सौ.वनिता संभाजी जांगळे
विविधा
☆ आल्या गौराई अंगणी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆
गौरी गणपतीचा सण म्हटले की ,आपल्या आनंदाला सिमाच नसते. लहानांपासून थोरांपर्यंत उत्साह भरलेलेला असतो. गल्ली-गल्लीतून गणरायांच्या स्वागताची तयारी सुरू होते. ढोलतासे , लेझीम ही वाद्ये सुर धरण्यास सज्ज होतात.सगळीकडे आनंदाचे , जल्लोषाचे वातावरण असते. पण या सगळ्यात गोरी गणपतीचा सण म्हटले की ,खेड्यातून विशेष करून कोकणातून लक्ष वेधले जाते ते झिम्मा-फुगडीच्या खेळाकडे . गणपतीचे आगमण झाले की तिसर्या दिवशी जेष्ठागौरीचे आगमण होते. तेंव्हा तरी स्त्रियांमधील उत्साह शिगेला पोहचतो. तेंव्हा हा खेळ खेळला जातो.
विशेष म्हणजे झिम्मा-फुगडीचा खेळ हा खेड्यातून जास्त खेळला जातो. नागपंचमीच्या सणानंतर या खेळाची तालीम सुरू होते .तसे पाहिले तर हे दिवस शेतावरील हातघाईच्या कामाचे दिवस आसतात . तरीसुध्दा दिवसभर थकूनभागून आलेली बाई रात्री बारा-एक वाजेपर्यंत आपला कंटाळा विसरुण या खेळात दंग होते. जणू झिम्मा -फुगडीच्या खेळातून ती आपल्या कष्टाचा शीण घालविते. इतकी ती या खेळात रमून जाते. गौरी गणपतीच्या पारंपारिक गाण्यांवर एकमेकींच्या हातात हात गुंफून फेर धरला जातो. तेव्हा बाईचे एकमेकीच्या सोबतीने एकजूट असणाऱ्या संघटित रूपाचे दर्शन दिसून येते. आपला कंटाळा, सुख-दुःख, व्यथा , संकटे हे सर्वकाही विसरुण बाई या खेळात दंग होते.
काही दशकापुर्वीचा विचार केला तर बाई सणासुदीच्याच निमित्ताने घरा बाहेर यायची. या झिम्मा-फुगडीच्या खेळात तर स्वतःस पूर्ण झोकून द्यायची. फेर झिम्मा , उडत्या चालीचा झिम्मा ,फुगडी ,मंगळागौरीचे खेळ यात ती देहभान विसरुण रमायची. झिम्मा-फुगडीच्या पारंपरिक गाण्यातून ती आपले माहेर ,सासर ,सर्व नातीगोत्यांना तसेच बाईचे जगणे , तिचे राहणीमान हे सर्व गोवत असे. यातून खेड्यातील तिच्या संस्कृतीचे दर्शन घडायचे. लोकपरंपरेतून चालत आलेला आणि आपला सांस्कृतिक वारसा जपणारा हा झिम्मा-फुगडीचा खेळ आजही तितकाच लोकप्रिय आहे. गाण्याच्या तालावर धरला जाणारा ठेका आणि गमती-जमतीचे हावभाव हे सर्व पाहणारे सुध्दा दंग होतात . ग्रामीण स्त्रीया विस-पंचवीस जणींचा मेळ करून गावचौकीत रात्री एकत्र येतात आणि या खेळात रमून जातात. झिम्मा-फुगडी खेळाच्या विविध प्रकारातून बाईच्या शरिराचा सुध्दा व्यायाम होतो.
झिम्मा फुगडी ,मंगळागौर हे खेळ आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचे विशेष आकर्षण आहे. मला या खेळाचे जास्त विशेष वाटते ते खेड्यातील ग्रामीण स्त्री या खेळातून मनातून मोकळी होते. एरवी तिचे कष्टाचे हात शेतकाम ,घरकाम ,मोलमजूरीत बांधलेले असतात. पण गौरी गणपतीचा सण आला की आपले दागीणे, साडी, चोळी याकडे तिचे लक्ष वेधते. घरातील साफसफाई पासून गौराईचे स्वागताची तयारी ती खुपच आनंदाने आणि उत्साहात करते .सणाची सगळी तयारी आटपून ती कितीतरी वेळ या खेळात जाऊन रमते. चारचौघी एकत्र येतात. भेटीगाठी होतात. माहेरवाशीण परतून येते. जिवाभावाच्या मैत्रीणी भेटतात. तसे सणवार आला की, आम्हा स्त्रीयांचा उत्साह अगदी शिगेलाच पोहचतो. पण ग्रामीण स्त्रीला मात्र सणातून मिळणारा हा आनंद वेगळाच.तिच्या दैनंदिन जीवनातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा थोडा वेगळा आनंद. हा आनंद ती आपल्या सणासुदीच्या विविध चालीरूढीतून व्यक्त करू शकते. तिचा आनंद सणासुदीच्या काळात शिगेला पोहचतो. आणि गौरी-गणपतीचा सण म्हटलेकी ,माहेरच्या आठवणी जागून नकळत ओठावर गीत येते ,
” बंधू येईल माहेरी न्यायला
गौरी गणपतीच्या सणाला “
आणि
” बंधू रे शिपाया ,दे मला रूपाया
गौरीच्या सणाला रे ,चोळीच्या खणाला “
तसेच
“रूणूझुणूत्या पाखरा, जा माझ्या माहेरा”,
अजून म्हणजे गौराईच्याअलंकाराचे लेणं सांगताना गीत आहे
” पाटाची आरूळी बाय, पाण्यानं तुंबली
आमची गौराई इथं का बसली, का जोडव्या रूसली
…पाटल्या रूसली,.. डोरल्या रूसली”
असे एक एक करून अलंकार गोवले जातात. आणि हे सगळे बाईच्या रंग रूपाचे वर्णन आहे .इत्यादी गाण्याच्या ठेक्यावर झिम्मा रंगात येतो. अशी कितीतरी पारंपारिक गाणी आहेत ज्यांच्या अर्थामध्ये आपण खोल जाऊ तितकेच ते आपणास भावूक करतात.या गाण्यांचा अर्थ शोधत गेलो तर त्या काळच्या स्त्रीयांचे राहणीमान ,त्याचे जगणे, सुख-दुःख, सासर-माहेरचा अभिमान ,नात्यांचा आदर अशा कित्येक बाबींच्या तळाशी आपण जाऊ. आज आपणा स्त्रीयांना स्वातंत्र्य आहे ते पुर्वीच्या स्त्रीयांना नव्हते. अगदी काही दशकांपुर्वीचा विचार केला तर बाई ही घर आणि संसार याच साखळदंडात बांधलेली होती. मग जात्यावरच्या ओव्यांतुन म्हणा नाहीतर सणासुदीच्या या पारंपारिक गाण्यातून ती व्यक्त होत होती.
झिम्मा-फुगडी हा फक्त खेळ नाही तर तो एका पिढीने दुसर्या पिढीला दिलेला आपला सांस्कृतिक वारसा आहे. हा खेळ त्यामधील गाणी हे एकेकाळी बाईचे संपुर्ण जगणे आहे. आपण सगळ्याजणींनी हा सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि येणाऱ्या पिढीला देणे हे आपले कर्तव्य आहे. आपला हा सांस्कृतिक वारसा चिरकाल टिकून रहावा हेच मागणे मी गणरायाकडे मागते.
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈