सुश्री विभावरी कुलकर्णी
🔅 विविधा 🔅
☆ आठवणींची घडी… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
घडी शब्द किती छोटासा. पण त्याच्या हिंदी व मराठी भाषेतील अर्थाच्या छटा मात्र विविध आहेत. या घडी शब्दाने माझ्या तर बऱ्याच आठवणी उलगडल्या. विशेषत: लहान पणीच्या घड्या जरा जास्तच मनात बसतात.
लहानपणी वेगवेगळ्या नातेवाईकांकडे जाऊन खूप आठवणी मनाच्या कप्प्यात जमा झाल्या आहेत. एक काका होते त्यांच्याकडे गेल्यावर भीतीच वाटायची.ते होते फार कडक शिस्तीचे. त्यांच्या घरात गेल्यावर चप्पल कुठे काढायची इथ पासून प्रश्न पडायचे. आपण चप्पल दारा बाहेर काढली तर ते म्हणणार हरवायची आहे का? घरात काढली की म्हणणार इथे काढतात का? काढून चप्पल स्टँड वर ठेवायची. स्टँड वर ठेवली की म्हणणार अशी ठेवतात का? मग ते स्वतःच्या हाताने नीट ठेवायचे. आणि माझ्या व त्यांच्या ठेवण्यात काय फरक आहे हेच मी शोधत रहायची. घरात गेले की कुठे बसावे हा प्रश्न! पूर्वी सोफे वगैरे नसायचे. लोखंडी कॉट किंवा लाकडी पलंग असायचा. त्यावर बसावे तर त्यांच्या बेडशीटची घडी विस्कटेल याची भीती. आपण बसल्यावर ते आपल्या शेजारचे बेडशीट नीट करायचे. वस्तू तर अगदी जागेवरच असाव्यात असे त्यांचे म्हणणे असायचे. आणि माझ्या डोक्यात खूप गोंधळ व्हायचा. वस्तूंनी आपली जागाच सोडली नाही तर आपण जेवणार कसे? स्वयंपाक कसा करणार? आमच्या कडे पण शिस्त असायची पण वेळ प्रसंगी वस्तू जागा पण सोडायच्या आणि हिंडून फिरून शेजारच्याही घरात जाऊन परत यायच्या. रात्री मात्र सगळ्या वस्तू,माणसे आपल्या जागी येऊन स्थानापन्न व्हायची.
असेच अजून एक घर की तिथे शिस्तीला पर्यायी शब्द बावळट असतो असा माझ्या बाल मनाचा समज झाला होता. अंथरुण काढणे, अंथरुण पांघरुण यांच्या विशिष्ट पद्धतीने घड्या घालणे हा एक सोहळा असायचा. आणि बावळट हे विशेषण ऐकून घेण्या पेक्षा तो सोहळा मी हनुवटीवर हात ठेवून अचंबित नजरेने व थक्क चेहेऱ्याने बघत रहाणे पसंत करायची. सगळ्या घड्या विशिष्ठ पद्धतीने घालून झाल्या की त्या त्यांच्या आकारमानाने एकावर एक बसायच्या आणि सर्वात वर सुंदर चादर घालून त्यावर फ्लॉवर पॉट ठेवला जायचा. आणि तो ठेवला गेला की मी टाळ्या वाजवून उड्या मारायची. मग त्या काकांच्या कडून कौतुक मिळायचे आणि ते म्हणायचे “माझ्या कामाचे कौतुक फक्त या बाळाला आहे.”
त्या फ्लॉवर पॉट खाली रात्रीची झोपायची सोय आहे हे सांगूनही खरे वाटायचे नाही.
हीच कथा पिण्याचे पाणी घेताना असायची.
आपण पाण्याच्या भांड्यात तांब्या ( हो तेव्हा पितळी तांबे असायचे.जग ग्लास ही मंडळी नंतर आली.) बुडवून खाली ठेवला की ठेवणाऱ्या माणसाचा बावळट म्हणून उद्धार व्हायचा. का तर तो खालून न पुसता ठेवल्याने फरशीवर पाण्याचा गोल उमटणार.तो गोल ज्याच्या हाताने उमटेल त्याला पुढचे जेवण कसे आणि किती गोड लागणार? हीच परिस्थिती झाडून काढताना. त्या वेळी लंबे झाडू ( कुंचे ) नवीनच प्रविष्ट झाले होते. मग आपल्या उंचीचा झाडू बघून मला तर मोठीच गंमत वाटायची. आणि त्या घरातील कर्ता पुरुष खाली बसून तो लांब कुंचा आडवा धरून त्याच्या निम्म्या भागात पकडून पुढच्या शेंड्याने कसे झाडावे याचे प्रात्यक्षिक दाखवायचा. आणि ज्याला ते जमणार नाही त्याला बावळट ऐकावे लागायचे. नंतर त्यांचीच माझ्या वयाची मुलगी म्हणायची, “तुम्हीच खूप छान झाडता तर तुम्हीच झाडून घ्या.”
या शिस्तीच्या घडीच्या छोट्या छोट्या आठवणी आहेत. अजून कपाट तर आवरायचेच राहिले आहे. ते नंतर असेच कधीतरी आवरु.
अतिशिस्त आणि बेशिस्त यांच्यातील सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. गोष्टी व्यवस्थित करता येणे आवश्यकच मात्र अति सर्वत्र वर्ज्यते हे लक्षात ठेवले पाहिजे.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.
सांगवी, पुणे
📱 – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈