श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – सुंदरता आणि कुरूपता… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

(रंगसोहळा या पुस्तकातून साभार घेतलेला लेख)

बालकवी म्हणतात

सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे
चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे.

परवा श्रीकृष्ण मालिका पाहत असतानाचा एक प्रसंग आठवला. कंसाच्या आमंत्रणावरून श्रीकृष्ण मथुरा नगरीत येतो. मथुरेत फेरफटका करीत असताना, श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या दृष्टीस एक कुबड असलेली आणि त्यामुळे अत्यंत वाकून चाललेली स्त्री दृष्टीस पडते. ती कंसासाठी तयार केलेला एक सुगंधी लेप घेऊन जात असते. श्रीकृष्ण तिला थांबवून म्हणतो, ‘ हे सुंदरी, तुझ्याजवळ सुगंधी अशी कोणती वस्तू आहे आणि तू ती घेऊन कुठे जात आहेस ? ‘ तेव्हा ती म्हणते, ‘ मी कुब्जा आहे. मी कुरूप असल्यामुळे सगळे लोक मला कुब्जा म्हणतात. एक वेळ मला कुब्जा म्हटले असतेस, तर चालले असते. पण तू मला सुंदरी म्हणून माझा उपहास केला आहेस. त्यामुळे मी व्यथित झाले आहे. ” त्यावेळेस श्रीकुष्ण तिला जे सांगतो, ते मला खूप आवडले. तो म्हणतो, ‘ कुरूपता ही शरीराची असू शकते. पण तुझ्याजवळ मनाचे सौंदर्य आहे. आत्म्याचे सौंदर्य आहे. म्हणूनच मी तुला सुंदरी असे म्हटले. ‘

आपण सर्वसामान्य माणसे. वरवरचे सौंदर्य पाहण्याची सवय आपल्याला लागलेली असते. पण वरवर दिसणाऱ्या सौंदर्यापलीकडे किंवा कुरुपतेपलीकडे सुद्धा सौंदर्य असू शकते, याचा अंदाज आपल्याला येत नाही. कधी कधी मला असे वाटते की सौंदर्य आणि कुरूपता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या सापेक्ष गोष्टी आहेत. असं म्हणतात की वस्तूत, व्यक्तीत सौंदर्य नसते. सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असते. जी गोष्ट एखाद्या व्यक्तीला सुंदर वाटेल, तीच गोष्ट दुसऱ्याला तितकी आकर्षक वाटणार नाही. एखाद्या व्यक्तीला अगदी साधारण वाटणाऱ्या गोष्टीतही सौंदर्याचा साक्षात्कार होतो. गवतफुलासारखी सामान्य गोष्ट. पण एखाद्या कवीला त्यातही सौंदर्य दिसते आणि तो सहज म्हणून जातो

रंगरंगुल्या, सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे सांग लागला, सांग तुझा रे तुझा लळा.

कुरुपतेतूनही सौंदर्य जन्म घेते. काट्यांवर गुलाब फुलतात. चिखलात कमळ उगवते. ओबडधोबड अशा दगडातून सुंदर मूर्ती तयार होते. सुंदर घरांची निर्मिती होते. आंतरिक ओढ कशाची आहे ते महत्वाचे. कमळाला आतूनच फुलण्याची ओढ असते. काट्यांवर असला तरी खेद न मानता गुलाबाला फुलायचे असते. आणि ज्याला फुलायचे असते, आपले सौंदर्य जगापुढे आणायचे असते, त्याला कोणी रोखू शकत नाही. कारण ती तुमची आंतरिक ओढ असते. मग परिस्थिती कशीही असो. चिखल असो वा काटे. चिखलात फुलणारे कमळ , काट्यांवर फुलणारा गुलाब जणू आपल्याला संदेश देतात, की बघ, मी कसा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा पूर्णांशाने फ़ुललो आहे. माझे सौंदर्य जराही कमी होऊ दिले नाही. ओबडधोबड दगडातून सुंदर मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारात सुद्धा अंतरात सौंदर्याची ओढ असते. म्हणूनच अशी सुंदर कलाकृती जन्म घेते.

फुलपाखरांचा जन्म कसा होतो माहितीये ? कुरूप अशा दिसणाऱ्या अळ्यांमधून फुलपाखरे जन्म घेतात. इतक्या कुरूप अळ्यांमधून इतकी सुंदर मन मोहून टाकणारी फुलपाखरे जन्माची हा निसर्गाचा एक चमत्कारच नाही का ?

मग त्यांना जन्म देणाऱ्या अळ्यांना कुरूप तरी कसे म्हणावे ? आकाशात दिसणारे पांढरे मेघ छान दिसतात. पण त्यांचा काहीच उपयोग नसतो. काळे ढग कदाचित दिसायला सुंदर नसतील, पण आपल्या जलवर्षावाने ते अवघ्या सृष्टीला नवसंजीवनी देतात, म्हणून त्यांचे बाह्य रूप न विचारात घेता, आंतरिक सौंदर्य विचारात घ्यायला हवे. जे सौंदर्य इतरांना आनंद देते, इतरांच्या उपयोगी पडते, ते खरे सौंदर्य. इतरांसाठी जे स्वतःचं सर्वस्व झोकून देऊन काम करतात, त्यांच्या कार्याचा कीर्तिसुंगंध आपोआपच पसरतो. नुसते सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असणे महत्वाचे आहे. ही सुंदरता विचारांची आहे. कृतीची आहे.

आपल्या देवादिकांचे फोटो पाहिले तर त्यांच्या पाठीमागे एक तेजोवलय आपल्याला दिसते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज, एक प्रकारची आभा दिसते. ते जे सौंदर्य आहे ते सत्याचे प्रतीक आहे. तेच शिव आहे आणि तेच सुंदर आहे. इंग्रजी कवी किट्स म्हणतो, ‘ Truth is beauty and beauty is truth.’ त्याचा अर्थ हाच आहे. आणि त्याचे आणखी एक वाक्य प्रसिद्ध आहे ‘ A thing of beauty is joy forever.’ जी गोष्ट सुंदर असते, ती नेहमीच आनंद देते. कृत्रिम सौंदर्य फार काळ आनंद देऊ शकत नाही. सौंदर्य प्रसाधने, पोशाख इ च्या साहाय्याने आपण आपले सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतो. पण जी गोष्ट मुळचीच सुंदर असते, तिला दिखाव्याची गरज असत नाही. चेहऱ्यावरचे निर्मळ आणि नैसर्गिक हास्य, आपले काम करताना भाळावर येणारे घामाचे मोती या गोष्टी सुंदरच दिसतात. आपले आरोग्य चांगले असेल, विचार चांगले असतील आणि मन प्रसन्न असेल, तर सौंदर्य तुमच्या व्यक्तिमत्त्वातून आपोआपच प्रकट होईल. त्यासाठी मेकअप किंवा दिखाव्याची गरज भासणार नाही.

‘ एका तळ्यात होती बदके पिले सुरेख …’ हे गाणं आपल्या सगळ्यांना माहिती असेल. त्या तळ्यात बदकांसमवेत एक राजहंस वाढत असतो. त्याला आपल्या सौंदर्याची जाणीव नसते. बदकांची पिले तो वेगळा असल्याने त्याला कुरूप समजतात. म्हणून तोही दुःखी असतो. पण एके दिवशी त्याला उमजते की आपण बदक नसून राजहंस आहोत, तेव्हा त्याचे भय, वेड सगळे पळून जाते. कारण त्याने त्याच्यातील ‘ स्व ‘ ला ओळखले असते. असाच आपल्या प्रत्येकामध्ये सुद्धा राजहंस दडलेला असतो. फक्त आपल्याला त्याला ओळखता आले पाहिजे, जागे करता आले पाहिजे.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments