय करते? सासू काय करते? कामाला मदत करते का? अशा फालतू गोष्टींची विचारणा वारंवार होत असते. त्यामुळे मुलगी बिथरते. तिला कळत नाही की आपण कसे वागावे? आपली काय जबाबदारी आहे? हळूहळू भांडण वाढू लागतात आणि घटस्फोटापर्यंत पाळी येते. याला जबाबदार सर्वस्वी मुलीची आईच जबाबदार असते.
आईने निक्षून सांगितले की…….
आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत तंत्रज्ञान याचा दुरुपयोग करू नको. विनाकारण रोज रोज मला फोन करू नको. आमच्या घरात म्हणजेच तुझ्या माहेरी तू लक्ष घालू नकोस. आम्ही सक्षम आहोत. आमच आम्ही बघून घेऊ सासर हेच तुझं घर आहे. त्या घरात तू प्रामाणिक व आपुलकीने वाग. सासु-सासर्यांना आई-वडील समज त्यांचा योग्य तो मान ठेव. कारण भविष्यात तुला ही कोणाचे ना कोणाचे तरी सासू व्हायचा आहे. त्यांच्या मुलाला त्यांच्यापासून तोडू नकोस. त्याचे परिणाम तुझ्या मुलांवर होतील तेही तुझ्याशी मग असेच वागतील. आपल्या मुलाने आपल्याशी कसं वागावं? असे तुला वाटते तसेच आपण सासरी वागावे. टीव्ही सिरीयल बघून मनात भलते-सलते विचार आणू नकोस. ते सर्व क्षणिक आणि फसवे असते हे लक्षात ठेव. एवढी शिकलेली मुलगी तुझ्या शिक्षणाचा व प्रगल्भतेचा वापर कर. अंगी नम्रपणा व शालीनता बाळगून तो दाखवून दे. जितका गलेलठ्ठ पगार तितकीच गलेलठ्ठ मनावर रुजलेली संस्कृती आहे हेच दाखव. आईवडिलांचं नाव नक्कीच तुझ्या सासरी आदराने घेतलं जाईल. आम्ही मुलगी म्हणून तुझे लाड जसे केले तसेच लाड सासरी होतील. आपल्या शब्दात गोड स्वर मिसळ.
मैत्रिणींमध्ये टेंबा मिरवण्यासाठी माझ्या नवऱ्याचं नाक माझ्या मुठीत आहे. तो माझ्या शब्दाबाहेर नाही असं दाखवण्यासाठी रोज त्याच्याकडे फालतू हट्ट करू नकोस. घरात स्वच्छता टापटीपपणा ठेव. दुसऱ्याने कामाला मदत करावी अशी अपेक्षा न बाळगता स्वतः काम करावे. मग तोच आपल्या मदतीला पुढे येईल रोज सकाळ-संध्याकाळ देवाला दिवा लावुन नमस्कार कर.
अशा गोष्टी जर प्रत्येक आईने आपाल्या मुलीला शिकवल्या, तर कोर्टात दाखल होणाऱ्या पती-पत्नींमधील खटल्यांची संख्या आणि पोलिस स्टेशनला 498-अ प्रमाणे दाखल होणाऱ्या बहुतांशी खोट्या तक्रारींची संख्या, जी दिवसेंदिवस मारुतीच्या शेपटासारखी वाढत चाललीय, ती निश्चितपणे कमी होईल, होईल. अस माझ सोज्वळ मत आहे.
© सौ. रोहिणी अमोल पराडकर
कोल्हापूर
भ्रमणध्वनी – 8208890678