सुश्री विभावरी कुलकर्णी
🔅 विविधा 🔅
☆ आपल्यातील क्षमता… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
हे आपल्याशी निगडित आहे. आपल्या मनाची ताकद खूप मोठी आहे हे आपण खूप वेळा ऐकतो. आता ती मिळवायची कशी? वाढवायची कशी?
हे बघू या.
एक असा सिद्धांत आहे, सृष्टीची निर्मिती झाली त्या वेळी ऊर्जा भरपूर होती. पण त्याला ठराविक आकार नव्हता. ज्यावेळी एकेक जीव निर्माण होऊ लागला त्यावेळी त्या ऊर्जेला आकार मिळाला.
ही ऊर्जाच प्रत्येकाला जिवंत ठेवते. आपण म्हणतो विज्ञान खूप प्रगत आहे. पण सगळ्याच गोष्टी त्यातून निर्माण होत नाहीत. जसे रक्त हे द्यावेच लागते. अशा काही गोष्टी शरीरच निर्माण करु शकते. एकच ऊर्जा प्रत्येकाला जिवंत ठेवते. हाच मोठा चमत्कार आहे. याला आपण विविध नावाने ओळखतो. देव, निसर्ग शक्ती, दैवी शक्ती, वैश्विक शक्ती या पैकी कोणतेही नाव देतो. या शक्ती मध्ये अफाट ताकद असते. याच ऊर्जेचा आपण एक अंश आहोत. जसे आपण घरात विविध उपकरणे वापरतो. फॅन,ट्यूब,मिक्सर पण या उपकरणांना एकच शक्ती चालवते ती म्हणजे वीज. याच प्रमाणे आपल्या सर्वांना एकच ऊर्जा चालवत असते.
ज्यावेळी आपण जन्माला येतो त्यावेळी त्या ऊर्जेच्या जवळ असतो.
याचा अनुभव आपण लहान मुलांमध्ये घेतो. पण आपण जसे मोठे होतो तसे विविध अनुभव, विकार, अहंकार या मुळे या ऊर्जे पासून दूर जातो. आपल्याला सर्वांनी ओळखावे, आपण सगळ्यात उठून दिसावे असे वाटते. त्या साठी खूप धडपड करतो. या मुळे त्या ऊर्जे पासून अधिकच दूर जातो. कारण माझे अस्तित्व नष्ट होईल की काय अशी भीती असते. मग त्यातून केविलवाणी धडपड सुरु होते. कधीकधी ती हास्यास्पद होते. हे का होते तर आपण व ही ऊर्जा यात अंतर पडते व स्वतःला सिद्ध करण्यातून ते अंतर वाढतच जाते.
आणि मनाला त्रास होतो. हे अंतर कमी झाले तरच ती ऊर्जा वाढते व कार्यक्षम होते. या साठी स्वतःचे निरिक्षण, परीक्षण करणे व स्वतःची क्षमता वाढवणे आवश्यक असते. या साठी आपण स्वतः बरोबर राहणे आवश्यक असते. या साठी सर्वात उत्तम उपाय मौन आहे. मौनात सुरुवातीला अनेक विचारांचे जणू युद्धच होते. पण हळूहळू ते शांत होते. आणि या शांत मनात जे सकारात्मक ऊर्जेचे तरंग उठतात ते जग व्यापून टाकतात. म्हणजेच आतील व बाहेरील ऊर्जा यातील अंतर कमी होऊ लागते.
हे अंतर कमी होणे या साठी मन शांत होणे आवश्यक असते. त्या साठी पुढील गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.
१) दोन वेळा मेडिटेशन करणे
स्वतः बरोबर राहण्यासाठी विचारांना शांत करावे लागते त्या साठी मेडिटेशन आवश्यक आहे. सलग ४० दिवस रोज दोन वेळा मेडिटेशन केले तर मानसिक ताकद प्रचंड वाढते. आपल्या समस्या दूर होतात. आपल्याला सूचना ( इंट्युशन ) मिळतात. आपण निरोगी होतो.
२) निसर्गात जाऊन निसर्गाची प्रशंसा करणे. निसर्ग चमत्कार लक्षात घेणे.
आपण बऱ्याच गोष्टी जन्मापासून बघत असतो. जसे वारा, पाऊस, फुले, ऊन, सुगंध पण त्या कडे फार लक्ष देत नाही. हे सगळे जागरूकतेने बघावे. त्याचे कौतुक करावे. गवतावर चालावे, झाडाला मिठी मारावी, झऱ्यात नदीत वाहत असलेल्या पाण्यात पाय सोडावेत. ऊन अंगावर घ्यावे. वारा भरून घ्यावा. निसर्गाशी एकरूप व्हावे. यातून आपल्याला निसर्गशक्ती मिळते.
३) आज किमान तास कोणा विषयी पूर्वग्रह ठेवणार नाही.
आपण आपले अनुभव, इतरांनी केलेली वर्तणूक, देवाण घेवाण अशा अनेक कारणांनी प्रत्येकाला एक किंवा अनेक लेबल्स लावून टाकतो. त्या मुळे कोणतीही व्यक्ती, वस्तू, प्राणी किंवा कोणीही समोर आले तरी प्रथम आपण लावलेले लेबल समोर येते. हेच आपल्याला दूर ठेवायचे आहे. सर्वांकडे नवीन दृष्टीने बघायचे. भूतकाळ, त्यातील घटना, भूतकाळात घडलेले विसरून जायचे. आणि पुढे काय होईल या विचारला दूर ठेवायचे. जितके जास्त विचार तितक्या जास्त अडचणी. म्हणून सगळ्यांकडे त्रयस्थपणे बघायचे व वागायचे.
वरील तीन गोष्टींचा अवलंब करुन आपण आपल्यातील क्षमता वाढवू शकतो.
तर मग आपल्यातील क्षमता वाढवू या.
धन्यवाद!
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.
सांगवी, पुणे
📱 – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈