श्री अरविंद लिमये
विविधा
☆ उमज पडेल तर…! ☆ श्री अरविंद लिमये ☆
‘तुमची सतत सोबत करणारा तुमचा खरा साथीदार कोण?’ असा प्रश्न आपल्याला कुणी विचारला तर आपण कांही क्षण गोंधळून जाऊ. प्रश्न ऐकताच मनात निर्माण झालेल्या संभाव्य उत्तरांपैकी आई, बाबा, भाऊ, बहीण, पत्नी, मुलं, मित्र यापैकी कुणाचे नाव घ्यावे हा संभ्रम आपल्याला गोंधळात टाकेल.पण ‘खऱ्या अर्थाने आपला साथीदार म्हणावं असं यापैकी कुणीच असू शकत नाही’ हा विचार मात्र या वैचारिक गोंधळात आपल्या मनातही येणार नाही. कारण खऱ्या अर्थाने साथीदाराची भूमिका निभावणाऱ्यांचं योगदान आपल्या खिजगणतीतही नसतं!
आपल्या पहिल्या श्वासापासून अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देणारं, आपली सोबत करणारं, एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात असं कुणी असेल तर ते म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन !!
जन्मतः हातीपायी धड शरीर आणि आपलं जगणं सजग करणारं मन दोन्हीही सक्षम,निरोगी,स्वयंपूर्ण राखण्याची जबाबदारी अर्थातच आपलीच असते. मात्र ही जबाबदारी जाणीवपूर्वक पार पाडणारे अपवादात्मकच असतात एवढं खरं. पूर्णतः स्वावलंबी असण्यासाठी निरोगी शरीर आणि खंबीर मन या अत्यावश्यक गोष्टी,पण स्वावलंबी असण्यातलं सुख परावलंबित्व येतं तेव्हाच समजतं याचं काय करायचं?
खरंतर माणसाला विनामूल्य, अगदी सहज जे उपलब्ध होतं त्याची किंमतच नसते याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपलं शरीर आणि मनच! या दोन्हींची सक्षमता जगणं आनंदी करण्यासाठीची आपली मूलभूत गरज आहे याची आपल्याला जाणीवच नसते आणि ती होते तेव्हा बराच उशीर झालेला असतो.असं होऊ नये म्हणून आपल्या शरीरमनाला संजीवनी देणारा एक परवलीचा जादुई शब्द आहे. त्याचा अर्थ न् आवाका आपण समजून घ्यायलाच हवा.
सहजासहजी न मिळणारं पण सातत्यपूर्ण प्रयत्नांती ‘ देता घेशील किती दोन कराने’ असा चमत्कार घडवू शकणारा संजीवक मंत्रच भासावा असा हा सामर्थ्यवान शब्द म्हणजे ‘ बल’!
हा शब्द ऐकताच तो मुख्यत: शरीराशी संबंधित असावा असंच वाटतं याचं कारण या शब्दाचे ‘शक्ती’ आणि ‘सामर्थ्य’ हे सर्रास रुढ असणारे अर्थ.तरीही या दोन्ही अर्थांनाही इतका मर्यादित संदर्भ मात्र अपेक्षित नाहीय.शक्ती आणि सामर्थ्य हे शब्द केवळ बळकट, सशक्त, भक्कम शरीराचेच नव्हेत फक्त तर धैर्यशील,खंबीर,कणखर मनाचेही निदर्शक आहेत.
प्रतिकारशक्ती, अंगबळ, बाहुबळ, वकूब, बलाढ्य,बलवान,बलवंत, बलशाली,बलदंड,या शरीरबलाशी संबंधित अर्थसावल्या जशा तशाच मनोबल, सहनशक्ती, मन:शक्ती, इच्छाशक्ती, विचारशक्ती या आहेत मनाशी संबंधित!
शरीर आणि मनाच्या सक्षमतेला बुद्धिबलाची जोड नक्कीच पूरक ठरते.
आध्यात्मिक उन्नतीव्दारे प्राप्त होणाऱ्या बलाची प्राणशक्ती,तपोबल, तपसामर्थ्य, आत्मशक्ती ही कांही शब्दरुपे.
खरंतर शरीरबल असो वा मनोबल ते संकटाशी दोन हात करायचं सामर्थ्य देतात.ती संकटाचं निवारण करायला समर्थही असतात.पण हेच सामर्थ्य समोरचा प्रतिस्पर्धी जर कमकुवत असेल तर त्याला मात्र अस्मानी संकटच वाटतात.बलातूनच निर्माण होणारा ‘बला’ हा शब्द अशा भयप्रद संकटासाठीच वापरला जातो.
स्त्रीचा उल्लेख अनेकदा बल नसलेली, कमकुवत याअर्थी अनेकदा ‘अबला’ असा केला जातो. तरीही स्त्री खऱ्या अर्थाने अबला नसून सबला असल्याची असंख्य उदाहरणे आहेत जी ‘नारीशक्ती’चीच द्योतक ठरतात!
सामर्थ्याचा नकारात्मक,विध्वंसक वापर अधोरेखित करणारे पाशवी शक्ती,बलात्कार यासारखे शब्द स्वतःच त्यातली नकारात्मकता,कुरुपता ठळक करणारे आहेत.
शारीरिक बळ आणि मनोबल ही खरंतर निसर्गदत्त वरदानंच.माणसाने ती ओळखणं,जपणं,वृध्दिंगत करणं आणि त्याचा सकारात्मक वापर करणं हेच निसर्गाला अपेक्षित आहे. मात्र याचा विसर पडल्याचे सर्रास वास्तव मात्र कणाकणाने माणसालाच हळूहळू नि:शक्त करीत ‘हतबल’ करणारे ठरते आहे याचे भान हरवून चालणार नाही. पण..? उमज पडेल तर..!!
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈