श्री उद्धव भयवाळ
विविधा
☆ आईचे महात्म्य… ☆ श्री उद्धव भयवाळ ☆
जगातील प्रत्येक धर्म आईचा अपार महिमा सांगतो. प्रत्येक धर्मात आणि संस्कृतीत ‘ आई’च्या अलौकिक गुणांचे आणि रूपांचे विलक्षण वर्णन आहे. आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. मराठी साहित्यात आईचे मोठेपण वर्णन करणाऱ्या साहित्यकृतींमध्ये ‘श्यामची आई’ ही सर्वश्रेष्ठ आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. सानेगुरुजींच्या सिद्धहस्त सृजनशील लेखणीतून साकारलेली ही साहित्यकृती रसिकवाचकांना अतिशय उत्कटतेने मातृमहिमा सांगून मंत्रमुग्ध करते
‘आई’ हा तो अलौकिक शब्द आहे, ज्याच्या नुसत्या स्मरणाने हृदय फुलून जाते, भावनांचा अंतहीन सागर हृदयात आपोआप साठवला जातो आणि मन आठवणींच्या समुद्रात बुडून जाते. ‘आई’ हा अगम्य मंत्र आहे, ज्याच्या केवळ पठणाने प्रत्येक वेदना नष्ट होतात. आई’चे प्रेम शब्दात वर्णन करता येत नाही, ते फक्त अनुभवता येते. बाळाला नऊ महिने पोटात ठेवणे, प्रसूती वेदना सहन करणे, स्तनपान करणे, बाळासाठी रात्रभर जागे राहणे, त्याच्याशी गोड गोड बोलणे, त्याच्यासोबत खेळणे, बोट धरून चालायला शिकवणे, प्रेमाने फटकारणे, त्याला सुसंस्कारित करणे, सर्वात मोठ्या आव्हानाला धैर्याने सामोरे जाणे या सगळ्या गोष्टी फक्त आईच करू शकते.
आपले वेद, पुराणे, तत्वज्ञान, स्मृती, महाकाव्ये, उपनिषदे इत्यादी सर्वच ‘आई’ च्या अगाध महात्म्याने आणि स्तुतीने परिपूर्ण आहेत. अनेक ऋषी, तपस्वी, पंडित, महात्मे, विद्वान, तत्त्वज्ञ, साहित्यिक या सर्वांनी आईविषयी निर्माण होणाऱ्या भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. इतकं सगळं असूनही ‘आई’ या शब्दाची संपूर्ण व्याख्या आणि त्याचा असीम महिमा आजपर्यंत कोणीही शब्दात मांडू शकलेलं नाही.
आपल्या भारत देशात आई हे ‘शक्ती’चे रूप मानले जाते आणि वेदांमध्येसुद्धा आई ही प्रथम पूजनीय आहे, असे म्हटले आहे.
पुढील श्लोकातही प्रमुख देवतेला प्रथम ‘ माता’ असे संबोधले आहे.
त्वमेव माताच, पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या, द्रविणम् त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव।
ऋग्वेदात मातेचा महिमा अशाप्रकारे सांगितला आहे की, ‘ हे उषेसारख्या जीवाची माता! महान मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. तुम्ही आम्हाला कायद्याचे पालन करणारे बनवा. आम्हाला कीर्ती आणि अथांग ऐश्वर्य द्या. ‘
सामवेदात एक प्रेरणादायी मंत्र सापडतो, ज्याचा अर्थ आहे, ‘हे जिज्ञासू पुत्रा! आईच्या आज्ञेचे पालन करा. तुमच्या गैरवर्तनाने आईला त्रास देऊ नका. आईला जवळ ठेवा. मन शुद्ध करून आचाराचा दिवा लावा.
प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक औषधांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांची तुलना मातेशी करण्यात आलेली आहे. एका प्राचीन ग्रंथात, अमलाला ‘ शिव ‘ (कल्याणकारी), ‘ वैस्थ ‘ (राज्याचे रक्षणकर्ता) आणि ‘ धात्री ‘ (मातेप्रमाणे संरक्षक) म्हटले आहे. राजा बल्लभ निघंटू यांनीही ‘ हरितकी’ (हरडा) च्या गुणांची तुलना एके ठिकाणी आईशी केली आहे.
यस्य माता गृहे नास्ति, तस्य माता हरितकी ।
म्हणजे ज्या घरात आई नसते त्याठिकाणी हरितकी (हरडा) मानवाला त्याच्या आईसमान हितकारक असते.
श्रीमद् भागवत पुराणात नमूद केले आहे की, मातेच्या सेवेतून मिळालेले वरदान, सात जन्मांचे दु:ख आणि पाप दूर करते आणि तिची भावनिक शक्ती मुलांसाठी संरक्षणाची ढाल म्हणून काम करते. यासोबतच श्रीमद् भागवतात ‘आई ’ ही मुलाची पहिली गुरू आहे, असे सांगितले आहे.
रामायणात श्रीराम आई’ला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ मानतात. ते म्हणतात-
‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गदपि गरियसी ।’,
(म्हणजे आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेत.)
महाभारतात यक्ष धर्मराजा युधिष्ठिराला विचारतो, ‘जमिनीपेक्षा भारी कोण? ‘ तेव्हा युधिष्ठिर उत्तरतो- ‘माता गुरुतरा भूमे:’ म्हणजे, ‘आई या भूमीपेक्षा खूप भारी आहे. ‘
महाभारताच्या अनुशासन पर्वात पितामह भीष्म म्हणतात, ‘भूमीसारखे दान नाही, मातेसारखा गुरू नाही, सत्यासारखा धर्म नाही आणि दानासारखे पुण्य नाही. यासोबतच महाभारत महाकाव्याचे लेखक महर्षी वेद व्यास यांनी आई बद्दल लिहिले आहे-
‘नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः।
नास्ति मातृसमं त्राण, नास्ति मातृसमा प्रिया।।’
(म्हणजे आईसारखी सावली नाही, आईसारखा आधार नाही. आईसारखा रक्षक नाही आणि आईसारखी प्रिय वस्तू नाही.)
तैत्तिरीय उपनिषदात ‘ आई ‘ बद्दल पुढीलप्रमाणे उल्लेख आहे-
‘मातृ देवो भवः।’
(अर्थात, आई देवासमान आहे.)
‘आई’च्या चरणी स्वर्ग आहे, असे संतांचेही स्पष्ट मत आहे. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी ‘सतपथ ब्राह्मण’ या स्तोत्राचा त्यांच्या ‘ सत्यार्थ प्रकाश’ या ग्रंथाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पुढीलप्रमाणे उल्लेख केला आहे-
अथ शिक्षण प्रक्रिया:
मातृमान् पितृमान आचार्यवान् पुरुषो वेद:
(म्हणजेच, जेव्हा तीन उत्तम शिक्षक असतील, म्हणजे एक आई, दुसरा पिता आणि तिसरा शिक्षक, तेव्हाच माणूस ज्ञानी होईल.)
‘चाणक्य नीती’मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘ मातेसारखी कोणतीही देवता नाही. आई ही सर्वोच्च देवी आहे. ‘
मराठी वाड्मयामध्येसुद्धा माधव ज्युलियन, भास्कर दामोदर पाळंदे, कवी यशवंत आणि अलीकडील काळातील फ. मुं. शिंदे या आणि इतर कवींनी आपल्या कवितांमधून आईची महती सांगितली आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतही आईवर आधारित अनेक चित्रपट आणि गाणी बनवली गेली आहेत. अनेक गाणी इतकी हृदयस्पर्शी झाली आहेत की, ती ऐकून माणूस पूर्णपणे भारावून जातो.
हिंदू धर्मात देवींना ‘माता’ असे संबोधले जाते. धार्मिक परंपरेनुसार, संपत्तीची देवी ‘ लक्ष्मी माँ’, विद्येची देवी ‘सरस्वती मां’ आणि शक्तीची देवी ‘ दुर्गा माँ’ आहे. नवरात्रात आईची नऊ वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते.
ख्रिश्चन धर्मातही आईला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. ख्रिश्चनांच्या पवित्र ग्रंथात स्पष्टपणे लिहिले आहे की, आईशिवाय जीवन नाही. यासोबतच प्रभु येशूची आई मदर मेरी हिला सर्वोच्च मानले जाते. बौद्ध धर्मात, महात्मा बुद्धांच्या स्त्री रूपातील तारा देवीची स्तुती केली गेली आहे. ज्यू लोकही ‘ आई’ला सर्वोच्च स्थानी ठेवतात
थोडक्यात, देश कोणताही असो, संस्कृती किंवा सभ्यता कोणतीही असो आणि भाषा, बोली कोणतीही असो’ मातेबद्दल अतूट आणि अपार आदर आहे.
****
© श्री उद्धव भयवाळ
संपर्क – १९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, छत्रपती संभाजीनगर -४३१००९
मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९ इमेल: ukbhaiwal@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈