प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

☆ आत्मा ‘रमण’… ☆ प्रा. भरत खैरकर 

‘मौन म्हणजे काय?’ विचारल्यावर रमण महर्षींनी चूप राहणे म्हणजे मौन नाही तर तेच अनंत असं प्रकटीकरण आहे, असे सांगितले. वाणी आणि कुठलाही संकल्प नसलेली अवस्था म्हणजे मौन आहे! ते साधण्यासाठी कुठलीतरी धारणा मनात घेऊन त्याचं मूळ शोधलं पाहिजे. अशा एकाग्रतेनेच मौन प्राप्त होईल हे अभ्यासाने शक्य आहे. कोणतीही मानसिक क्रिया न करता केलेली साधना म्हणजे मौन आहे. मनाला वश करणे हेच खरं मौन आहे.

ज्यावेळी स्त्रिया डोक्यावर घागर घेऊन इतर बायकांशी बोलत असतात.. चालत असतात. तेव्हा त्यांचं लक्ष डोक्यावरच्या घागरीतल्या पाण्यावरच असतं त्या केवळ बोलत असतात. अशाच प्रकारे जेव्हा एखादा ज्ञानी पुरुष समाजात वावरत असतो. तेव्हा त्याच्या साधनेत कुठलाही प्रकारची बाधा तो येऊ देत नाही. कारण त्याचं मन हे त्या घागरी सारखं ब्रह्मात स्थिर असतं.

माणसाचा स्थायीभाव हा शांती आहे. पण मन मात्र त्यामध्ये बाधा आणत असल्याने तो अशांत बनतो. त्यामुळेच मौन साधल्याने आपोआपच शांतीकडे प्रवास सुरू होतो.

मनाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यावर आपणास लक्षात येईल की ते लपून बसते ते दिसतच नाही. आत्ता इथे तर थोड्यावेळात दुसरीकडे!असं ते लपाछपी खेळतय. मात्र मन दुसरं तिसरं काही नसून विचारांची सरमिसळ आहे. आपल्या विचारात संकल्पाची निर्मिती झाल्यामुळे आपण त्याच्या निवारणासाठी, पूर्तीसाठी पुन्हा विचार करू लागतो. ह्या स्थितीला.. प्रक्रियेला आपण मन ह्या संज्ञेने संबोधतो.

विचार आणि विवेक जोडणारी गोष्ट म्हणजे बुद्धी होय. अहंभाव, मन, बुद्धी ह्या सगळ्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. आपण ज्याला वस्तुतः आत्मा मानतो ते वास्तविक पाहता अहंभाव, मन किंवा बुद्धी ह्यापैकीच कुणाची तरी कल्पना असते. कोणत्याही संकल्पनेचा उदय हा ‘मी’ पणातूनच होतो. त्या मीपर्यंत पोहोचणे कठीण काम आहे कारण तो सतत असणारच आहे तो नष्ट होणे शक्य नाही. ‘दृष्टीम ज्ञानमयी कृत्वाम. ‘ आपल्या दृष्टीला ज्ञानमय करणे म्हणजे सगळीकडे समत्व आणि ब्रह्मत्व दिसेल. मात्र आपला दृष्टिकोन बाह्य झाल्याने बाहेरच्या वस्तूंवर टिकून असल्याने आपल्याला हे सगळं लक्षात येत नाही. पण दृष्टीला अंतर्मुख केल्याने.. आत अजून डोकावून बघितल्याने आपण केवळ आणि केवळ आत्मा आहो हे लक्षात येईल.

चोर जसा स्वतःलाच शोधून देणार नाही. तसं मनही शोधायला गेल्यावर ते स्वतःला शोधून घेणार नाही. नजरेसही पडणार नाही. कारण ते खोटं आहे. खोट्याचा शोध घेतला तर तो लागणारच नाही कारण ते आहेच नाही. तो एक भास असतो आपली तशी मान्यता असते. ह्यामुळे खरं असलेलं आत्मतत्त्व आपण हरवून बसलो आहे. म्हणून आत्म्याचा शोध घ्या.. मनावर राज्य करण्याचा तोच एक उपाय आहे. आणि तेच सत्य आहे.

आपण कागदावर लिहिलेले अक्षर वाचतो.. मात्र हे करत असताना केवळ अक्षरांवर आपले लक्ष असते त्याला आधार देणाऱ्या कागदावर नाही.. अगदी तसंच आपलं झालेला आहे.. आत्म्यावर असलेल्या मन आणि अहंभाव ह्यालाच आपण महत्त्व देत आहोत त्याला आधार देणाऱ्या आत्म्यावर कुणाचेही लक्ष नाही. ह्या दोष कुणाचा आहे ?आपलाच! जसं की एखाद्या कॅनव्हास वर चित्रकार अलग अलग चित्रे रेखाटतो देखावे काढतो. अगदी तसंच आपणही आपल्या मनपटलावर अनेक अनेक स्वप्निल चित्रे रंगवत असतो. ती नाहीशी होणारी असतात मात्र त्या मनपटलाला आधार देणारा.. पृष्ठभूमी देणारा कॅनव्हास.. आत्मा आपण विसरून जातो. आपण आत्म विचारात सलग्न असलं पाहिजे. तेव्हाच लोक विचार आपोआप निघून जाईल. अनात्म निघून जाईल. हाच खरा आत्मविचार आहे. आत्मा ह्या शब्दातच देह, मन, मनुष्य, व्यक्ती, परमात्मा, इत्यादी चा समावेश असल्याचे लक्षात येईल.

आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भविष्याच्या चिंतेबद्दल.. संशयाबद्दल विचार करणाऱ्याला पकडल्यावर लक्षात येईल की आत्म्यामध्ये स्थिर नसल्याने आपण क्षुब्ध होत आहोत.. भुकेजलेलो आहोत. जगातल्या चिंता आणि समस्यांनी आपण ग्रासलेलो आहोत. हे केवळ आत्म्यापासून दूर गेल्याने होते. म्हणून जर तुम्ही आत्म्याशी दृढतेने टिकून राहिला.. जुळून राहिला तर सर्व समस्या नाहीशा होऊन जातील लुप्त होतील. अशाने मन हळूहळू त्याच्या सर्व मागण्या सोडून देईल आणि तुम्ही आत्म्यामध्ये शांतीने जगू शकाल राहू शकाल.

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments