सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ आठवणी जागृत करणाऱ्या गोष्टी – पत्र ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
कालच एक पत्र वाचले. म्हणजे चक्क मिळाले. मेसेज करण्याच्या काळात पत्र वाचून मी पण थक्क झाले. आणि आनंद देणारा आश्चर्य वाटणारा एक सुखद धक्का बसला. ज्येष्ठ व आदरणीय लेखकांची पुस्तके व त्या बरोबर त्यांचे स्व हस्ताक्षरातील पत्र मिळाले. पत्र कसे लिहावे व कसे असावे याचा उत्तम आदर्श नमुना वाचायला मिळाला. आणि खूप वर्षे मन भूतकाळात गेले.
पूर्वी संपर्कासाठी मुख्यत्वे तेच साधन असायचे. आणि कोणते पत्र आहे त्या वरून त्याचे महत्व लक्षात यायचे. म्हणजे साधे पत्र ( ज्यावर मजकूर थोडक्यात व पत्ता लिहायला जागा असायची. ) आम्ही त्याला १० पैशाचे किंवा खाकी पत्र म्हणत असू. ते उघडे असल्याने कोणीही वाचू शकत असे. त्यावर साधारण नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल असायचा. त्याची निकालाच्या आधीच्या दिवशी वाट न बघितली जायची. म्हणजे माझ्या घरात नको यायला असे वाटायचे. वाड्यात किंवा आपल्या भागात पोस्टमन दिसला की पोटात भीतीचा गोळा यायचा आणि पुढचा प्रसाद ( मार ) डोळ्या समोर यायचा. तो पोस्टमन घरासमोरून जायला लागला की हृदय बाहेर पडते की काय असेच वाटायचे. थोडक्यात पण महत्वाचे असे त्यावर लिहिले जायचे. कोणी गावाहून पत्र लिहायचे. ४ वाजता सुखरूप पोहोचलो. काळजी नसावी. वर सुरुवातीला ती. बाबा/आई यांना सादर प्रणाम. व शेवटी आपला आज्ञाधारक असा मजकूर असायचा . आणि काहीही मायना नसलेले पत्र दिसले की निरक्षरांना पण कळायचे, की वाईट बातमी आहे. त्यात फक्त एकच ओळ असायची —- व्यक्तीला देवाज्ञा झाली. आणि तेच पत्र फाडले जायचे.
दुसरा प्रकार होता निळ्या रंगाचे आंतरदेशीय पत्र. त्यात तीन पाने लिहायला मिळायची. आणि कडा दुमडून ते सिल करता यायचे. म्हणजे आपला मजकूर सुरक्षित. सहज वाचता यायचा नाही. तसे पत्र गोल करून,बाजूची दुमड काढून वाचता यायचे किंवा उघडून परत सफाईने चिकटवता यायचे. हे उद्योग पण बालपणात शिकले होते. अर्थात त्या साठी प्रसाद पण खाल्ला आहे. पण काही संभाव्य धोक्या पासून वाचवले पण आहे.
अजून सर्वात सुरक्षित प्रकार म्हणजे फिकट खाकी पाकीट ( आम्ही त्याला पिवळे पाकीट म्हणत असू ) असायचे. त्यात मात्र आपलेच कागद लिहून ते एकदम पक्के चिकटवून पाठवता यायचे. त्यात खाजगी सुरक्षितता जास्त होती. आणि असे आपले स्वतंत्र रंगाचे, नक्षीचे पाकीट पाठवता यायचे. फक्त त्याला पोस्टाचे तिकीट लावावे लागायचे. आणि हो, त्यात सुगंधी मजकूर पण पाठवता यायचा. आमच्या घरी जेव्हा असे सुगंधी पाकीट आले होते,त्यावेळी आपल्या ताईची पसंती आली हो… असे ओरडतच पोस्टमन सगळ्यांना समजेल अशी दवंडी देत आला होता. आणि आईला म्हणाला होता. पत्र देतो पण आधी गोड बातमी साठी फक्कड चहा पाहिजे. मग आई गॅस कडे,वडील पत्राकडे आणि छोटी बहीण डोळे विस्फारून आणि वाड्यातील मंडळी कान टवकारून तयारीत होते. मी कोणत्या कोपऱ्यात होते ते मलाही आठवत नाही. पण पाकीट, आतले कागद याचा सुगंध मात्र अजून आठवतो आहे.
मुख्यत्वे सामान्य लोकांना हे तीन प्रकार परिचित असायचे. बाकीचे रजिस्टर,VP असायचे पण ते फार क्वचित दिसायचे. ही पत्रे पण फार निगुतीने सांभाळली जायची. एक वरच्या बाजूस हुक व खाली कॅरमच्या सोंगटीसारखी सोंगटी असायची. आणि येणारे टपाल दर ८/१५ दिवसांनी तारखेप्रमाणे लावली जायची. अर्थात त्यात बिले,पावत्या पण असायच्या. ती तार वरच्या हुक पर्यंत भरली की त्याचे गठ्ठे करून सुतळीने बांधून ठेवले जायचे. हे काम मला फार आवडायचे. ते सगळे लावताना त्याचे पुन्हा वाचन व्हायचे. अजूनही काही पत्रे जपून ठेवली आहेत. आणि अधून मधून ती काढून वाचून,झटकून,पुसून त्या बॅगेत कापूर घालून ठेवली जातात.
अशी पत्रे म्हणजे मला एक सुगंधी कुपी वाटते. कडू,गोड आठवणी असतात. आणि त्या वेळचे प्रसंग जिवंत करण्याची त्यात ताकद असते. काही भूतकाळातील वेडेपण,काही शिकवणी,काही उपदेश असे बरेच काही असते. शिवाय त्या व्यक्तीचे हस्ताक्षर असते. त्यातून पण खूप शिकायला मिळते.
तर आज रमेशचंद्र दादांच्या पत्रामुळे हे सगळे लिहिले गेले. याचे सर्व श्रेय त्यांना व त्यांच्या पत्राला आहे.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈