सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

आईपण? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आई जाउन आता ४ वर्षे होऊन गेली. पण आईची आठवण झाली नाही असा एकही दिवस जात नाही. कधी कधी भाउक होऊन आईच्या आठवणीने कासाविस झाले तर बाकीचे म्हणतात, काय लहान असल्यासारखे करतेस? तुला स्विाकारायला हवं ना? मग अशाने जास्तच व्यथित व्हायला होते.

अशी अवस्था कितीतरी जणांची होत असेल. पण मग विचार करताना आई भोवती मन पिंगा घालू लागले. आई विषयीचे कितीतरी विचार डोक्यात येऊन गेले.

प्रत्येक ठिकाणी देवाला जाता येणे शक्य नसल्याने देवाने आई निर्माण केली.

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.

आईची किंमत जो करत नाही त्याला जगाशी लढण्याची हिंमत होत नाही.

तसेच आईचा महिमा सांगणार्‍या कितीतरी कविता आठवल्या

गदिमा, मभाचव्हाण, यशवंत अशा कितीतरी कविंसोबत अलिकडेच कवि अनिल दिक्षीत, उद्धव कानडे आदि कविंच्या भावपूर्ण कविता मन हेलावून टाकतात.

मग वाटले खरच जगात कुठेही गेले तरी आईला किती महत्व आहे ना? मुलांना जन्म देण्याचे सामर्थ्य एका आईतच असते. तसेच त्यांना वाढवणे संस्कार करणे हे काम जबाबदारी न वाटता फूल उमलते तसं, सकाळी दव पडते तसं,सहज नकळत करण्याचे कसब हे एका आईठायीच असते.

वात्सल्य, प्रेम, ममता तिच्या अंगी ठासून भरलेली असते. आणि मग आई ही कोणी व्यक्ती नसून वृत्ती आहे असे वाचल्याचे आठवले. ती एक वृत्ती म्हणजे भावना असल्याने  ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राची तर विठ्ठल हे जगत माऊली झाले. अनेक पुरुष संत हे गुरूमाऊली बनले.

म्हणजेच आईपण ही वृत्ती खूप अवघड असूनही ती वृत्ती जो धारण करू शकतो तो आई होऊ शकतो.

सगळ्यांच्या आवडी निवडी सांभाळणे, सगळ्यांवर सारखे प्रेम करणे,चुका पोटात घेणे, शी-शू मनात कोणतीही घृणा न ठेवता आनंदाने काढणे, मुलांना हृदयाशी धरणे, चांगल्या-वाईट गोष्टिंचे ज्ञान देऊन चांगल्या गोष्टी मनावर बिंबवणे, सतत काहीतरी मुलांसाठी करत रहाणे, स्वत्व विसरून फक्त देत रहाणे,जिच्या सान्निध्यात आल्यावर सुरक्षित वाटते , लढण्याचे बळ येते असा भक्कम आधार होणे, अशी लाखो कारणे देता येतील जी वरवर अगदी सामान्य वाटतील पण करायला गेले तर किती अवघड आहे हे समजते.

मग ज्या लेकरांची आई लवकर देवाघरी गेली त्या लेकरांना आई बापाचे प्रेम एकट्या पुरुषाने दिले अशी कितीतरी उदाहरणेही पहातो म्हणजेच तो पुरूष त्याच्या अंगी असलेले आईपण जागृत करून मुले घडवतो. किंवा मुलांसाठी दुसरी आई आणतो . पण अशावेळी ती आई सावत्र बनते. का? तिच्या अंगी आईपण नसते का? असते तिच्या अंगीही आईपण असतेच पण मनात कुठेतरी दुजाभाव असतो म्हणून स्वत: जन्माला घातलेल्या मुलांवर ती मुद्दाम अधिक प्रेम आदर देते. मग अशावेळी ती नवर्‍याच्या मुलाची आई होऊच शकत नाही कारण आईपण असणार्‍या व्याख्येला ती कुठेतरी छेद देत असते.

फार कशाला कैकयीने सावत्र पणा जागृत ठेऊन रामाला वनवासात पाठवले हे उदाहरण सगळ्यांना माहित आहेच.

तसेच कृष्णाचा सांभाळ करणारी यशोदा, कर्णाला वाढवणारी राधा या खर्‍या अर्थाने आई झाल्या अशी उदाहरणे पण सर्वश्रृत आहेतच की!!

मग आई, आईपण याचे मोठेपण शब्दातीत असल्याची जाणिव होते. प्रत्येक घरात एक आई असते. तुमची आमची सेम असते पण आमच्या आईसारखी दुसरी कोणीच नाही असे सारखे वाटत रहाते.

तरी देखील दुसर्‍यांच्या आईत आपली आई म्हणजे त्या आईतील आईपण जाणून तिच्या चरणीही नतमस्तक होते.

ज्ञानेश्वर विठ्ठल इतर गुरू माऊली यांच्यातील आईपणा पाहून प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणे त्यांनी किती प्रयत्नामधून हे आईपण आपल्या ठायी आणले असेल ते वाटून त्यांचा हेवा वाटतो .

स्वत: आई होऊनही काही गुण स्वभावत:च अंगी आले तरी आपल्या आईसारखे नाहीच जमत असे वाटून तिचे श्रेष्ठत्व मनातच जाणून तिच्यासारखे होण्याचा मन प्रयत्न करते.

असे मातृत्व अर्थात आईपण जर सगळ्यांच्या हृदयी आले तर?•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments