सौ राधिका भांडारकर

☆ आषाढी वारी विशेष – “वारकरी संप्रदायाचे कार्य…” ☆ सौ राधिका भांडारकर

उत्कट भक्ती, सदाचार, नीती यावर आधारलेला सरळ मार्गी  आचारधर्म म्हणजे वारकरी संप्रदाय.

विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांच्या संप्रदायाला वारकरी संप्रदाय म्हणतात. आणि या संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त पुंडलिक समजला जातो.

वारी म्हणजे एक सामुदायिक पदयात्रा.  विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपापल्या गावाहून वारकरी या पदयात्रेत भक्तिभावाने सामील होतात.

संत ज्ञानेश्वरांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची  परंपरा होती आणि संत नामदेव,  संत तुकाराम, संत एकनाथ, संत भानुदास यांनी हाच प्रवाह चालू ठेवला.

या वारीची प्रथा आजतागायत त्याच भावनेनेने टिकून आहे हेच खरे वारीचे महात्म्य.  भगवंतांचे नामस्मरण करणे हे या संप्रदायाचे मुख्य तत्व.  संसारातील बंधनातून,  मोहमायेतून हळूहळू दूर होऊन,  भजन कीर्तनाच्या माध्यमातून, नामस्मरण करून  पांडुरंगाशी  एकरूप व्हावे हा संप्रदायाचा साधा सोपा भक्ती मार्ग आहे.  वारकरी संप्रदाय म्हणजे एक संस्कारक्षम सांस्कृतिक केंद्र आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

या संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती पंथांच्या स्त्री-पुरुषांसाठी खुले आहे.  जातीय समता हा या संप्रदायाचा कार्य केंद्रबिंदू आहे.  येथे उच्च, नीच,  गरीब,  श्रीमंत असा भेदभाव नाही.  येथे सर्व समान.  सर्वांचे स्थान एकच.  शास्त्रप्रामण्याला, जातीव्यवस्थेला धक्का न लावता स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग या संप्रदायाने मोकळा करून दिला. स्वातंत्र्य व समतेचे वातावरण निर्माण केले.  भक्ती पंथांच्या साहाय्याने आध्यात्मिक उन्नती साधता येते, नैतिक सामर्थ्य वाढवून प्रापंचिक  दु:खावर मात करता येते असा विश्वास या वारकरी पंथाने लोकांप्रती निर्माण केला.

वारकरी संप्रदायात व्रत—वैकल्याचे स्तोम नाही.  कर्मठपणा नाही.  त्याग, भोग,  नैष्कर्म्य,  स्वधर्माचरण याचा मेळ घालण्याचा उपदेश यात आहे.  या संप्रदायाचे कार्य लोकाभिमुख आहे.  लोकांमध्ये राहून नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न यात आहे.  श्रद्धा व विवेक यांच्या एकात्मतेवर भर देण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.  प्रपंच व परमार्थ याचा समन्वय साधण्याची शिकवण हा संप्रदाय समाजाला  देतो.  त्यांचे एकच सांगणे असते की कर्तव्यनिष्ठेला व सामाजिक नीतिमत्तेला पोषक अशीच कर्मे करावीत.  एकनाथ महाराज, चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी सारेच वारकरी संत गृहस्थाश्रमी व कुटुंब वत्सल होते.

।। आधी प्रपंच करावा नेटका।। ही शिकवण त्यांनी समाजाला दिली. स्त्रियांच्या आणि शूद्रांच्या जीवनातलं जडत्व नाहीसं करून त्यांच्या निरस जीवनाला आध्यात्मिक ज्ञानाची ओळख करवली.  आणि त्यांच्या सुप्त शक्तींची व भावनांची जाणीव त्यांना  करून दिली.

वारकरी संप्रदायाने मराठीचा अभिमान बाळगला.  बोलीभाषेला वाङमयीन प्रतिष्ठा मिळवून दिली.  वारकरी संतांनी बहुजन समाजासाठी प्रथम मराठीत लेखन केले.  फुगड्या, पिंगा, भारुडे, गवळणी, अभंग, ओव्या, कीर्तने यांच्या माध्यमातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले. लोकांना रुचेल, समजेल,  त्यांच्या ओठावर राहील असेच लेखन त्यांनी केले.

। वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा।

। येरानी  वहावा भार माथा ।।

असे संत तुकाराम आत्मविश्वासाने समाजाला सांगतात.

थोडक्यात वारकरी संप्रदायाने सामाजिक समतेचा पाया रचला.  तुळशी माळ, बुक्का,  गोपीचंदन,  गेरूच्या रंगात बुडवून तयार केलेले जाड्या भरड्या कापडाचे,  विशिष्ट आकाराचे निशाण म्हणजे संप्रदायाची पताका ही वारीच्या उपासनेची साधने आहेत.  

संप्रदायाचे मुख्य दैवत श्री विठ्ठल.  आणि हे कृष्णाचे रूप आहे.

 राम कृष्ण हरी हा वारकऱ्यांचा महामंत्र.

आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्रीगुरु  ज्ञानदेव तुकाराम” हे वारकरी संप्रदायाचे घोषवाक्य आहे.

टाळ मृदंगाच्या गजरात,  उन्हातान्हात,  पावसात,  थंडी वाऱ्यात,  ही वारी निघते आणि एकात्मतेची जागृती समाजात निर्माण करत भगवंत चरणी लीन होते.

।। राम कृष्ण हरी ।।

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments