श्री विश्वास देशपांडे
विविधा
☆ उगवतीचे रंग – आनंदाची गुढी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
फाल्गुन मासातल्या होळीबरोबर थंडी पण संपते आणि येणारा चैत्र महिना नवीन वर्षाचा संदेश घेऊन येतो. पण तो नुसता येत नाही. आनंदाचे प्रतीक म्हणून तो खूप काही गोष्टी आपल्यासोबत आणतो. तसं तर चैत्र हा शब्द चित्रा नक्षत्रावरून आला आहे. चित्र म्हणजे विविधता. या चैत्र महिन्यात किती तरी विविध गोष्टी निसर्ग आपल्यासाठी घेऊन येतो. वसंत ऋतूचे आल्हाददायक आगमन झालेलं असतं. वसंत हा खरं तर ऋतूंचा राजाच म्हणायला हरकत नाही. या वसंतात सृष्टी गंधवती होते. झाडं आपली जुनी वस्त्रं टाकून नवीन रेशमी पर्णसाज परिधान करतात. तांबूस कोवळी, पोपटी, हिरवीकंच पाने जणू नैसर्गिक तोरणाचा साज सृष्टीला चढवतात. निरनिराळी फूल फुलून आलेली असतात. गुलाब, मोगरा यासारखी अनेक फुलझाडं आपल्या सुगंधानं वातावरण प्रसन्न करतात. आम्रवृक्षासह विविध झाडांना आलेला मोहर, वातावरण धुंद करीत असतो. कोकिळेचा पंचम स्वर आसमंतात निनादत असतो. अशाच प्रसन्न वातावरणात मराठी महिन्यातला पहिला दिवस वर्षातला पहिला आनंदाचा सण घेऊन येतो. घराघरांवर गुढ्या उभारल्या जातात.
रावणाचा वध करून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले तेव्हा अयोध्येच्या प्रजाजनांनी गुढ्या तोरणे उभारून रामरायाचे स्वागत केले. या दिवशी रेडिओवर माणिक वर्मांच्या भावपूर्ण आवाजातलं गाणं हमखास ऐकायला येतं आणि आपलं मन प्रसन्न करतं.
विजयपताका श्रीरामाची
झळकते अंबरी
प्रभू आले मंदिरी
*
गुलाल उधळून नगर रंगले
भक्तगणांचे थवे नाचले
रामभक्तीचा गंध दरवळे
गुढ्या तोरणे घरोघरी ग.
किती सुंदर शब्द ! खरोखरच वातावरणात रामभक्तीचा गंध दरवळत असतो. कारण गुढीपाडव्यापासून श्रीरामांच्या नवरात्राला सुरुवात होते. आपले सण, उत्सव किती सुंदर तऱ्हेने निसर्गाशी आणि ईश्वराशी जोडले आहेत. निसर्ग आणि मानव यांच्यातील अतूट नाते तेव्हाच त्यांना उमजले होते. पर्यावरण जपणे, त्याच्या साथीने जगणे हा त्यांच्या जीवनाचाच जणू एक भाग झाला होता. इको फ्रेंडली वगैरे शब्द आपण आज वापरत असलो तरी त्यावेळी जे काही होते, ते सगळेच इको फ्रेंडली होते. असे सण साजरे करण्यामागे पूर्वजांची दृष्टी किती विशाल आणि उदात्त होती, याचे प्रत्यंतर या सगळ्या सणांमागील पार्श्वभूमी जेव्हा आपण समजून घेतो, तेव्हा लक्षात येते. त्यामागे असणारा आरोग्याचा दृष्टिकोन, सामाजिक एकतेचा संदेश खूप महत्वाचा असतो. पण आपण जेव्हा हा उद्देश समजून न घेता हे सणवार साजरे करतो, तेव्हा मात्र ती एक औपचारिकता होते. सुटी, खाणेपिणे, मौजमजा यातच दिवस व्यतीत होतो. नवीन पिढीच्या दृष्टीने तर आपल्या या प्रथा, परंपरा समजून घेणे आवश्यक वाटते तरच भविष्यात आपली संस्कृती, सामाजिक एकोपा टिकून राहील.
गुढीपाडवा हा सण देशाच्या सगळ्या भागात साजरा होतो. दक्षिण भारतात त्याला युगादी किंवा उगादी असे म्हटले जाते. काही ठिकाणी पाडो किंवा पाडवा असेही म्हटले जाते. गुढीपाडवा हा सण आजचा नाही. असे ,म्हणतात की ब्रह्माने याच दिवशी सृष्टी निर्मिली. गुढीपाडव्याचे संदर्भ हजारो वर्षांपासूनच्या वाङ्मयात आपल्याला मिळतात. अगदी रामायणापासून त्यांची सुरुवात होते. गुढी या शब्दाचा अर्थ तामिळ भाषेत लाकूड किंवा काठी असा होत असला आणि प्राचीन मराठी वाङ्मयात गुढी या शब्दाचा झोपडी, कुटी वगैरे असा असला तरी खरं म्हणजे गुढी हा शब्दच आनंदासाठी आला आहे. एखादं मोठं काम करणं, शत्रूवर विजय प्राप्त करणं, हाती घेतलेल्या कामात यश मिळणं या सगळ्या गोष्टींसाठी गुढी उभारणे असा वाक्प्रयोग केला जायचा. माधवदासांनी लिहिलेल्या ‘ उत्कट साधूनि शिळा सेतू बांधुनी… या श्रीरामांच्या मराठी आरतीत पुढील ओळी किती सुंदर आहेत बघा –
प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।
लंकादहन करुनी अखया मारिला ।।
मारिला जंबू माळी, भुवनी राहाटीला ।
आनंदाची गुढी घेऊनिया आला ।।
श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर म्हणजेच एक अलौकिक असे कार्य संपन्न केल्यानंतर हनुमंत आनंदाची गुढी घेऊन आला. इथे गुढी म्हणजे विजयपताका असा अर्थ घेता येईल. अयोध्येच्या नगरजनांनी सडे शिंपून, रांगोळ्या काढून आणि गुढया तोरणे उभारून श्रीरामांचे स्वागत केले. श्रीकृष्णाने कंसाचा वध केला तेव्हाही नगर वासियांनी श्रीकृष्णाचे असेच स्वागत केले होते असे म्हणतात. महाभारताच्या आदिपर्वात गुढीचा उल्लेख आढळतो. खरं तर असाही अर्थ घेता येईल की आपला देह हीच एक नगरी आहे. आपल्या हृदयमंदिरात आपण आनंदाची गुढी उभारून श्रीराम, श्रीकृष्ण यांचे स्वागत करतो. त्यासाठी हृदयाचे दरवाजे उघडे हवेत. आपल्या मनातील काम, क्रोध आदी वासना जेव्हा नष्ट होतील, त्यांच्यावर विजय प्राप्त होईल, तेव्हाच श्रीरामांचा प्रवेश आपल्या हृदयमंदिरात होईल. परमेश्वर हा आनंदस्वरूप आहे. तो सत चित आनंद म्हणजेच सच्चीदानंद आहे. तो आपल्या हृदयात प्रवेशला की आनंदाची गुढी आपोआपच उभारली जाते.
स्त्रीला आदिशक्ती मानून तिची पूजा पूर्वीपासून केली जाते. माता पार्वती म्हणजे आदिशक्ती. शंकर आणि पार्वती यांचा विवाह पाडव्याच्या दिवशी ठरला आणि तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तो पार पडला. तेव्हापासून पाडव्याला स्त्रीच्या रूपात आदिशक्तीची पूजा केली जाते. गुढीपाडव्याचा उल्लेख म्हाईंभट यांनी लिहिलेल्या लीळाचरित्रातही आढळतो. ज्ञानेश्वरीत सुद्धा गुढीचा उल्लेख येतो. ज्ञानेश्वर माउली म्हणतात-
अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।।
अधर्म आणि दोष नष्ट करणारी सुखाची गुढी मी उभवितो. कोणाकडून ? तर सज्जनांकडून. सुखाची गुढी सज्जनच उभारू शकतात. संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा यांच्या वाङ्मयातही गुढीचे उल्लेख आढळतात. चोखोबा तर म्हणतात-
टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची ।
चौऱ्याऐंशी लक्ष योनीतुन प्रवास करून आल्यानंतर दुर्लभ असा मानवदेह प्राप्त होतो. नरदेह प्राप्त होणे म्हणजे आनंदाची गुढी ! म्हणून भगवंताच्या भक्तीत रंगून जाऊन आनंदाने टाळी वाजवावी.
गुढी हे मानवी देहाचंही प्रतीक आहे. आपल्या पाठीतून जाणारा मेरुदंड म्हणजे वेळू किंवा काठी. त्यावर आपले डोके म्हणजे घट. गुढीवरचे रेशमी वस्त्र म्हणजे जणू मानवी देह. त्यावर असणारी कडुलिंबाची आणि आंब्याची पाने म्हणजे मानवी जीवनातील सुखदुःखाचे प्रतीक. गुढीला घातलेला साखरेचा हार किंवा गाठी म्हणजे परमेश्वराचे प्रतीक. जेव्हा आपण आपली सुखदुःखे त्या परमेश्वररूपी साखरेच्या गोड चवीबरोबर मिसळून घेतो, तेव्हा जीवनही गोड, अमृतमय होते. आरोग्याच्या दृष्टीनेही कडूलिंबाच्या पानांचे महत्व आहे. लिंबाची पाने चवीला कडू असली तरी गुणधर्माने थंड आहेत. पुढे सुरु होणाऱ्या कडक उन्हाळ्याला तोंड देता यावे म्हणून कडुलिंबाच्या पानांची चटणी गूळ, मीठ, मिरपूड इ. घालून खातात.
संत एकनाथांच्या रचनांमध्ये तर अनेकवेळा गुढीचा उल्लेख आपल्याला आढळतो. जेव्हा आपण काहीतरी विशेष अशी गोष्ट साध्य करतो, तेव्हा विविध रूपांमध्ये गुढीचे प्रतीक त्यांना भासमान होते. मग ती गुढी हर्षाची, ज्ञातेपणाची, भक्तीची, यशाची, रामराज्याची रोकडी, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची अशी विविध प्रकारची आहे. गुढी वारीत आणि रणांगणातही उभविली जाई. जशी एखादी ज्योत ( बटन ) खेळाडूंकडून पुढे नेली जाते, तशीच ती चपळ माणसांच्या हस्ते युद्धात आणि वारीत पाठवण्यात येई. त्याद्वारे काही संकेत दिलेले असत. तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात –
पुढे पाठविले गोविंदे गोपाळा । देऊनिया चपळा हाती गुढी ।।
शालिवाहन राजांची गोष्ट तर प्रसिद्धच आहे. शालिवाहनांच्या राज्यात अपार समृद्धी होती. पण त्यामुळे प्रजेत आळस आणि सैन्यामध्ये उत्साह आणि चपळता राहिलेली नव्हती. कुठलीही गोष्ट एकाच ठिकाणी वापर न होता पडून राहिली की ती गंजते किंवा बिनकामाची ठरते. तसेच शालिवाहनाच्या सैन्याचे झाले होते. शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात राहिले नव्हते. अशातच शकांचे आक्रमण राज्यावर झाले. मग काय करायचे ? सैन्याला प्रशिक्षण द्यायचे किंवा नवे सैनिक भरती करायचे तर काही वेळ जाणारच. मग शालिवाहनांनी हजारो मातीचे सैनिक, हत्ती, घोडे तयार केले. त्याच्या साहाय्याने त्यांनी जुलमी अशा शकांचा पराभव केला. मग तो विजय लोकांनी गुढया तोरणे उभारून साजरा केला. तेव्हापासून शालिवाहन शक सुरु झाला. पण खरंच मातीचे सैनिक, हत्ती, घोडे लढले असतील का ? मला वाटतं त्याचा प्रतीकात्मक अर्थ आपण घ्यायला हवा. शालिवाहन राजाचे सैन्य मृत्तिकेसमान म्हणजे चैतन्यहीन, निरुत्साही झाले होते. त्यांच्यात मरगळ आली होती. मातीच्या सैन्यात प्राण फुंकणे म्हणजे त्यांच्यातील चैतन्याला आवाहन करणे, त्यांच्यातील स्वत्व, स्वाभिमान, शौर्य, देशाभिमान जागृत करणे. किती सुंदर अर्थ आहे हा !
जेव्हा जेव्हा समाजात अशी स्वत्वहीनता, मरगळ आणि गुलामगिरीची वृत्ती अंगवळणी पडते, तेव्हा तेव्हा त्या समाजात असेच प्राण फुंकावे लागतात. वर्षानुवर्षे गुलामी रक्तात भिनलेल्या समाजात असे चैतन्य समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले म्हणूनच शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची गुढी उभारता आली. स्वातंत्र्यपूर्व काळात असे चैतन्य लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं नेहरू, लाल बहादूर शास्त्री, सरदार पटेल, डॉ आंबेडकर, स्वा सावरकर यांच्यासारख्या नेत्यांच्या आणि क्रांतिकारकांच्या तेजस्वी त्यागातून निर्माण झाले आणि स्वातंत्र्याची गुढी उभारली गेली.
गुढी ही उंच उभारली जाते. ती आशाअपेक्षांचे प्रतीक असते. ती जणू आपल्याला सांगते, तुमचे ध्येय, आशा, अपेक्षा अशाच उंच असू द्या. त्यांना मर्यादा घालू नका. स्काय इज द लिमिट ! आपल्या नवीन वर्षाचा आरंभ या सणाने होतो म्हणून वर्षारंभीचे उत्तम, उदात्त असे संकल्प मनाशी योजा आणि वर्षभरात आपल्या प्रयत्नांनी ते तडीस न्या. हाच गुढीपाडव्याचा संदेश आहे. कवयित्री बहिणाबाई फार सुंदर संदेश आपल्याला आपल्या कवितेतून देतात. त्या म्हणतात –
गुढीपाडव्याचा सन, आता उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं, सोडा मनातली अढी
गेली साली गेली आढी, आता पाडवा पाडवा
तुम्ही येरयेरांवरी लोभ वाढवा वाढवा.
या बहिणाबाईंच्या सांगण्याप्रमाणे मनातली अढी सोडून देऊन एकमेकांवरचे प्रेम वाढवू या. आनंदाची गुढी उभारू या.
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈